Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Food: दूध हे परिपूर्ण अन्न

Calcium Rich Foods: दूध हे नैसर्गिकरित्या संपूर्ण अन्न मानले जाते. दुधामध्ये स्निग्ध पदार्थ, प्रथिने, दुधातील साखर (लॅक्टोज), जीवनसत्त्व आणि खनिजे हे प्रमुख अन्नघटक आहेत. दुधामधील पोषणतत्त्वांची शरीरामध्ये सहजपणे मिळण्याची क्षमता इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत जास्त असते.

Team Agrowon

डॉ.गीतांजली साठे

Dairy Industry in India: भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे. दुग्धव्यवसाय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे तसेच पोषण सुरक्षेलाही हातभार लावतो. भारताने दूध उत्पादनासोबतच दुग्धप्रक्रिया उद्योगामध्ये महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. दुग्धपदार्थ आरोग्यास पोषक, पर्यावरणदृष्ट्या शाश्वत आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.

२०२३- २४ मध्ये भारतामध्ये अंदाजे २३६.३५ दशलक्ष टन दूध उत्पादन झाले.जगभरात दूध उत्पादनाचे प्रमाण २०२३ मध्ये सुमारे ९६५.७ दशलक्ष टन इतके होते, ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १.५ टक्के वाढ झाली आहे.जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान सुमारे २४.५ टक्के आहे. गेल्या काही वर्षात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये दुधाच्या उत्पादनातील सुधारणा झाली आहे.

उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य आहे, ज्याचे योगदान एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या सुमारे १६.२१ टक्के आहे. महाराष्ट्राने सुमारे १६.०५ दशलक्ष टन दूध उत्पादन केले, जे एकूण उत्पादनाच्या ६.७१ टक्के आहे. दूध उत्पादनातील वाढीचे श्रेय शेतीपूरक व्यवसाय, सहकारी दूध संघटनांचे योगदान, आणि सरकारी योजनांना जाते.भारतातील बहुतांश दूध गाई व म्हशींच्या माध्यमातून तयार होते.

Chart

दुधातील घटकांचे फायदे

दूध हे नैसर्गिकरित्या संपूर्ण अन्न मानले जाते. दुधामध्ये स्निग्ध पदार्थ (फॅट), प्रथिने, दुधातील साखर (लॅक्टोज), जीवनसत्त्वे आणि खनिजे (मिनरल्स) हे प्रमुख अन्नघटक आहेत. दुधामधील पोषणतत्त्वांची शरीरामध्ये सहजपणे मिळण्याची क्षमता इतर अन्नपदार्थांच्या तुलनेत जास्त असते. म्हणूनच दूध हे गर्भवती महिला, लहान मुले, प्रौढ, वृद्ध, रोगातून बरे होणारे आणि आजारी व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त अन्न आहे.

प्रमुख घटक

पाणी: इतर दुधातील घटक यामध्ये विरघळलेले किंवा निलंबित स्वरूपात असतात. गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा पाण्याचे प्रमाण जास्त असते.

स्निग्ध पदार्थ (फॅट)

१ ग्रॅम दूध फॅट शरीराला ९ कॅलरी ऊर्जा देते.

स्निग्ध पदार्थ द्रव्य जीवनसत्त्वे अ,ड,इ, के यासाठी सॉल्व्हंट म्हणून कार्य करते.

लिनोलिक आणि लिनोलेनिक ॲसिडसारखे आवश्यक फॅटी ॲसिड प्रदान करते.

सिएलए यासारखे ट्रान्स फॅटी ॲसिड कर्करोग प्रतिबंधक मानले जातात.

फॉस्फोलिपिड्स मेंदू व मज्जासंस्थेसाठी उपयुक्त घटक आहेत.

म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा फॅटचे प्रमाण अधिक असते.

प्रथिने

१ ग्रॅम दूध प्रथिने ४ कॅलरी ऊर्जा देतात.

यामध्ये सुमारे ८० टक्के केसीन आणि २० टक्के व्हे प्रथिने असतात.

आवश्यक अमिनो आम्ले जसे, की फिनाइलअ‍ॅलानिन, व्हॅलिन, ट्रिप्टोफॅन पुरवतात.

ब्रॅन्च्ड चेन अमिनो अ‍ॅसिडमुळे स्नायू पुनर्प्राप्ती व मानसिक थकवा कमी होतो.

दुधातील प्रथिनांचे पचन १०० टक्के होते.

प्रथिनांचे पचन झाल्यावर उपयोगी जैविक पेप्‍टाईड तयार होतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात रहातो. प्रतिकारशक्ती वाढते.

म्हशीच्या दुधात प्रथिनांचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा अधिक असते.

साखर (लॅक्टोज)

१ ग्रॅम लॅक्टोज ४ कॅलरी ऊर्जा देतो.

फक्त दुधामध्ये आढळते.

लॅक्टोज म्हणजे डी -ग्लुकोज आणि डी- गॅलॅक्टोज या दोन साखरेचा मिश्र पदार्थ आहे. ग्लुकोज ऊर्जा देतो तर गॅलॅक्टोज मेंदू पेशींच्या निर्मितीत महत्त्वाचा असतो.

लॅक्टेस नावाचे एंझाइम लहान आतड्यांमध्ये लॅक्टोजचे पचन करतो.

लॅक्टोज मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन उपयुक्त जिवाणूंसाठी कार्बन स्रोत होतो.

गाई, म्हशीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जवळजवळ सारखे असते.

खनिजे

सर्व खनिजे शरीरासाठी उपयुक्त असतात.

दूध इतर अन्नांच्या तुलनेत अधिक प्रमाणात कॅल्शिअम देते.

कॅल्शिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व ड या त्रिकूटामुळे हाडांच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठी उपयुक्त.

सोडियम, झिंक, मॅग्नेशिअम, कॉपर इत्यादी खनिजे सामान्य शारीरिक कार्यासाठी आवश्यक.

पाण्याचे संतुलन, एंझाइम क्रिया व ऑक्सिजन वाहतूक यासाठी ही खनिजे आवश्यक असतात.

म्हशीच्या दुधात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम जास्त असते. गाईच्या दुधात क्लोराईड व पोटॅशिअम जास्त असते.

Chart

जीवनसत्त्वे

दुधातून जवळजवळ सर्वच जीवनसत्त्वे मिळतात.

जीवनसत्त्व अ : डोळ्यांचे आरोग्य व त्वचा कार्यासाठी महत्त्वाचे.

जीवनसत्त्व ब गट : चयापचय, वाढ व मज्जासंस्थेसाठी आवश्यक.

जीवनसत्त्व ड : कॅल्शिअम व फॉस्फरसच्या शोषणासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक.

जीवनसत्त्व इ : अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते आणि हृदयविकारांपासून संरक्षण देते.

म्हशीच्या दुधात जीवनसत्त्व अ आणि बी ६ जास्त, तर गाईच्या दुधात जीवनसत्त्व इ अधिक असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT