Potato Agrowon
ॲग्रो विशेष

Potato Story : पोषणासाठी वरदान असलेल्या बटाट्याची कथा

Team Agrowon

डॉ. आनंद कर्वे

Potato Farming News आपण ज्याप्रमाणे आपल्या रोजच्या जेवणात स्टार्चचा स्रोत म्हणून तांदूळ, गहू (Wheat), ज्वारी (Jowar) इ. धान्ये वापरतो, त्याप्रमाणे उत्तर युरोप आणि उत्तर अमेरिकेतले रहिवासी बटाट्याचा (Potato) वापर करतात.

लोकांनी जेव्हा आपल्या रोजच्या खाण्यात बटाट्यांचा समावेश केला, तेव्हापासून जनतेतले जीवनसत्त्वांच्या कमतरतेने उद्‍भवणारे रोगही कमी झाले, अशी शासकीय नोंद प्रशिया (एकेकाळचा जर्मनी) राज्यातली आहे.

आहारशास्त्रदृष्ट्या धान्यांचे पीठ खाण्यापेक्षा कंद (Tuber) खाणे हे अधिक आरोग्यदायक असते; कारण कंदांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात.

धान्यांच्या पिठात त्या मानाने कमी जीवनसत्त्वे असतात. धान्य पेरले आणि त्याची उगवण सुरू झाली की मग त्या रुजणाऱ्या बियांमध्ये जीवनसत्त्वे निर्माण होतात. भारतीय अन्नपरंपरेतही कंद हे सात्त्विक अन्न समजले जाते.

शीत कटिबंधात बटाटा हे पीक उन्हाळ्यात घेतले जाते. त्यानंतर लगेच हिवाळ्याचा मोसम सुरू होत असल्याने शेतातून निघालेले कंद कोठेही ठेवले तरी ते खराब न होता पुढच्या उन्हाळ्यापर्यंत टिकतात.

भारतात मात्र बटाटा हे हिवाळी पीक असल्याने त्याची काढणी होईपर्यंत हिवाळा संपलेला असतो. त्यामुळे शेतातून निघालेले पीक ५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाच्या शीतगृहात (कोल्ड स्टोअरेज) ठेवावे लागते.

भारतात जरी बटाटा हा मुख्यतः भाजीसाठी वापरला जात असला तरीही त्याची लोकप्रियता इतकी आहे, की भारतात त्याची दर वर्षी सुमारे २० लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड केली जाते. त्या मानाने महाराष्ट्रातील बटाट्याचे क्षेत्र नगण्य, म्हणजे सुमारे नऊ हजार हेक्टरच्या घरात आहे.

परंतु तरीही या बटाटा लागवडीसाठी बेणे पुरविणे हा एक बऱ्यापैकी मोठा उद्योग झाला आहे. बेण्यासाठी वापरले जाणारे कंद आकाराने लहान, म्हणजे केवळ सुमारे २५ ते ३० मि.मी. व्यासाचे असतात.

परंतु बटाटा पिकाच्या लागवडीसाठी हेक्टरी १५ ते २० क्विंटल बेणे लागते आणि ते उत्तर भारतातून आणावे लागते. शिवाय येथे आणल्यावरही बेण्याचा बटाटा शीतगृहातच ठेवावा लागतो. कारण बाह्य वातावरणात त्याला लगेच मोड येऊ लागतात.

उतिसंवर्धनातून बटाट लागवड

मी १९८४ ते १९८८ अशी चार वर्षे एका बहुराष्ट्रीय बीजोत्पादन कंपनीत नोकरी केली. त्या कंपनीकडे उतिसंवर्धनाची (टिश्युकल्चर) एक सुसज्ज प्रयोगशाळा होती आणि उतिसंवर्धनावर काम करणारे कुशल तंत्रज्ञही होते.

या तंत्रज्ञांनी उतिसंवर्धनाद्वारे बटाट्याचे अत्यंत लहान, म्हणजे केवळ सुमारे ५ मि.मी. व्यासाचे सूक्ष्मकंद निर्माण केले होते. त्यांनी या कंदांपासूनही बटाट्याची रोपे निर्माण करून दाखविली होती.

बेणे म्हणून हे सूक्ष्मकंद वापरल्यास हेक्टरी १५ ते २० क्विंटलऐवजी केवळ २०-२५ किलोग्रॅम बेणे पुरेसे होईल आणि हे बेणे शेतकऱ्यांना विकून कंपनीला प्रचंड फायदा होईल, असा त्या कंपनीच्या संचालकांना विश्‍वास वाटत होता.

शेतकऱ्यांच्या शेतावर सूक्ष्मकंदांच्या चाचण्या घेण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले होते. सूक्ष्मकंद रुजल्यावर त्यातून निघणारी रोपेही अत्यंत लहान आकाराची होती. त्यामुळे सूक्ष्मकंद जमिनीत लावल्यानंतर त्यांची खूपच काळजी घ्यावी लागणार होती.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सूक्ष्मकंदांपासून निर्माण झालेली रोपे आकाराने मोठी होईपर्यंत जो काळ जाणार होता त्यामुळे पिकाचा कालावधी वाढणार होता. पण हे शेतकऱ्यांना मान्य नव्हते. त्यावर एक उपाय होता.

टोमॅटो, मिरची किंवा कांद्यामध्ये ज्याप्रमाणे अगोदर रोपे तयार करून मग ती शेतात लावली जातात तसेच एक नवे कृषितंत्र सूक्ष्मकंदांसाठी विकसित करावे लागले असते. पण हे प्रत्यक्षात येऊ शकले नाही.

