Milk Processing Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Processing : दूध प्रक्रिया उद्योगातून सावरले कुटुंब

Dairy Business : कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीमध्ये महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. यापैकी एक उदाहरण म्हणजे अंदुरा (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील वैशाली ज्ञानेश्‍वर बेंडे.

Gopal Hage

गोपाळ हागे

Milk Production : कुटुंबाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीमध्ये महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. यापैकी एक उदाहरण म्हणजे अंदुरा (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील वैशाली ज्ञानेश्‍वर बेंडे. पूर्णाथडी म्हशींचे संगोपन आणि तूप, ताक निर्मितीतून वैशालीताईंनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. याचबरोबरीने महिला गटाच्या माध्यमातून शेतीमध्ये बदलास आश्‍वासक सुरुवात केली आहे.

पूर्णा खोऱ्यात असलेले अंदुरा हे सुमारे पाच हजारांवर लोकवस्तीचे गाव. गावची जमीन बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खारपाण पट्टा असल्याने संरक्षित सिंचनाद्वारे शेतकरी खरिपानंतर रब्बीत एखादं दुसरे पीक घेतात. त्यामुळे शेतीतील उत्पन्नवाढीला मर्यादा आहेत. बेंडे कुटुंबाकडे नऊ एकर शेती आहे. मात्र दरवर्षी विविध कारणांनी अपेक्षित पीक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे या कुटुंबाने शेतीवर पूर्णतः अवलंबून न राहण्याचा निर्धार केला. आयटीआय शिकलेल्या वैशालीताईंनी वडिलोपार्जित तूप विक्री व्यवसायाची निवड करून आर्थिक प्रगतीची दिशा पकडली आहे. त्यांच्याकडे दोन जातिवंत पूर्णाथडी म्हशी आहेत. या म्हशींपासून प्रतिदिन २० लिटर दूध उत्पादन होते. थेट दूध विक्री न करता त्यापासून तूप निर्मिती केली जाते. शुद्ध, दर्जेदार तूप तयार होत असल्याने त्यांचा ब्रँड तयार झाला आहे. यामुळे पंचक्रोशीत त्यांनी तयार केलेल्या तुपाला चांगली मागणी आहे. दर महिन्याला सरासरी २५ किलोपर्यंत तूप विक्री होते. याचबरोबरीने ताक आणि हंगामी स्वरूपात इतर दुग्धजन्य पदार्थ बनवून त्याचाही मागणीनुसार पुरवठा केला जातो. या प्रक्रिया उद्योगामध्ये कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे.

पूर्णाथडी म्हशींचे संगोपन ः
बेंडे कुटुंबाकडे नऊ एकर शेती आहे. खरिपात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, मका आणि रब्बीत काही क्षेत्रावर गहू, हरभरा, ज्वारी लागवड करतात. खारपाण पट्टा असल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या कुटुंबाने शेतीऐवजी पूरक व्यवसायांना प्राधान्य दिले आहे. बेंडे कुटुंबात तीन पिढ्यांपासून म्हशींचे संगोपन आणि दूग्ध व्यवसाय आहे. आजोबांच्या पिढीपासून तूप विक्री केली जाते. सध्या त्यांच्याकडे जातिवंत पूर्णाथडी जातीच्या दोन म्हशी आहेत. या म्हशींपासून दिवसाला सध्या २० लिटर दूध उत्पादन होते. या दुधाची विक्री न करता त्यावर प्रक्रियाकरून ताक, लोणी आणि तूप निर्मिती केली जाते.
म्हशींना वर्षभर चारा मिळावा यासाठी ज्वारी, मक्याची लागवड करतात. शेतीच्या बरोबरीने प्रक्रिया उद्योगाला चांगली गती दिली आहे. येत्या काळात दुधाळ म्हशींची संख्या वाढवून तूपनिर्मिती आणि दूध विक्री व्यवसाय वाढवण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

दर्जेदार तूप निर्मिती ः
रवेदार तूप निर्मितीसाठी वैशालीताई चुलीवर पारंपरिक पद्धतीने दूध तापवतात. त्यामुळे दुधावर मोठ्या प्रमाणात चांगली साय मिळते. चुलीवरच लोणी कढवून तूप निर्मिती केली जाते. अशा प्रकारे तयार झालेले तूप चांगले सुगंधी आणि चविष्ट बनते. यामुळे ग्राहकांची कायम मागणी आहे. महिनाभरात २० ते २५ किलोदरम्यान तूप तयार करून विक्री केली जाते. अंदुरा गावासह सोनाळा, बोरगाव, कारंजा, आडसूळ, तेल्हारा अशा विविध भागातील ग्राहक हे तूप खरेदी करतात. सणासुदीच्या काळात तुपासाठी ग्राहकांना थांबावे लागते.

मठ्ठा, केक निर्मिती ः
तूप निर्मिती आणि विक्रीमध्ये चांगला जम बसल्यानंतर वैशालीताईंनी ग्राहकांची मागणी लक्षात घेत केक निर्मितीला सुरुवात केली. दिवसाला दोन, तीन केकची हमखास विक्री होतात. लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रमासाठी मठ्याला चांगली मागणी असते. ग्राहकांच्या मागणीनुसार मठ्ठ्याचा पुरवठा केला जातो. लोणी काढून झाल्यानंतर राहिलेल्या ताकालाही ग्राहकांची मागणी असते. या प्रक्रिया उद्योगांत त्यांना पती तसेच मुले ऋषिकेश, द्वारकेश आणि मुलगी प्राजक्ता यांची चांगली मदत होते.

तयार झाला ब्रॅण्ड ः
वैशालीताईंनी तुपाची पारंपरिक पद्धतीने विक्री न करता आधुनिक पद्धतीने पॅकिंग आणि ब्रॅण्डनेमसह विक्रीचे नियोजन केले आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी ‘कन्हैय्या’ ब्रॅण्ड तयार केला आहे. सध्या प्रतिकिलो १,०५० रुपये दराने तुपाची विक्री होते.

शेतकरी महिला गटामध्ये सहभाग ः
वैशाली बेंडे या शेतकरी महिला गटामध्ये सक्रिय आहेत. गटांच्या बैठका, आर्थिक बचत, मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरात त्यांनी सातत्याने उपस्थिती लावत शेतीमधील नवीन तंत्रज्ञान त्यांनी अवगत केले. आज त्या जैविक निविष्ठा स्वतः तयार करून शेतीसाठी वापरतात. ‘अंदुरा नैसर्गिक महिला शेतकरी उत्पादक गट’ या नावाने त्यांच्या गटाची नोंदणी आत्मा विभागाकडे करण्यात आली आहे.
बाळापूर (जि. अकोला) येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार म्हणाले, की आत्मा माध्यमातून महिला गटाला सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले आहे. प्रकल्प प्रमुख डॉ. मुरली इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार अंदुरा गावामध्ये महिला गटांना प्रशिक्षण, साहित्य देण्यात आले आहे. या गटातील वैशाली बेंडे आणि गावातील उपक्रमशील महिला स्वतःच्या शेतीसाठी सेंद्रिय खत, दशपर्णी अर्क, जिवामृत स्वतः तयार करतात. पशुपालन करणाऱ्या महिलांना स्वच्छ दूध निर्मितीच्या बरोबरीने तूप विक्रीच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक रूप देण्याच्या उद्देशाने पॅकिंग आणि ब्रॅण्डनेम तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. याचा आर्थिक फायदा महिलांना होणार आहे.

- वैशाली बेंडे, ९०९६५४१५९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: राज्यात पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका; पाच दिवस हवामान कसं राहणार?

Kharif Paisewari : खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर

Sharad Pawar : 'आता आणखी किती निवडणुका लढवायच्या?'; शरद पवार यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

Watershed Development Management : शाश्वत विकासात पाणलोट क्षेत्राचे महत्त्व

PM Modi On Dhan : सत्ता दिल्यास धानाचा एमएसपी ७८० रूपयांनी वाढवू; पंतप्रधान मोदी यांचे झारखंडवासियांना आश्वासन

SCROLL FOR NEXT