डॉ. बस्वराज भेदे, डॉ. खिजर बेग, डॉ. अरविंद पांडागळे
Agricultural Measures : सध्या बहुतांश ठिकाणी कपाशीच्या २-३ वेचण्या पूर्ण झालेल्या असून, अनेक शेतकऱ्यांना कपाशीचे समाधानकारक उत्पादन मिळाले आहे. गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना वेळीच केल्यामुळे या वर्षी किडलेल्या कपाशीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मात्र मागील ४-५ वर्षांच्या अनुभवापेक्षा या वर्षी सुरुवातीच्या वेचण्यात गुलाबी बोंड अळीमुळे किडलेल्या कपाशीचे प्रमाण वाढले आहे. शेतातील कपाशीच्या हिरव्या बोंडांमध्येही अनेक ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही संभाव्य धोक्याची घंटा आहे. पुढील हंगामातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्या लागतील.
पुढील हंगामात किडीचा प्रसार
कपाशीवरील गुलाबी बोंड अळी ही अळी अवस्थेत सुप्तावस्थेत जाते. दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या स्वतःभोवती गोलाकार कोष विणून त्यात सुप्तावस्थेत राहतात. ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत किंवा दोन वर्षे देखील राहते. हा दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हंगामाच्या शेवटी आढळून येतो. गुलाबी बोंड अळीच्या सुप्तावस्थेवर दिवस व रात्रीचा कालावधी, तापमान आणि खाद्य हे घटक परिणाम करतात.
अ) दिवस व रात्रीचा कालावधी : कमी कालावधीचा दिवस आणि जास्त कालावधीची रात्र यानुसार गुलाबी बोंड अळी सुप्तावस्थेत जाते. कमी कालावधीच्या दिवसाच्या प्रमाणानुसार अळीचे सुप्तावस्थेचे प्रमाण वाढत जाते.
ब) तापमान : कमी होणाऱ्या तापमानानुसार गुलाबी बोंड अळीचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण बदलते.
क) खाद्य : जवळपास पक्व होणाऱ्या बोंडामध्ये अळी सुप्तावस्थेत जाते.
सर्वसाधारणपणे जेव्हा दिवसाचा कालावधी कमी होतो व तापमान कमी होते, त्यानुसार अळ्यांचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण वाढते. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर - डिसेंबर यानंतरच्या कालावधीत अशी परिस्थिती असते. चालू हंगामातील सुप्तावस्थेतील अळ्या पुढील वर्षीच्या कपाशीवरील प्रादुर्भावाचे स्रोत आहे.
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या गुलाबी बोंड अळीच्या पिढ्यांची सतत पैदास रोखण्यासाठी....
फरदड घेऊ नये.
शेतात शिल्लक राहिलेली कपाशीची झाडे उपटून नष्ट करावीत.
सुप्तावस्थेतील अळ्या नष्ट करणे.
पिकाचे अवशेष जाळणे किंवा पुढील हंगामाअगोदर विल्हेवाट लावणे.
जिनिंग मिलमधील शिल्लक सरकीवर प्रक्रिया करणे किंवा पुढील हंगामाअगोदर विल्हेवाट लावणे.
पिकाची अवस्था गुलाबी बोंड अळीच्या पैदासीस प्रतिकूल असावी.
लागवडीची वेळ बदलणे. त्यासाठी पूर्वहंगामी लागवड टाळणे आवश्यक.
सुप्तावस्थेतील किडींची संख्या कमी करणे.
लवकर निघणाऱ्या वाणाची लागवड करणे.
फरदड घेऊ नये.
सद्यःस्थितीत करावयाच्या उपाययोजना
हंगाम वेळेवर संपवावा
सिंचनाची उपलब्धता असलेल्या जमिनीमध्ये कापसाच्या वेचण्या झाल्यावर पाणी देऊन पुनश्च कापूस पीक घेतले जाते, याला फरदड असे म्हणतात. खते, सिंचन व कीटकनाशके यांचा वापर करून पीक मार्च - एप्रिलपर्यंत घेतले जाते. मात्र १८० दिवसांनंतर (फरदड) पीक घेऊ नये. कपाशीच्या वेचण्या झाल्यावर पऱ्हाट्या काढून टाकाव्यात.
