Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांच्या पाण्याचा विसर्ग सातत्याने होत आहे. त्यामुळे नद्यांतील पाण्याची वाढ शनिवारी (ता. २७) सुरुच राहिली. त्यामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४५ नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. तर १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्याखाली गेली आहेत. सर्वच धरणे नव्वद टक्क्यांहून अधिक भरल्याने मोठा विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षा पाच फुटांवरून वहात असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे.
कोयना धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना व कृष्णा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. यामुळे शिरोळ तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाल्याने या भागात आता भीतीचे वातावरण आहे. पावसाने जवळपास ७० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर होत असल्याने गावगाड्यावर संकट आले आहे. अनेक गावांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
धरण क्षेत्रात होणारा पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सहा पैकी दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. मात्र, शुक्रवारनंतरही दुपारी धरण क्षेत्रात पुन्हा धुवाधार पाऊस सुरू झाला. तसेच काळम्मावाडी धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. पंचगंगेची तासा-तासाला वाढणारी पाणीपातळी अनेक भागांतील लोकांच्या हृदयाचा ठोका वाढवत आहे. जिल्ह्यातील १ हजार ३६७ कुटुंबांतील ५ हजार ८४५ नागरिकांचे आणि ३ हजार ४१५ जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.
त्याच दरम्यान २४० कच्च्या व पक्क्या घरांची पडझड झाली आहे. २४ गोठ्यांची पडझड होऊन सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले. यामध्ये शहरातील १०० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून पूरप्रवण भागातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणीपातळी शनिवारी (ता. २७) दुपारी एक वाजता ४७.३ फूट इतकी होती.
दरम्यान, राधानगरी धरणाच्या चार दरवाजांमधून ७,२१२ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गालगत पाणी आले आहे. पाणीपातळीत २ फुटांनी वाढ झाल्यास महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
‘अलमट्टी’त २ लाख १८ हजार २३० क्युसेकने आवक
महाराष्ट्रातील जलाशयांतून येणारे पाणी व पावसाच्या पाण्याची आवक प्रचंड वाढत आहे. सध्या ‘कृष्णेत पाणी वाढत आहे. ‘अलमट्टी’तून शुक्रवारी (ता.२६) दुपारनंतर ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू केला गेला. शुक्रवारी रात्री अलमट्टीत २ लाख ७ हजार १३० क्युसेकने पाण्याची आवक होती, तर तीन लाख क्युसेकने विसर्ग होता. या दरम्यान धरणात ८२.५० टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी सकाळपासून अलमट्टीत पाण्याची आवक २ लाख १८ हजार २३० क्युसेकने आहे. शुक्रवारपासून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने धरणातील ५.८ टीएमसीने पाणीसाठा कमी झाला असून सध्या ते ७६.८० टीएमसी आहे.
कोयनेतून ३२ हजार १०० क्यूसेकने विसर्ग
कोयना धरणांतून शनिवारी दुपारपर्यंत ३२ हजार १०० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते. पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने आणखी पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. यामुऴे कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना तात्पुरता दिलासा मिळाला.
थोडक्यात महत्त्वाचे...
- कोयना, कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत वाढ
- शिरोळ तालुक्याला पुराचा धोका, ७० हून अधिक गावांचा संपर्क तुटला
- पंचगंगेतील वाढणाऱ्या पाणीपातळीने भीतीचे वातावरण
- राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणीपातळी ४७.३ फूट
- कोल्हापूर जिल्ह्यात ३ हजार ४१५ जनावरांचे स्थलांतर
- २४० कच्च्या व पक्क्या घरांची पडझड
- राधानगरीतून ७,२१२ क्युसेकचा विसर्ग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.