Agriculture Land  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Purchase : वारसाच्या नोंदीअगोदरच जमिनीची खरेदी

Agriculture Story : गुरुनाथ नावाच्या एका शेतकऱ्याला त्याच्या शेजारची तीन एकर जमीन विकत घ्यायची होती. शेजारचा भगवान नावाचा शेतकरी त्याला जमीन विकण्यास तयार होता.

शेखर गायकवाड

Village Story : गुरुनाथ नावाच्या एका शेतकऱ्याला त्याच्या शेजारची तीन एकर जमीन विकत घ्यायची होती. शेजारचा भगवान नावाचा शेतकरी त्याला जमीन विकण्यास तयार होता. जमिनीचा व्यवहार चर्चेमध्ये असताना भगवान आजारी पडला. त्याचा पोटाचा आजार फार बळावल्यामुळे त्याला सुमारे एक महिनाभर शहरातील हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.

त्यामुळे गुरुनाथचा जमीन खरेदीचा विषय थोडा मागे पडला. आजारपणानंतर भगवान जेव्हा परत गावात आला त्यावेळी त्याची शरीरयष्टी थोडी खालावली होती. अशा वेळी जमिनीची व व्यवहाराची चर्चा करणे गुरुनाथला प्रशस्त वाटले नाही. शेजारीच राहत असल्यामुळे जेव्हा ठरेल त्यावेळी आपण व्यवहार करू असा विचार गुरुनाथने केला. त्यानंतर तीन महिन्यांनी मात्र पुन्हा भगवान आजारी पडला.

आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी भगवानच्या विक्रम, विलास आणि दीपक या तीनही मुलांना पैशांची गरज होती. त्यांनी सुद्धा जमिनीचा व्यवहार करावा असे गुरुनाथने त्यांना सुचविले. वडील भगवान आजारी असतानाच त्यांचे कुळमुखत्यार घेऊन विक्रम, विलास आणि दीपक या तीनही मुलांनी रजिस्टर्ड खरेदी खतावर सह्या करून ही जमीन गुरुनाथला विकून टाकली. हा संपूर्ण व्यवहार एकमेकांतील सामंजस्याने पार पडला होता. त्यामध्ये कोणताही विसंवाद नव्हता. त्यानंतर आजारातच भगवानचे निधन झाले.

खरेदीखत झाल्यानंतर जेव्हा गुरुनाथने गाव कामगार तलाठ्याकडे खरेदीखताची नोंद करण्यासाठी अर्ज दिला तेव्हा तलाठी त्याला म्हणाला की मूळ सातबारा उताऱ्यावर भगवानचे नाव आहे.

परंतु ते आता मयत आहेत. भगवान जिवंत नसल्यामुळे मला थेट खरेदीची नोंद करता येणार नाही. त्यासाठी अगोदर भगवानच्या वारसांची नोंद करून घ्या व सगळ्यांची नावे लावा असे सांगितले.

गुरुनाथचे म्हणणे मात्र असे होते की जरी भगवानचे नाव सातबाराला असले तरी त्याला फक्त तीनच मुले आहेत, मुली वगैरे आणखी कोणी वारस नाहीत. वारस नोंद करणे ही केवळ औपचारिकता आहे.

त्यामुळे तुम्ही थेट खरेदीखताची नोंद करा, असे त्याने तलाठ्यास सांगितले. एवढेच नाही तर आवश्यकता असेल तर आम्ही तीनही मुले मयताचे वारस म्हणून प्रतिज्ञापत्र करून देतो की आम्ही सोडून भगवानला अन्य कोणी वारस नाही.

तरीसुद्धा गाव कामगार तलाठ्याने त्यांचे काही ऐकले नाही व भगवानचे वारस सातबाऱ्यावर आल्याशिवाय नोंद करता येणार नाही असे त्यांना उत्तर दिले. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्याने सातबाऱ्यावर मूळ मालक असलेली व्यक्ती मयत आहे.

सदरील जमीन देणाऱ्यांची नावे नाहीत या कारणामुळे फेरफार नोंद रद्द केली. आता मुख्य प्रश्न बाजूला पडून रद्द केलेल्या नोंदीविरुद्ध महसूल कोर्टात एक अपील दाखल करून खरेदीदार गुरुनाथने खरेदीखतातील फेरफारामध्ये दुरुस्तीची नोंद करण्याचे निर्देश तलाठ्याला द्यावेत, अशा अर्थाचा एक दिवाणी दावा लावला.

या दाव्यापोटी सुमारे सत्तर हजार एवढी स्टँम्प ड्युटी त्याला भरावी लागली. पुढील तीन वर्षे गुरुनाथ व विकणारे यांनी दिवाणी कोर्टात हेलपाटे मारले पण अर्थातच झालेल्या फेरफारामधील नोंद काही दुरुस्त होऊ शकली नाही. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील तरतुदीनुसार केवळ सातबारा रेकॉर्डवरील हितसंबंधीत पक्षकारांना त्यांचा काही आक्षेप आहे का, हे विचारण्यासाठी फेरफार नोंदीची नोटीस दिली जाते.

या प्रकरणात सातबारावर केवळ मयत भगवानचे नाव असल्यामुळे व मयत व्यक्तीला कायद्याने नोटीस देता येत नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता. वास्तविक वारस ठराव (गांव नमुना क्र. ६ क) मध्ये ही तीन मुले वारस असल्याचा ठराव मंजूर करून त्यानंतर खरेदीखताची फेरफार नोंद करता आली असती. भगवान जिवंत असतानाच रजिस्टर व्यवहार झाला असल्यामुळे फक्त खरेदी खताची नोंद घ्यावी अशी गुरुनाथची मागणी होती.

आमचे खरेदी खत अगोदरचे आहे, त्यानंतर देणारी व्यक्ती मयत असल्याने वारसांची नावे सातबाराला लावणे योग्य नाही, असे गुरुनाथला वाटत होते. परंतु नोटीसच्या तांत्रिक मुद्यावर सर्कल अडून बसले होते. अशा वेळी फक्त जमीन महसूल कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.

दिवाणी न्यायालयात गेल्यामुळे प्रश्न सुटला तर नाहीच. परंतु नोंद होण्याचा मूळ मुद्दा मागे पडला. शिवाय दिवाणी न्यायालयाने खरेदी खत योग्य असल्याचे म्हटले तरी फेरफार नोंद करून सातबारा वर नावे लावावीत असे निकालपत्रात लिहिले नव्हते.

जमीन महसूल कायद्यात स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली असताना सुद्धा वडिलांच्या वारसाची नोंद होण्यापूर्वीच मुलांनी जमीन विकल्यामुळे व लगेच मालकाचा मृत्यू झाल्यामुळे गुरुनाथला प्रचंड मनस्ताप भोगावा लागला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT