Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २४ लाख ४५ हजार ९४९ हेक्टरवर म्हणजे जवळपास सुमारे ४९.१९ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे. आटोपलेल्या या पेरणीत काही भागांत पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यात ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ६,८१,९०३ हेक्टर, जालन्यातील ६,५१,१७३ हेक्टर, बीडमधील ८,०८,९४५ हेक्टर, लातूरमधील ५,८६,१०१ हेक्टर, धाराशिवमधील ५,५४,३६० हेक्टर, नांदेडमधील ७,६१,५७६ हेक्टर तर परभणीतील ५,००,४६८ व हिंगोलीतील ४,१०,३९८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
त्यापैकी २४ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ३,९४,९४९ हेक्टर, जालन्यातील १,९७,६६४ हेक्टर, बीडमधील १,९१,९०८ हेक्टर, लातूरमधील ४,३५,००१ हेक्टर, धाराशिवमधील ४,०६,०६६ हेक्टर, नांदेडमधील ४,८५,२८० हेक्टर तर परभणीतील २,५५,७६७ हेक्टर व हिंगोलीतील सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७९ हजार ३११ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीच्या समावेश आहे.
हिंगोलीत सर्वांत कमी, लातूरमध्ये सर्वाधिक पेरणी
मराठवाड्यात आतापर्यंत पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रात जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७४.२२ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी १९.३३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. बीड जिल्ह्यात २३.७२ टक्के, जालन्यात ३०.३६ टक्के, परभणीत ४९.३३ टक्के, नांदेडमध्ये ६३.७२ टक्के, धाराशिवमध्ये ७३.२८ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५७.९२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.
गेवराई तालुक्यात पेरणी थांबवली
गेवराई, जि. बीड : तालुक्यात आतापर्यंत सुमारे ८० हजार हेक्टरवर खरीप पेरणी झाली. अद्याप ही ४० हजार हेक्टरवर पेरणी होणे बाकी असून, पेरणी केलेल्या शेतकऱ्यास दुबार बियाणे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्याची स्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने गेवराई तालुक्यातील ८० हजार हेक्टरवरील अंकुरलेली खरिपाची कोवळी रोपे कोमजत चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
यंदा गेवराई तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने जवळपास २५ दिवस सर्वदूर हजेरी लावली. त्यातच या वर्षीचा मॉन्सून लवकर दाखल होणार, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत होता. पर्यायाने तालुक्यातील शेतकरी जून सुरू होताच खरिपास पेरता झाला. कपाशी लागवडीला जास्त प्राधान्य दिले. मात्र, पेरणी होताच पावसाने दडी मारली. मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याने पेरलेले खरिपाचे अंकुरलेले मोड कोमजत आहेत. मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेले. आता शेतकऱ्यांचे आर्द्राकडे लक्ष लागले आहे.
पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भात १३२
ज्वारी ६,८८२.२६
बाजरी १२,६८१
मका १७७,०८८.३०
इतर तृणधान्य ८७२.५०
तुर १,६६,९८५.३०
मूग ३९,८५८.६०
उडीद ६२,२७१.५०
इतर कडधान्य ३४४
भुईमूग ४,४९२
तीळ ४४२.७०
कारळ ९९.६०
सोयाबीन १३,२९,८७८.५०
इतर गळीत धान्य ३८८
कपाशी ६,४३,५२२.५२
सहा एकरांमध्ये जवळपास १५ पाकिटे कापूस लागवड केली. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने निम्म्याहून आधिक कपाशी अंकुरलेली नाही. यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.- जिजासाहेब यादव, शेतकरी, सेलू, ता. गेवराई, जि. बीड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.