Women Self Help Group  Agrowon
ॲग्रो विशेष

सूक्ष्म वित्त : थेंबे थेंबे तळे साचे...

बचत गट म्हणून एकत्र येऊन केलेल्या लहान पण नियमित बचतीला बॅंकेतर्फे साथ मिळते.

डॉ. अनिल महादार

बचत गट (Self- Help Group) म्हणून एकत्र येऊन केलेल्या लहान पण नियमित बचतीला बॅंकेतर्फे (Bank) साथ मिळते. अंतर्गत कर्जवाटपातून सदस्यांच्या आर्थिक गरजा भागतात. यातून सदस्यांकडे छोटी मोठी उत्पन्नाची साधने तयार होतात. हे दिसायला कमी किंवा सूक्ष्म वित्त पुरवठा असला तरी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हेच खरे!

सूक्ष्‍म वित्त (MICRO CREDIT)ही ग्रामीण, अर्ध शहरी आणि शहरी भागातील गरीब व्यक्तींना (Poor Man) बचत, कर्ज आणि अन्य वित्तीय सेवा पुरवण्यासाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेमुळे गरिबांचे आर्थिक आणि जीवनमान उंचावणे शक्य होईल.
बँकिंगमुळे (Bank) कर्जपुरवठ्याच्या व्यवस्थेत बऱ्यापैकी बदल झाला असला तरी ग्रामीण भागातील गरीब व्यक्तींना वैयक्तिक गरजांसाठी आजही अजूनही खासगी सावकारावर अवलंबून राहावे लागते. अल्प भूधारक, भूमिहीन, ग्रामीण बलुतेदार, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या (Minority holders, landless, rural balutedars, economic and social) मागास व्यक्ती बँक सेवेपासून दूरच राहिले आहेत. अशा वर्गाला एकत्र आणून बचत गटाची निर्मिती करून ते बँकेशी (Bank) जोडण्यात आले. त्याला बचत गट बॅंक संलग्नता असे म्हणतात.

बचत गट - बँक संलग्नता ( SHG – BANK Linkage ) :
बचत गटाच्या स्थापनेनंतर सहा महिने व्यवस्थित चालल्यानंतर तो गट बँकेकडून (Bank Loan) कर्ज घेण्यास पात्र ठरतात. बचत गट पतपात्रतेविषयी मागील लेखामध्ये माहिती घेतली आहे. आता पतपात्रतेनंतर गटास बॅंकेमार्फत कर्जपुरवठा करण्यासंदर्भात ‘नाबार्ड’ने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
१) गटाने स्थापनेपासून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण केला असला पाहिजे.
२) गटास नियमित बचतीची सवय लागलेली असली पाहिजे.
३) बचत गत हा नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत असला पाहिजे.
४) बचत गटाची सभासद संख्या ही १० ते २० असावी.
५) बचत गट हा एकसंध असून, त्यात सामाजिक आणि आर्थिक मागासलेल्या गटातील सभासदांचा असावा.
६) बचतीच्या रकमेचा सर्वांच्या फायद्यासाठी वापर करण्यासंदर्भात गटातील सभासदांचे एकमत व समान कार्यक्रम असल्याचे दिसावे. म्हणजेच सर्व सभासदांचा उद्देश समान असावा.
७) गटाने जमा केलेली बचत व त्याचे अंतर्गत कर्जवाटपाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविलेला असावा.
८) गटाचे कामकाज लोकशाही पद्धतीने चालत असावे. सर्व सभासदास समान सहभाग असावा.
थोडक्यात, सुरू असलेला गट आपल्या सभासदांच्या अत्यावश्यक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि एकमेकांच्या मदतीसाठी तयार झालेला असावा. हा गट एकत्रितपणे सर्व सभासदांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्य करत राहील, याची बॅंकेची खात्री पटली पाहिजे. गटाच्या एकंदरीत कारभारावरून हा गट फक्त बँकेकडून (Bank) आर्थिक मदत मिळविण्यासाठीच तयार करण्यात आलेला आहे, असे वाटता कामा नये.

