Solapur News : सोलापूर : उजनी धरणातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. १५ एप्रिल ते २५ मेपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे. त्यासाठी साडेसात टीएमसी पाणी लागणार आहे. दुसरीकडे ९ एप्रिलपासून सोलापूर शहरासाठीही भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.
सोलापूर शहराला प्रामुख्याने उजनी धरणातून आणि औज-चिंचपूर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. कडक उन्हामुळे औज बंधाऱ्याने तळ गाठला असून, सध्या बंधाऱ्यात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे.
उजनीतून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाऱ्यापर्यंत पोचायला किमान १० दिवस लागतात, त्यामुळे ८ किंवा ९ एप्रिलपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी साधारणत: सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. १५ एप्रिलपासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. त्या आवर्तनासाठी साडेसात टीएमसी पाणी सोडावे लागेल.
या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपणार असून, २० एप्रिल दरम्यान धरण उणे पातळीत जाणार आहे. सध्या शेतीसाठी ६ मार्चला सोडलेले पहिले आवर्तन १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या आवर्तनाला सुरवात होईल. सध्या सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजना, कालवा, बोगद्यातून एकूण चार हजार २०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.
गत वर्षी धरण फेब्रुवारीतच उणे पातळीत
गत वर्षी उजनी धरण फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात उणे पातळीत गेले होते. पावसाळ्यापूर्वी धरण उणे ६० टक्के झाले होते. यंदा मात्र दिलासादायक स्थिती असून २० एप्रिलपर्यंत धरणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असणार आहे. धरण उणे पातळीत गेले, तरीही धरणात ६४ टीएमसी पाणी शिल्लक असणार आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध राहणार असल्याने टंचाईची झळा तुलनेने कमी जाणवणार आहेत.
उजनीतील पाणीसाठा
एकूण पाणीसाठा
७७.४० टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
१३.७० टीएमसी
पाण्याची टक्केवारी
२५.६४ टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.