अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात कोरडवाहू दादर ज्वारी, हरभरा पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. ही पेरणी कमी आहे. यातच कृत्रीम जलसाठाधारकांची पेरणी सणासुदीमुळे रखडली आहे. दिवाळीनंतर ही पेरणी वेग घेईल, असे संकेत आहेत. खानदेशात सुमारे ३४ टक्के एवढी रब्बीची पेरणी झाली आहे.
यंदा १०० टक्के पेरणी होणार नाही, असे चित्र आहे. परतीचा पाऊस न आल्याने जमिनीत ओलावा नव्हता. फक्त तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत ओलावा बरा होता. या भागात दादर ज्वारी, कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी झाली आहे. ही पेरणी २० ऑक्टोबरपूर्वीच ९० टक्के पूर्ण झाली होती.
परंतु कृत्रीम जलसाठाधारकांची रब्बीची पेरणी रखडत सुरू आहे. मध्यंतरी सोयाबीन, मका, ज्वारीची मळणी सुरू होती. यामुळे पूर्वमशागतीसाठी ट्रॅक्टरचा तुटवडा होता. यामुळे मशातगीस विलंब होत होता.
यामुळेदेखील पेरणी रखडत सुरू होती. अनेक शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होत नसल्याने वेचण्या पूर्ण झालेल्या पूर्वहंगामी कापूस पिकाचे क्षेत्र रिकामे करण्यास अडचणी येत होत्या. अनेक लहान किंवा एक ते सव्वा हेक्टर क्षेत्रधारकांनी कुटुंबीयांच्या मदतीने पऱ्हाटी उपटून ती जाळण्याचे काम उरकून घेतले. त्यात आता ट्रॅक्टरने पूर्वमशागत करायची आहे. परंतु दिवाळीची धामधूम गुरुवारपासून (ता. ९) सुरू झाली आहे.
यामुळे अनेक ट्रॅक्टरचालक, मालकांनी ट्रॅक्टरद्वारे कामकाज बंद ठेवले आहे. ट्रॅक्टरचालक, मजूर मंडळीही सणासुदीत व्यग्र आहेत. यामुळे रब्बीची पेरणी मागील तीन ते चार दिवसांपासून रखडत सुरू आहे.
खानदेशात मका, काबुली (डॉलर) हरभरा पेरणी पुढील आठवड्यात सुरू होईल. तसेच गहू पेरणीदेखील पुढील आठवड्यातच सुरू होईल. यामुळे गहू, मका लागवडीचे क्षेत्र अल्प दिसत आहे. खानदेशात एकूण चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी मागील वर्षी झाली होती. यंदा कमी पाऊसमान राहील्याने किंवा पावसाची तूट असल्याने पेरणी १०० टक्के होणार नाही. नंदुरबार, धुळ्यात २० टक्के एवढी पावसाची तूट होती.
जळगाव जिल्ह्यातही सुमारे आठ टक्के एवढी पावसाची तूट राहिली. जळगाव जिल्ह्यात वार्षिक पाऊसमान ७७५ मिलिमीटर आहे. नंदुरबारमध्ये ८१० आणि धुळ्यात सुमारे ५६५ मिलिमीटर एवढा एकूण पाऊस पडतो. नंदुरबार, धुळ्यातील रब्बीची पेरणी जळगावच्या तुलनेत कमी किंवा फक्त २७ टक्केच दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी ३७ टक्क्यांवर आहे.
मोजक्याच भागात स्थिती बरी
रब्बीची पेरणी जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव भागातील तापी, गिरणा काठी बरी झाली आहे. धुळ्यातही तापी, अनेर नदीच्या भागात पेरणी आहे. नंदुरबारातही शहादा, तळोदा भागातच रब्बीची स्थिती बऱ्यापैकी असल्याचे चित्र आहे.
मोजक्याच भागात स्थिती बरी
रब्बीची पेरणी जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव भागातील तापी, गिरणा काठी बरी झाली आहे. धुळ्यातही तापी, अनेर नदीच्या भागात पेरणी आहे. नंदुरबारातही शहादा, तळोदा भागातच रब्बीची स्थिती बऱ्यापैकी असल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.