Agriculture Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Subsidy : अनुदानाअभावी रखडला शेतीपूरक व्यवसाय

Livestock Mission : पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय असावा व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशातून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले.

Team Agrowon

Amaravati News : पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय असावा व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशातून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले. या अभियानास शेतकऱ्यांसह होतकरू तरुणांकडून व्यापक प्रतिसाद मिळाला असला तरी केंद्राच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे योजनेच्या मूळ उद्देशावरच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. जिल्ह्यात ३३९ पैकी १९ प्रस्तावच गेल्या तीन वर्षांत मंजूर होऊ शकले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांकडे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत २०२३-२४ पासून ३३९ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी केवळ १९ प्रस्ताव केंद्राकडून मंजूर झाले. यातील दोन लाभार्थ्यांना शंभर टक्के तर पाच जणांना पन्नास टक्के अनुदान मिळाले आहे. बारा लाभार्थी प्रतीक्षेत असून, उर्वरित प्रस्ताव मंजूरच करण्यात आलेले नाहीत.

पारंपरिक शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पशुधन अभियान राबविण्यात येते. या अभियानात कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन व चारा निर्मिती, असे प्रकल्प समाविष्ट आहेत. या अभियानात लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या पन्नास टक्के अनुदान केंद्राकडून दिले जाते. तर लाभार्थ्यांना चाळीस टक्के रक्कम बॅंकेकडून कर्जरूपाने मिळणार असून, दहा टक्के स्वहिस्सा आहे.

गेल्या तीन वर्षांत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे सादर झालेल्या ३३९ प्रस्तावांची छाननी व स्थळ तपासणीनंतर ते आयुक्तालय आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. यातील १९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली. पैकी दोघांना शंभर टक्के तर पाच लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान मिळाले आहे.

शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानासारख्या योजना आणायच्या. व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ मात्र द्यायचा नाही, असा प्रकार सध्या केंद्रीय पातळीवरून सुरू आहे.

मंजूर असलेल्या बारा प्रकल्प लाभार्थ्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. त्यांनी प्रकल्प मंजूर झाला म्हणून कर्ज घेत व स्वहिस्सा टाकत प्रकल्प उभारला. अनुदान न मिळाल्याने त्यांचे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. केंद्राने अनुदानाच्या रकमेची तरतूदच केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

अर्ज आणि मंजुरीची संख्या

विवरण संख्या

एकूण अर्ज ३३९

मंजूर झालेले अर्ज १९

त्रुटीमुळे फेटाळलेले १८४

बँक मंजुरीसाठी प्रलंबित ३२

प्रतीक्षेत लाभार्थी १२

योजना चांगली आहे, मात्र अनुदान देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट स्वरूपाची आहे. अनुदानाचा पहिला हप्ता मिळण्यासाठी दीड वर्ष लागले. दुसार हप्ता अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यात अडचणी येत आहेत.
- मनीष रामेकर, शेळी-मेंढी पालक
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन व चारा उत्पादन (मुरघास) या व्यवसायासाठी अनुदान देण्यात येते. वर्ष २०२३-२४ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ३३९ जणांनी अर्ज केले आहेत. यातील १८४ लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे तर ३२ बॅंकेकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना दोन टप्प्यांत अनुदान देण्यात येते.
- डॉ. आनंद भारतिया, पशुसंवर्धन अधिकारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT