Pune News : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना शिरूर तालुक्यातील बेटभागात वडज धरणांतून १५० क्युसेकने मीना शाखा कालव्याला आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कालव्याच्या पाण्यामुळे विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊन उन्हाळी पिकांना लाभ होणार आहे.
शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) बेट भागात पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने भूगर्भातील पाणीपातळी जानेवारीपासून खालवण्यास सुरुवात झाली होती. विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी कमी झाल्याने पिकांना पाण्याचे नियोजन करणे अवघड झाले होते.
ऐन उन्हाळ्यात दिवसाचे तापमान वाढू लागल्याने विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी (Borewell Water Level) कमी होऊन पिकांना पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
या आवर्तनाचा पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फकटे, वडनेर व टाकळी हाजी परिसरांतील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मीना शाखा कालव्याच्या पोटचाऱ्यांना सोडलेले पाणी शेवटच्या भागापर्यंत सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
‘‘हे आवर्तन ‘टेल टू हेड’ सोडण्यात आले आहे. साधारण १५ दिवसांचे आवर्तन असून, उन्हाळ्यातील कांदा व इतर पिकांना या आवर्तनाचा लाभ होईल,’’ असे मीना शाखा कालव्याचे शाखाधिकारी सुनील दाते यांनी सांगितले.
माझ्याकडे एकूण १५ एकर शेती आहे. यामध्ये ऊस, कांदा, डाळिंब, पपई अशी पिके आहेत. काही दिवसांपासून पाण्याची टंचाई भासत आहे. परंतु आता कालव्याला पाणी आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
- सुभाष जगताप, शेतकरी, जांबूत, शिरूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.