फदरड घेण्याचे दुष्परिणाम
अ) उत्पादन व बाजारभाव कमी : फरदड कपाशीमध्ये बोंडे आकाराने लहान व शेंड्याकडे लागतात. या बोंडाचे पोषण योग्य न झाल्यामुळे धाग्याची लांबी कमी होते, धाग्याची मजबुती व रुईचा उतारा घटतो. कपाशीची प्रत कमी होते, यामुळे बाजारभाव कमी मिळतो.
ब) कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढतो :
फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंड अळी व हिरवी बोंड अळी यांना हंगाम संपल्यानंतरही खाद्य उपलब्ध होत राहते. त्यांच्या नवीन पिढ्या निर्माण होऊन पुढील हंगामात प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतात. रस शोषण करणाऱ्या किडी उदा. मावा, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी इ. चा फरदड कपाशीवर जास्त प्रादुर्भाव होतो. या किडीचा प्रादुर्भाव पुढील हंगामामध्ये लवकर होण्याची शक्यता असते. फरदड कपाशी घेतलेल्या जमिनीमध्ये फ्युजारिअम या बुरशीमुळे होणारी मर, व्हर्टिसिलिअममुळे मुळे सडणे इ. मृदाजन्य रोगकारक बुरशीचा प्रसार होऊ शकतो.
क) किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढण्याचा धोका
फरदड घेतलेल्या कपाशीवर रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. अवाजवी कीडनाशक फवारणीमुळे किडींमध्ये कीटकनाशकांप्रति प्रतिकारशक्ती निर्माण होते. कीटकनाशकांची परिणामकारकता कमी होत जाते. फरदड कपाशीमध्ये बीटी प्रथिनांचे प्रकटीकरण योग्य प्रमाणात नसते. त्यामुळे बीटी प्रथिनाविरुद्ध किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते. गुलाबी बोंड अळीमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध अशीच प्रतिकारशक्ती निर्माण झाली असून, अन्य किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा धोका आहे.
फरदड कपाशीला सिंचन दिल्यामुळे तणे उगवतात. या तणांमुळे किडींना पर्यायी खाद्य मिळून जीवनक्रम विशेषतः प्रजनन सलग चालू राहते. त्यांचा पुढील हंगामातील कपाशीवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. वरील सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी कपाशीचे पीक वेळेवर काढून टाकावे. फरदड (खोडवा) घेऊ नये.
स्वच्छता मोहीम
शेतात शिल्लक राहिलेल्या पऱ्हाट्या व पिकांचे अवशेष वेचून नष्ट करावेत. त्यामुळे किडींची संख्या कमी होते. प्रजनन व सुप्तावस्था कमी प्रमाणात होते. पुढील हंगामातील किडीच्या प्रसाराला अटकाव होतो. पऱ्हाट्या बांधावर रचून ठेवू नये. पऱ्हाट्यांचा सेंद्रिय खत, श्रेडरने जमिनीत मिसळण्यासाठी किंवा औद्योगिक उपयोगासाठी वापर करावा.
रासायनिक कीटकनाशकाचा वापर
(फवारणी प्रमाण : प्रति एकर)
फेनप्रोपॅथ्रीन (१० टक्के ईसी) ३०० ते ४०० मि.लि. किंवा फेनप्रोपॅथ्रीन (३० टक्के ईसी) १०० ते १३६ मि.लि. किंवा बायफेनथ्रीन (१० टक्के ईसी) ३२० मि.लि. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) १२० ते २०० मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) ६४ ते ११२ मि.लि.
यापैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. यामुळे हिरव्या बोंडामधील प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी करता येईल. कीटकनाशकाचा अति वापर करू नये.
जिनिंग मिल यांचे कार्य
कपाशीवर जिनिंग मिलमध्ये पुढील हंगाम सुरू होण्याअगोदर प्रक्रिया करावी. जर प्रक्रिया करण्यास उशीर होणार असेल तर धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. पतंग आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळे व प्रकाश सापळे लावावे. वरील प्रमाणे उपाययोजना कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये सर्वांनी केल्यास पुढील हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.
गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीवरील परिणाम
कपाशी उत्पादनात आणि वजनात घट येते.
किडलेल्या कापसामुळे बाजारभाव कमी मिळतो.
उत्पादन खर्चात वाढ होते.
जिनिंगवर विपरीत परिणाम होतो.
रुईची प्रत खालावते.
सरकीतील तेलाचे कमी प्रमाण राहते.
- डॉ. बस्वराज भेदे, ७५८८०८२०२८, ९८९०९१५८२४
(कापूस संशोधन केंद्र, नांदेड अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.