Pali News : सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायतीमधील जांभूळपाडा आदिवासी वाडीतील सर्व कुटुंबांना गुरुवारपासून (ता. ३) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यात वन तलावासाठी पाच लाख २८ हजार ९०८ रुपये इतका निधी मंजूर झाला असून एक हजार ९७६ इतक्या लोकांना रोजगार मिळाला आहे.
मजरे जांभूळपाडा गावाला २०१९ मध्ये कम्पार्टमेंट नंबर ६५१ मध्ये एकूण १३९.५ एकर इतक्या वन क्षेत्रावर सामूहिक वनहक्क अधिकार मिळाले आहेत. त्यानंतर सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणीसाठी रोहयोअंतर्गत कामे प्रस्तावित केली होती.
उपवनसंरक्षक, अलिबाग राहुल पाटील यांनी, गावाला भेट देत आढावा घेतला. प्रस्तावित कामे वनीकरणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरणार असून स्थानिक आदिवासींचे स्थलांतर थांबणार असल्याने तत्काळ तांत्रिक मंजुरी देण्याचे निर्देश उपवनसंरक्षकांनी संबंधित वन अधिकाऱ्यांना दिले होते.
सामूहिक वनहक्क क्षेत्रात तळे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले असून या वेळी सुधागड तालुक्याचे वनअधिकारी दादासाहेब कुकडे, सरपंच रोहिदास सखेकर, वनपाल मनोज साळवी, संकेत गायकवाड, वनरक्षक विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.
अनुसूचित क्षेत्र लागू नसलेल्या (नॉन पेसा एरिया) सामूहिक वनहक्क मान्यताप्राप्त वनक्षेत्रात नरेगाअंतर्गत काम सुरू होणारे मजरे जांभूळपाडा हे महाराष्ट्रातील पहिले गाव असावे, असे वातावरण फाउंडेशनचे कार्यक्रम व अभियान प्रमुख राहुल सावंत यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे कशाला करता ते तुम्हाला परवडणार नाही, ही कामे कधी मंजूर होणार नाहीत, असे सांगून आम्हाला गावातून उद्योग-व्यवसायासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक ठेकेदारांनी केला; मात्र आम्हाला राहुल पाटील यांच्यावर विश्वास होता आणि आज तो सिद्धही झाल्याचे विचार वनहक्क व्यवस्थापन समितीच्या सदस्या भारती पवार यांनी व्यक्त केले.
रोहयोअंतर्गत वन तलाव बांधणे, वृक्षलागवड करणे, दगडी-नाला बांधणे व नर्सरी उभारण्यासाठी एकूण २४,७९,३९२ इतक्या निधीच्या कामांना तांत्रिक तसेच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
वनसंरक्षण व शाश्वत वन व्यवस्थापनाचे ध्येय स्थानिक आदिवासी लोकसमुदायाच्या सक्रिय सहभागातून गाठता येणे शक्य आहे. त्यासाठी गावालगत वनक्षेत्रात व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या कामाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, रायगड
रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी समुदायाला स्थलांतर करावे लागत होते. उत्पन्नाऐवजी कर्जबाजारीपणाच वाट्याला येतो. मात्र आता रोजगार मिळाल्याने स्थलांतराची शृंखला संपण्याची शक्यता आहे.- राहुल सावंत, अभियानप्रमुख, वातावरण फाउंडेशन
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.