Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Farmer : कर्ता बनण्यासाठी मनाचे सॉफ्टवेअर

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Psychology of Indian Farmer : परिस्थितीचा दट्ट्या ही आपल्या नियंत्रणातील गोष्ट नाही. परिस्थिती कशी असावी हे निवडायचे स्वातंत्र्य आपल्याला नाही; मात्र परिस्थितीकडे कसे पाहायचे याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. दृष्टिकोन बदलणे, निवडणे म्हणजेच परिस्थितीकडे कसे पाहायचे याचे स्वातंत्र्य.

मनाचे समीकरण आणि त्यातले AC आणि ABC हे ट्रॅक आपण मागील लेखात समजून घेतले. यातला A- ॲक्टिव्हेटिंग इव्हेन्ट म्हणजे घटना, B- बिलिफ म्हणजे दृष्टिकोन, विश्‍वास आणि C- कॉनसिक्वेन्स म्हणजे परिणाम. ‘A मुळे C घडले आहे, A बदलला तरच C बदलेल ’ हा झाला AC ट्रॅकवरील विचार. त्यातून येते आपली Reaction म्हणजे प्रतिक्रिया. त्याऐवजी आपल्या धारणांविषयीची जाणीव आणि त्याचा वापर म्हणजे A-B-C ट्रॅक. ABC ट्रॅकवर असताना दिला जातो तो Response म्हणजे प्रतिसाद.

कर्ता शेतकरी म्हणून आपल्याला उतावळ्या प्रतिक्रिया (Reaction) न देता मार्मिक प्रतिसाद (Response) द्यायचा आहे. मात्र त्यासाठी आपल्याला ABC ट्रॅक वापरायचे सॉफ्टवेअर आपल्या मनात इंस्टॉल करायला लागेल, वापरावे लागेल.

AC ट्रॅकवर होणारा विचार हा ऑटोमॅटिक, आपोआप मनात येणारा. तो आपल्या विचार करण्याच्या हार्डवेअरचा भाग असतो. विनासायास, सगळ्यात आधी येणाऱ्या स्वगताचा मार्ग रुळलेला आहे. त्यावरून ABC ट्रॅकचे सॉफ्टवेअर वापरायचे तर पुढील गोष्टी लक्षात ठेवूया ः
- जसे विचारांचे सूत्र (B) तसा परिणाम (C)- हा झाला ABC ट्रॅक.
- ABC ट्रॅक म्हणजे आपण केलेले विचार, आपल्या धारणा यांची जाण.
- ज्या वेळी आपण ABC ट्रॅकवर असतो त्या वेळी आपण response/प्रतिसादाचे सॉफ्टवेअर वापरतो.
- आपल्यामध्ये कदाचित पटकन प्रतिक्रिया येईल (AC ट्रॅकवर गेल्यामुळे) पण तिची सुद्धा जाण असेल तर आपल्याला प्रतिसादाकडे (ABC ट्रॅककडे) जाणे शक्य होईल.

आपण वाचलेल्या गोष्टीतील सूरज आणि संतोष यांचे दृष्टिकोन म्हणजे विचारांचे हे दोन ट्रॅक आहेत. समस्या येते तेव्हा सूरज आणि संतोष दोघांनाही निराशेचे विचार, चिंता जाणवले असतील. मात्र सूरजच्या मनात जे निराशावादी विचार आले, त्यांची तीव्रता, कालावधी आणि वारंवारिता कमी होत गेली. त्याची चिंता अधिक तीव्र न होता, निष्क्रिय होत गेली आणि त्याच्या वर्तनावर, कृती करण्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला नाही. संतोषच्या बाबत निराशावादी विचारांची तीव्रता, कालावधी आणि वारंवारिता तशीच राहिली किंवा वाढत गेली. त्यामुळे निराशा, चिंता वाढत गेली, तीव्र झाली. समस्या सोडविण्यापेक्षा त्यापासून सुटका असे त्याचे वर्तन झाले. आज संतोष रान विकून खेड्यातून शहरात आला, परिस्थिती बदलली तरी त्याचे विचार आणि दृष्टिकोन तसेच राहिले आहेत.

परिस्थितीचा दट्ट्या ही माझ्या नियंत्रणाखालील गोष्ट नाही(Factors beyond my control). पण त्या परिस्थितीकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून बघायचे हे माझ्या नियंत्रणात आहे (Factors within my control).

आपल्या सर्वांनाच असे वाटत असते, की प्रगतीला पोषक परिस्थिती असावी, समस्या येऊच नयेत किंवा आल्या तरी फार तीव्र नसाव्यात, इतरांनी मला त्रासदायक वाटेल असे वागू नये वगैरे. पण परिस्थिती, समस्या, इतरांचे वागणे हे काही आपल्या हातात नाही. आपला दृष्टिकोन सकारात्मक, विवेकी असेल तर आपण विज्ञान, तंत्रज्ञान, समूहज्ञान हे सगळं आपल्या भल्यासाठी वापरू शकतो.

परिस्थिती कशी असावी हे निवडायचे स्वातंत्र्य आपल्याला नाही; मात्र परिस्थितीकडे कसे पहायचे याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. दृष्टिकोन बदलणे, B निवडणे म्हणजेच परिस्थितीकडे कसे पाहायचे याचे स्वातंत्र्य. हे नीट लक्षात येण्यासाठी काही उदाहरणे बघूया.

एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा अपरिमित नुकसान होते. आयुष्य उद्‍ध्वस्त करणारा अनुभव असतो तो. १९९३ च्या सप्टेंबर महिन्यात एका काळरात्री किल्लारी (जि. लातूर) इथे झालेला भूकंप ही अशीच एक आपदा. तिथे आपत्कालीन मदतीसाठी गेलेल्या पथकातील काही जणांनी नोंदवलेली निरीक्षणे खूप काही सांगून जातात. घरांची पडझड, आर्थिक नुकसान तर होतेच, प्राणहानीदेखील मोठ्या प्रमाणावर झाली होती. या आपदेच्या तडाख्याने प्रत्येकालाच धोपटले होते. काही जण दुःखाने मोडून गेले होते, काही ढसाढसा रडत होते, आकांत करत होते. अतिदुःखाने काहींच्या डोळ्यातील पाणी पार आटून गेले होते. (आकृती १)

काही जण मात्र अतिशय जड मनाने का होईना पण परिस्थितीचा अंदाज घेत होते. काय शाबूत राहिलं आहे, काय वाचविता येईल, सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे, याचा विचार करत होते. कुठून मदत मिळेल, अधिक नुकसान होऊ नये म्हणून काय पावलं उचलायला हवीत, याचा अंदाज घेत होते. पुन्हा नव्याने कशी सुरुवात करता येईल, याचा विचार करत होते.

झाल्या नुकसानीबद्दल दु:ख, निराशा, राग अशा भावना या लोकांना देखील जाणवत होत्याच की! मात्र ज्यावर आपले नियंत्रण नाही, अशा गोष्टींबद्दल कुढत न बसता, आपल्या हातात जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करू, असा दृष्टिकोन या लोकांनी निवडला होता. आपण दृष्टिकोन (B) निवडायचे स्वातंत्र्य म्हणालो, ते हेच.

काही जण AC ट्रॅकवर होते, परिस्थितीला दोष देऊन हताश होऊन बसले होते, तर काही ABC ट्रॅकवर होते. त्यांनी निवडलेल्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे प्राप्त परिस्थितीत पुढे जाण्यासाठी काय हाताशी आहे, काय करता येईल असा विचार ते करू शकत होते.
अजून एक महत्त्वाचे निरीक्षण हे की AC ट्रॅकवर कोण आणि ABC ट्रॅकवर कोण आहेत, याचा त्यांना किती प्रमाणात नुकसान झाले आहे त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. अगदी थोडे गमावावे लागलेले देखील हताश होऊन बसले होते, तर काही पुरते उद्‍ध्वस्त होऊनही, त्यांनी उभे राहायला धडपड सुरू केली होती. आपला दृष्टिकोन कुठला असावा, हे समस्या किती भयंकर किंवा बिकट यावर ठरत नाही.

व्हिक्टर फ्रँकेल हे एक ज्यूवंशीय मानसशास्त्रज्ञ होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी छळछावणीमध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना डांबून ठेवले गेले, अपरिमित हाल केले गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्या नरकयातना भोगत असतानादेखील त्यांनी आपल्या इतर ज्यू बांधवांचे, त्यांच्या मनस्थितीचे निरीक्षण, अभ्यास आणि संशोधन चालू ठेवले. आपल्या त्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक त्यांनी लिहिले, ‘Man’s Search for Meaning.’ कुठल्याही परिस्थितीत माझे दृष्टिकोन निवडण्याचे स्वातंत्र्य जगातील कोणतीही व्यक्ती माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, अशी मांडणी त्यांनी केली.

कर्ता शेतकरी, उद्योजक शेतकरी बनायचे असेल तर असे प्रगतीला पूरक दृष्टिकोन अंगिकारणे फार महत्वाचे. परिस्थितीच्या रेट्यात तगून राहून विकासाकडे जायचे असेल तर विचारांमध्ये लवचिकता असणे गरजेचे आहे. ‘पुरे जेथे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’
पूर येतो तेव्हा झाडे उन्मळून पडतात, तर लव्हाळे मात्र तगून राहते. त्याचा लवचिकपणा पुराच्या संकटाशी मुकाबला करायला उपयुक्त ठरतो.

कोरोना महामारीच्या काळात आपण हा अनुभव सर्वांनी घेतलाच की. बाजार, व्यवसाय, उद्योग ठप्प झाले, अनेकांचे उत्पन्नाचे नियमित साधन नाहीसे झाले. मात्र जे लवचिक होते, प्रगतीला पूरक दृष्टिकोन बाळगून होते; त्यांनी जे करणे शक्य आहे ते, वेगवेगळ्या प्रकारे, मार्गांनी करत राहिले. ते तरले, त्यांचे नुकसान कमी झाले.

उद्योजकाच्या दृष्टीने महत्त्वाचे काय? स्वत:मध्ये विचारांचा लवचिकपणा, उपयुक्त धारणा वाढवणे, आपला दृष्टिकोन निवडायच्या स्वातंत्र्याची पूर्ण जाणीव आणि मग स्वत: पलीकडे जाऊन सर्वांचा विचार, सर्वांचा विकास.

समर्थ रामदास म्हणतात-सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तो त्याचे, परंतु भगवंताचे अधिष्ठान पाहिजे.
इथे भगवंत म्हणजे माझ्याच मनातला सदसद्‍विवेक. माझ्याबरोबर सर्वांचा विचार म्हणजे विवेक. माझ्याबरोबर सर्वांचा विचार म्हणजे सुविचार. असा B आपण ठेवला तर विकास होईल. ABCची मुळाक्षरे जसजसे आपण गिरवत जाऊ, तशी AC ट्रॅकमुळे येणारी प्रतिक्रिया आणि भावना आणि वर्तनाची तीव्रता कमी होत जाईल. आपले निर्णय, वर्तन अधिक विवेकपूर्ण होऊ लागेल.
----------------
संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी
kartashetkari@gmail.com
आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –
https://www.youtube.com/watch?v=AKGKOI-ecOw&t=14s


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT