Organ Donation
Organ Donation Agrowon
ॲग्रो विशेष

Organ Donation: अवयवदान सर्वश्रेष्ठ दान

Team Agrowon

वैद्य श्रीधर पवार

तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तर अनेक व्यक्तींचे जीवन बदलू शकतो. त्यांच्या जीवनात आनंद आणू शकतो. १३ ऑगस्ट रोजीच्या जागतिक अवयवदान दिनानिमिताने आपण सर्व जण मिळून सर्व लोकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करूया आणि अनेकांना नवीन जीवन मिळवून देऊया. अवयवदान हे जिवंत असताना आणि मृत्यूनंतर अशा दोन्ही वेळी करता येते. एक व्यक्ती मृत्यूनंतर ८ जणांचे जीवन आनंदी बनवू शकतो. त्यासाठी आपण लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

आयुर्वेदामधील सुश्रुत संहितेमध्ये अवयवदानाबाबत संदर्भ आले आहेत. याव्यतिरिक्त १९५४ मधे जगातील पहिले जिवंत अवयवदान आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतामध्ये १९९८ मध्ये पहिली अवयव प्रत्यारोपण (Organ Transplantation) शस्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत अनेक रुग्णांना अवयवदानाचा लाभ झाला आहे.

अवयव दानाची गरज का?

आपल्या भारत देशामध्ये केवळ तीन टक्के नोंदणीकृत अवयवदाते आहेत. २०१९ मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी प्रत्यारोपणासाठी १.५ ते २ लाख लोकांना मूत्रपिंड, ८० हजार रुग्णांना यकृत, सुमारे एक लाख रुग्णांना कॉर्निया किंवा नेत्राची आवश्यकता असते. तर हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता १० हजार रुग्णांना असते. यातील केवळ २ ते ४ टक्के रुग्णांना अवयव मिळतात. हे प्रमाण खूपच कमी आहे ते वाढवण्यासाठी अवयव दानाची गरज आहे.

अवयवदान प्रक्रिया नेमकी कशी असते?

मृत्यूनंतर एक व्यक्ती दोन्ही मूत्रपिंड (किडनी), दोन्ही फुप्फुसे, हृदय, यकृत, आतडे, स्वादुपिंड, दोन्ही डोळे, यासोबत त्वचा, रक्तवाहिन्या यांचे दान करू शकतो. अवयवांचे फक्त दान करता येते. अवयवांची खरेदी विक्री पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

अवयवदान कोण करू शकते?

अवयवदानासाठी स्त्री-पुरुष, वय कमी जास्त असले तरीही अवयव दान करता येतात. कोणत्याही जातीधर्माचे लोक अवयवदान करू शकतात. अवयवदान हे वैद्यकीय निकषावर ठरवले जातात. मृत्यूपूर्वी व्यक्तीने अवयवदानाचा अर्ज केला असेल, तर मृत्यूनंतर नातेवाइकांच्या संमतीने मृत व्यक्तीचे अवयव दान करता येतात. अवयवदानासाठी नोंदणी अनेक संस्थांद्वारे केली जाते. १८ वर्षांवरील प्रत्येक जण अवयवदानाची नोंदणी स्वतः करू शकतात; तर १८ वर्षांखालील मुलांना पालकांच्या संमतीची गरज असते.

मृत व्यक्तीतील अवयव त्याच्या मृत्यूनंतर किती काळ जिवंत राहतात?

हे पूर्णपणे त्या अवयवाच्या स्थितीवर तसेच ते त्या मृत व्यक्तीच्या शरीरातून ते अवयव किती वेळात बाहेर काढले आहेत यावर अवलंबून असते. असे असले तरी मृत शरीरातून बाहेर काढलेले हृदय व फुप्फुसे ४ ते ६ तास, यकृत १२ ते २४ तास व मूत्रपिंडे ४८ ते ७२ तास जिवंत राहू शकते, कानाच्या आतील भाग, त्वचा, बोन मॅरो - ५ वर्षे, हृदयातील व्हॉल्व्ह्ज - १० वर्षे जिवंत असतात. या काळात त्या अवयवाचे प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे.

कसा मृत्यू झाला, यानुसार अवयवांवर काय परिणाम होतो?

मेंदू बंद पडल्याने मृत्यू पावणे (ब्रेन डेड) आणि हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू पावणे (कार्डिआक डेथ) याचा अवयवदानावर होणारा परिणाम - ब्रेन डेड म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे निकामी झालेला असतो. त्याचे कार्य पूर्णपणे बंद पडलेले असते आणि त्यात काहीही सुधारणा होण्याची शक्यता शून्य असते. मात्र व्हेंटिलेटरवर ठेवल्यास अशा व्यक्तीचे हृदय काम करत असते.

त्यामुळे जोवर ते मशिन सुरू आहे, तोवर ती व्यक्ती ‘जिवंत’ आहे असं म्हणू शकतो. मात्र वैद्यकीयदृष्ट्या अशी व्यक्ती मृत म्हणूनच धरली जाते. मात्र रक्तप्रवाह सुरू असल्याने अशा व्यक्तींचे अवयव शाबूत असतात आणि त्यामुळे दानाकरिता अत्यंत योग्य ठरतात. याउलट हृदयक्रिया बंद पडून मृत्यू आल्यास महत्त्वाचे अवयव त्वरित निकामी होण्यास सुरुवात होतात. त्यामुळे अशा व्यक्तींची किडनी, यकृत वेळेवर काढून घेण्याकरिता अत्यंत जलद हालचाल करण्याची गरज असते.

अवयव दानाबाबत असलेले गैरसमज

ब्रेन डेड व्यक्तींकडून अवयवदान करणे म्हणजे त्या व्यक्तीला मारणे ः ब्रेन डेड व्यक्तीमध्ये केवळ हृदयाची क्रिया सुरू असते. ब्रेन डेड अवस्थेमध्ये व्यक्ती असल्यास त्यांच्याकडून अधिकाधिक अवयवदान होण्याची शक्यता असते. अवयवदानासाठी वयाची मर्यादा असतेः अवयवदानासाठी कोणतीही वयाची मर्यादा नसते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अवयवदान करता येते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अवयवदान करता येते.

नेत्रदानानंतर पुढच्या जन्मी आंधळे व्हालः नेत्रदान हे मृत्युपश्‍चात केले जाते. यामध्ये डोळ्याचा विशिष्ट भाग काढला जातो. त्यामुळे नेत्रदान आणि आंधळेपण याचा कोणताही संबंध नाही. अवयवदानाचा खर्च कुटुंबातील व्यक्तींवर पडतोः अवयवदानाचा खर्च दात्यांच्या कुटुंबीयांकडून घेतला जात नाही, हा एक गैरसमज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT