Ojas Lakhan Success Story
Ojas Lakhan Success Story Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture : प्रतिकूलतेत युवक करतोय घरची शेती प्रगत

राजेश कळंबटे

शिवारआंबेरे (ता. जि. रत्नागिरी) येथील ओजस लाखण (Ojas Lakhan) या युवकाने मुक्त विद्यापीठातून ‘बीएस्सी हॉर्टिकल्चर’ (B. Sc. Horticulture) पदवी घेतली. कमजोर आर्थिक परिस्थिती, आईला मजुरीसाठी जावे लागणे आणि अर्धांगवायू झाल्याने वडिलांना कामांत आलेल्या मर्यादा. अशा घरच्या पार्श्‍वभूमीवर ओजसने नोकरीच्या मागे न लागता शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. नवी पीकपद्धती व सुधारित पद्धतीने पूर्णवेळ घरची शेती प्रगत करण्यात तो रमला आहे.

शिवारआंबेरे (ता. जि. रत्नागिरी) येथील लाखण कुटुंबाची तीन ते चार एकर शेती आहे. घरची
आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे. मात्र त्यावर मात करताना कुटुंबातील नव्या पिढीतील ओजसने पूर्ण वेळ युवा शेतकरी होऊन नोकरीपेक्षा घरची शेती प्रगत करण्याला प्राधान्य दिले आहे. अन्य तरुणांसाठी त्याचे प्रयत्न आदर्शदायी आहेत.

संघर्षातून वाटचाल

शिवणकामासह भातशेती आणि आंबा व्यवसायावर लाखण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा.
ओजसच्या वडिलांना अर्धांगवायू झाला आणि घरची व शेतीची सगळी जबाबदारी त्याच्या आईवर येऊन पडली. तेव्हा ओजस आठवीत शिकत होता. भाऊ त्याच्यापेक्षा थोडा लहान होता.
मार्च, एप्रिल, मे महिन्यात आंबा विक्री व अन्य काळात मजुरी अशा खडतर परिस्थितीत ओजसच्या आईने संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. आईला मदत करत ओजसने शिक्षण सुरू ठेवले. दहावीनंतर त्याने दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत लांजा येथून
कृषी पदविका प्राप्त केली. त्यानंतर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएस्सी हॉर्टिकल्चर पदवीसाठी प्रवेश घेतला. दर शनिवारी खरवते येथील शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयात वर्ग भरायचे. मागील वर्षी शिक्षण पूर्ण झाले.

शिक्षणासोबत शेतीचा अनुभव

मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये घरी राहूनही उत्पन्नाचे साधन सुरू ठेवायचे ओजसने ठरविले. शेतीतील शिक्षणाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. घरच्या शेतीत भातशेती व्यतिरिक्त फुलशेतीकडे तो वळला. ही प्रेरणा त्याला सोमेश्‍वर येथील मित्र तेजस नागवेकर याच्याकडून मिळाली. त्याने झेंडू लागवडीतून चांगले उत्पन्न घेतले होते. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत जून २०२० मध्ये ओजसने झेंडू लागवड केली. श्रावण, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या कालावधीत बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांना असलेली मोठी मागणी त्याने लक्षात घेतली. सुमारे तीन गुंठे क्षेत्रात लागवडीचे नियोजन केले. गादीवाफे तयार करून रोपे लावली. कोकणात पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. या कालावधीत झेंडूचे उत्पादन घेणे आव्हानात्मक होते. रोपांच्या बाजूने व्यवस्थित आळ्या केल्या. काठ्यांद्वारे त्यांना झाडांना आधार दिला. त्यामुळे वारा, पावसातही रोपांचे नुकसान झाले नाही.

