Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळीपालकांना पैदासीसाठी दिले जात आहेत. यातूनच हिरवगाव पावसा (ता. संगमनेर) येथील अनिल गोफणे यांनी संगोपन केलेल्या शेळीने एकाचवेळी पाच करडांना जन्म दिला आहे. अशी ही पहिलीच घटना आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेळी सुधार प्रकल्पामध्ये संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन केले जात आहे. या अंतर्गत हिरवगाव पावसा (ता. संगमनेर) येथील अनिल गोफणे यांना कृषी विद्यापीठाने बोकड दिला होता. त्याद्वारे प्रजनन केलेल्या दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे आणि एका शेळीने पाच करडे दिली.
या साठी कुलगुरू डॉ. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. संगोपनासंबंधीचे मार्गदर्शन संगमनेर केंद्रातील प्रक्षेत्र गणक प्रवीण फटांगरे करत आहेत.
‘‘संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या साहाय्याने नामशेष होत असलेल्या जातिवंत संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या तीन हजारांवरून पाच हजारांपर्यंत नेण्यात यश मिळवले आहे,’’ असे कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले.
प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे म्हणाले, ‘‘शेळ्यांमध्ये साधारणतः जुळी देण्याचे प्रमाण आपण पाहतो. परंतु तीन ,चार , पाच आणि त्यापेक्षा जास्त करडे देण्याची प्रवृत्ती शेळ्यांमध्ये ३ ते ४ टक्के असते. त्यात चार ते पाच करडे देण्याची फारच कमी असते. यामध्ये नर आणि मादी या दोघांचाही महत्त्वाचा सहभाग आहे.
यासह आहार व्यवस्थापन महत्त्वाचे असते. शेळ्यांची जनुकीय गुणवत्ता आणि त्याबरोबरच उत्तम व्यवस्थापनाची जोड असेल तर आपणास दोन, तीन, चार करडे एका शेळीपासून मिळू शकतात.
विद्यापीठातील शेळी संशोधन प्रकल्पाने पैदाशीसाठी दिलेल्या संगमनेरी नराद्वारे झालेल्या प्रजननातून एकाच शेतकऱ्यांकडील दोन शेळ्यांपैकी एका शेळीला चार आणि एका शेळीला पाच करडे झाल्याचा हा एक विक्रमच आहे. या शेतकऱ्याने शेळ्या आणि बोकडाचे चांगले व्यवस्थापन केल्याने हे शक्य झाले.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.