कारण त्यासाठी लागणारा वेळ द्यायला कंपनीचे संचालक तयार नव्हते. कदाचित सूक्ष्मकंद निर्माण करण्याचा खर्च आणि त्यांच्या विक्रीची किंमत यांचा मेळ बसला नसेल. नक्की कारण काय होते ते मला समजले नाही; पण हा संभाव्यतः अत्यंत किफायतशीर असा नवा शोध कंपनीने पुढे विकसित न करता वाया घालविला, असे माझे मत आहे.

पुढे काही वर्षांनी भारत सरकारच्या सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटने बटाट्याच्या खऱ्या बीजावर काम सुरू केले. दक्षिण अमेरिकेत निसर्गात सापडणाऱ्या बटाट्याच्या रोपांना फुले येतात आणि त्यांमध्ये बीजधारणा होते.

पण आपण जो बटाटा खातो त्याच्या रोपांना फुले येऊनही त्या फुलांमध्ये बीजनिर्मिती होत नाही. याचे कारण असे आहे, की आपण खाद्य म्हणून वापरत असलेल्या बटाट्याच्या पेशिकांमधील रंगसूत्रांची संख्या निसर्गात वाढणाऱ्या बटाट्याच्या दुप्पट असते. याला टेट्राप्लॉइडी असे म्हणतात.

सर्वसाधारणतः सर्व जीवमात्रांच्या पेशिकांमधील रंगसूत्रांचा एक संच आपल्या मातृवनस्पतीकडून आणि दुसरा संच आपल्या पितृवनस्पतीकडून आलेला असतो. संगसूत्रांचे दोन संच असलेल्या जीवमात्रांना डिप्लॉइड जीवमात्र असे म्हणतात.

बटाट्याच्या डिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड वाणांच्या उत्पन्नात फरक नसतो, पण वाणाची शुद्धता राखण्याच्या दृष्टीने टेट्राप्लॉइड वाणे वापरणे अधिक इष्ट असते. कारण डिप्लॉइड वाणांच्या फुलांमध्ये होणाऱ्या परपरागीकरणामुळे बियांची शुद्धता राखणे अवघड जाते.

कंदरूपी बेणे वापरण्याचा व्यावहारिक तोटा असा आहे, की आपल्याला आपल्या उत्पादनाचा एक दशांश भाग बेणे म्हणून शीतगृहात जतन करून ठेवावा लागतो. सरकारला ईशान्य भारतात बटाट्याची लागवड सुरू करायची होती.

पण त्यात व्यावहारिक अडचणी होत्या. कारण कंदरूपी बेणे वापरण्यासाठी लागणारी शीतगृहे ईशान्य भारतात नव्हती आणि उत्तर प्रदेशातून ट्रकने कंद आणण्याचा खर्च व त्याचा व्यापही फार मोठा झाला असता.

हे टाळण्यासाठी खरे बीज निर्माण करणारी वाणे सरकारने द. अमेरिकेतून मागवली होती आणि त्यांवर संशोधनही चालू केले होते. त्या संशोधनातून पुढे काय निष्पन्न झाले, हे मला समजले नाही. वास्तविक ही योजना अयशस्वी होण्याचे कोणतेच कारण नव्हते.

पोमॅटोचा प्रयोग

बटाट्यावर मी आणखी एक काम केले होते. ते होते बटाट्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम करण्याचे. त्याला काही जण पोमॅटो असेही म्हणतात. यासाठी मी बीजापासून निर्माण केलेली डिप्लॉइड रोपे वापरली होती.

अशी कलमे यशस्वी होतात. वातावरणाचे तापमान २० अंश सेल्सियसच्या खाली गेल्यावरच बटाट्याला कंद लागतात. त्यामुळे ही कलमे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतात लावून जानेवारीपर्यंत टोमॅटोचे पीक घ्यावयाचे आणि जानेवारी महिन्यात पीक उपटून बटाट्याच्या कंदांचे उत्पन्न घ्यायचे, असे दुहेरी उत्पन्न या एकाच पिकापासून मिळते.

मी कलमे कुंडीत लावून बघितली. त्यावरून ही कल्पना यशस्वी होते हे मी दाखवून दिले होते. परंतु प्रत्यक्ष शेतजमिनीत हे पीक कसे वाढते हे मात्र मी पाहिले नाही.

टोमॅटो हे नाजूक पीक आहे आणि त्यावर पावसाळ्यात बुरशीजन्य रोग येतात. टोमॅटोवर बुरशीजन्य रोग येऊ नयेत यासाठी कोकणात रोप लावतानाच जमिनीत कोळंबीच्या कवचाची पूड घालतात.

या प्रथेचा चांगला उपयोग होतो, हे मी प्रत्यक्ष प्रयोगांती अनुभवले आहे. वांगे आणि मिरची या वनस्पतीही बटाट्याच्या कुळातल्याच आहेत. त्यामुळे बटाट्यावर वांग्याचे किंवा मिरचीचे कलम करून पाहावे. कदाचित त्यांची कलमेही यशस्वी होतील

उपासमारीला शह

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने बटाट्याचे महत्त्व जाणले होते. उपासमारीला शह देण्यासाठी बटाटा उपयुक्त आहे, हे ओळखून शिमल्यातील पोटॅटो रिसर्च इिन्स्टट्यूटच्या कामाला गती देण्यात आली. या केंद्राने भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये लागवड करता येईल असे बटाट्याचे विविध वाण विकसित केले.

: ९८८१३०९६२३,

(लेखक ‘आरती’चे (अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट-ARTI) संस्थापक अध्यक्ष आणि विश्‍वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT