Nashik Land News : पानेवाडीतील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या रेल्वे व्हॅगनच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी सोमवारी (ता. ८) जमीन मोजणीसाठी आलेल्या कंपनीच्या अधिकारी व प्रशासनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आमच्या परवानगीशिवाय जमिनीची मोजणी केली जात असल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या रेल्वे व्हॅगन प्रकल्पासाठी १४ शेतकऱ्यांची अंदाजे ४० एकर शेतजमीन लागणार आहे.
कंपनीने शेतकऱ्यांना नोटिसा देऊन शेतजमिनी देण्याची मागणी केली होती. तत्कालीन प्रांत ज्योती कावरे यांनी पानेवाडी ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे ती निष्फळ ठरली होती.
त्यानंतर सोमवारी (ता. ८) पुन्हा शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी कंपनीचे अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, पोलिसांचा मोठा फौजफाटा आला होता. सर्वच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय सकाळपासून उन्हात येऊन थांबले होते.
शेतकऱ्यांनी त्यांना येण्याचे कारण विचारले असता कंपनीचे प्रकल्प अधिकारी अनिल मेश्राम यांनी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचा शेतजमीन मोजणी करण्याचा आदेश असल्याचे सांगताच शेतकरी संतप्त झाले.
‘जमिनी आमच्या आहेत कलेक्टर साहेबांच्या नाहीत,’ असे म्हणत शेतकऱ्यांनी आम्ही आमच्या जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, त्याचा करारनामा होत नाही, तोपर्यंत शेतजमिनीत पाय ठेवू देणार नाही.
मात्र प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मोजणी करण्यात येत असल्याचे कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
संतप्त महिलांची रेल्वे रुळाकडे धाव...
‘आमचे कुटुंब शेतीवर अवलंबून असताना आमचे जीवन उद्ध्वस्त केले जात आहे,’ असा आरोप शेतकरी महिलांनी केला. आमचे म्हणणे ऐकून न घेता, आमच्या मागण्या मान्य न करता, कुठलाही करार झाला नसताना कलेक्टर यांचा धाक दाखवून आमच्या जमिनीची मोजणी बळजबरी केली जात असल्याचे लक्षात येताच संतप्त महिलांनी जवळच असलेल्या रेल्वेलाइनवर धाव घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रकल्पग्रस्त महिलांना बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.
‘समृद्धी’च्या धर्तीवर मोबदला द्या
मुळात आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाही. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी समृद्धी महामर्गाच्या धर्तीवर जमिनीची किंमत द्यावी, प्रत्येकांच्या कुटुंबातला एक जण कंपनीत कायमचा नोकरीला घ्यावा ही आमची नाइलाजाने मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.