समाधानकारक उत्पन्न

गणपती उत्सवापासून रोपांना फुले धरू लागली. पहिल्या वर्षी किलोला १०० रुपये दर मिळाला.
स्थानिक बाजारात तसेच गावातील लोकांनी घरी येऊन फुले विकत घेतली. पहिल्या प्रयोगात

दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. कोरोनासारख्या परिस्थितीत ते महत्त्वाचे होते. शिवाय बाजारातील मागणी असलेल्या पिकाची निवड व व्यवस्थापन चांगले ठेवले, तर यशस्वी होता येते हे ओजसला कळले. कोरोनामुळे वर्ग बंद होते. घरच्या घरीच अभ्यास सुरू होता. त्यामुळे दिवसा शेतातील कामे आणि सायंकाळी अभ्यास असे ओजसचे वेळापत्रक ठरले होते. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी झेंडूची डिसेंबरमध्ये पुन्हा लागवड केली. पाण्याची व्यवस्था जवळच असल्याने त्याचा फायदाही झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ९० किलो फुले मिळाली. यंदा क्षेत्रात थोडी वाढ करून दीड हजार रोपांची लागवड केली आहे. किलोला १०० रुपयांपासून ते १५०, २०० रुपयांपर्यंत दर त्याला मिळत आहे.



भाजीपाला, हळद व आंबा

गेल्या वर्षी थोड्या गुंठ्यात हळद लागवड केली. त्यापासून १७ किलो पावडर तयार केली.
त्याची किलोला २५० रुपयांप्रमाणे विक्री केली. गावातच ग्राहक मिळाले. यंदाही हळदीचे क्षेत्र थोडे वाढवले आहे. घरखर्च चालवण्यासाठी ओजसची आई पालेभाज्या, मुळा यांची लागवड पूर्वीपासून करत होती. सध्या ही जबाबदारी ओजसने घेतली आहे. दोन एकरांवर भात असतो.
हापूस आंब्याची सुमारे १०० कलमे असून, दरवर्षी हंगामात १५० पेटी उत्पादन मिळते. मुंबईतील वाशी बाजारपेठेत १२०० रुपये प्रति पेटी दराने विक्री होते. आंबा व्यवसायाची पूर्ण जबाबदारी देखील ओजसवरच आहे. कृषी विभागाचे अधिकारी धनेश्‍वर राऊत यांचे मार्गदर्शन त्याला लाभते.
येत्या काळात गावात कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

संपर्क ः ओजस लाखण, ९३०७५८१२५९, ८००७०९७०१७

नवरात्री आणि फुलांचे ‘मार्केट’

नवरात्री, दसरा आदी सणासुदीच्या काळात रत्नागिरी शहरात प्रति दिन झेंडू व अन्य फुलांची मागणी सरासरी एक टन ते त्याहून अधिक असते. नवरात्रोत्सवात एकूण फुलांची मागणी ५० ते ६०
टनांपर्यंत असते. शहर बाजारपेठेत सुमारे३० पर्यंत फूल विक्रेते असावेत. सध्या घराघरांत घट बसले असल्याने आरास करण्यापासून पूजेसाठी फुले आणि हार वापरले जातात. जिल्ह्यात झेंडूची शेती करणाऱ्यांचा टक्का अत्यल्प आहे. त्यामुळे परजिल्ह्यांतून फुले आणल्याशिवाय पर्याय उरत नाही. बहुतांश व्यावसायिक मिरज, कोल्हापूर, पुणे येथूनच झेंडू, शेवंती घेतात. सध्या बाजारातील विक्रीचा दर २०० रुपये प्रति किलो आहे. घाऊक खरेदी १०० ते ११० रुपये दराने होते. प्रति दिन गरजेपैकी अवघा ५०० ते ७०० किलो झेंडू रत्नागिरी शहरातील आजूबाजूच्या गावांमधून विक्रीला येतो. गेल्या वर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील पावसामुळे झेंडूचे किलोचे दर ३०० रुपयांपर्यंत पोचले होते. यंदा ते आवाक्यात असले तरीही गाडीभाडे वाढल्यामुळे त्याचा परिणाम हारांवर झाला आहे. रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव येथील फूलविक्रेते निखिल पवार म्हणाले की नवरात्रोत्सवाच्या कालावधीत साधारणपणे एक टन झेंडूची फुले लागतात. दिवसाला शंभर किलो झेंडू लागतो. ५० ते २०० रुपयांपर्यंतचे हार विक्रीला जातात. शेवंतीच्या हरांनाही ग्राहकांकडून मागणी असते. सध्या शेवंतीचा घाऊकचा दर किलोला १८० ते २०० रुपयांपर्यंत असून, गुलाबाच्या वीस फुलांच्या जुडीला १८० रुपये दर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

SCROLL FOR NEXT