बचत गटासाठी खेळते भांडवल (Working Capital)
बचत गटाच्या स्थापनेपासून सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर गटाची पतपात्रता ठरते. त्यानुसार पात्र गटास कर्जमंजूर केले जाते. गटाच्या बचतीच्या प्रमाणात हे कर्ज मंजूर केले जाते. कर्ज रकमेचे प्रमाण हे १:१ ते १:४ असे असते.
अ) पहिल्या वर्षी १:१ प्रमाण - याचा अर्थ पहिल्या वर्षी जितक्या रकमेची बचत केली आहे, तितक्याच रकमेचे कर्ज मंजूर केले जाते. एवढी रक्कम मंजूर केली जाते. उदा. गटाची बचत रु. १० हजार रुपये असल्यास त्या गटास रु. १० हजार कर्ज दिले जाते. म्हणजे त्या गटाकडे रु २० हजार इतके भांडवल तयार होते.
ब) दुसऱ्या वर्षी १ः२ प्रमाण - एकूण बचत रकमेच्या दुप्पट रक्कम मंजूर केली जाते. उदा. गटाची बचत रु. २० हजार असल्यास गटास रु. ४० हजार कर्ज मंजूर होते. म्हणजे गटाकडे रु ६० हजार इतके भांडवल (Capital) जमा होते.
क) तिसऱ्या वर्षी १:३ प्रमाण- एकूण बचत रकमेच्या तिप्पट रक्कम मंजूर केली जाते. उदा. गटाची बचत रु. ३० हजार असल्यास
गटास रु. ९० हजार कर्ज दिले जाते. म्हणजे आता गटाकडे रु १ लाख २० हजार इतके भांडवल तयार होते.
ड) चौथ्या वर्षी १:४ प्रमाण - बचत रकमेच्या चारपट एवढी रक्कम मंजूर केली जाते. जर गटाची बचत रु. ४० हजार असल्यास गटास रु. १ लाख ६० हजार कर्ज दिले जाते. म्हणजेच गटाकडे रु २ लाख इतके भांडवल होते.

गटाने अंतर्गत कर्जासाठी (Loan) केलेला योग्य वापर, गटाची कार्य पद्धती, अंतर्गत कर्जाची वसुली या नुसार बँक (Bank) वर उल्लेखलेल्या प्रमाणापेक्षाही जास्त प्रमाणात कर्ज देऊ शकते.
बचत गटाची ३ ते ५ वर्षांची बचत लक्षात धरून बॅंकेकडून कर्ज मंजूर होते. ही गटाची बचत आणि मंजूर कर्ज दोन्ही मिळून तयार होते ते त्या बचत गटाचे खेळते भांडवल होय. यामुळे गटास एकदाच कर्जाची कागदपत्रे बँकेला (Bank) द्यावी लागतात. वारंवार वेगळे कर्ज मंजूर करावे लागत नाही. बचतीच्या प्रमाणात त्यातील किती रक्कम वापरावयाची, हे बँक ठरवून देते. त्याला रक्कम काढण्याची मर्यादा (Drawing Limit) असे म्हणतात. त्या प्रमाणे मंजूर रकमेतून गटास कर्ज रक्कम मिळते. बचतीची रक्कम वाढत जाते, त्या प्रमाणात कर्जाची रक्कम वाढत जाते.
वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे बँक गटास रु. २ लाखांचे कर्ज मंजूर करते. त्यातून गट पहिल्या वर्षी रु. २० हजार, दुसऱ्या वर्षी रु. ६० हजार, तिसऱ्या वर्षी रु. १ लाख २० हजार आणि चौथ्या वर्षी रु. २ लाख घेऊ शकतात. बँकेने गटास कर्ज मंजूर केले असले तरी ती रक्कम पुढे सभासदांना अंतर्गत कर्ज (Loan) स्वरूपामध्ये वाटप कशा प्रकारे करावयाचे हे गटच ठरवतो. मिळालेल्या कर्ज रकमेतून सभासदांना किती कर्ज द्यावयाचे, याची परतफेड मुदत किती, एका सभासदांची कमाल कर्ज मर्यादा, यासोबतच सभासदांच्या गरजांनुसार प्राधान्य क्रम ठरवणे अशा बाबी गटानेच ठरवायच्या असतात. त्याच प्रमाणे बॅंक गटास दिलेल्या खेळत्या भांडवलाव्यतिरिक्त स्वरूपातही कर्ज देऊ शकते. उदा. गटाने एकत्रितरीत्या एखादा व्यवसाय करायचे ठरवले असल्यास त्यास लागणारे भांडवल उदा. यंत्रे, अवजारे, साधने, साहित्य (Machinery, tools, equipment, materials) यासाठी वेगळे मुदत कर्ज बँक मंजूर करू शकते.


मी बोलू शकते गटामुळेच (I can speak only because of the Self- Help group)

जिल्हास्तरीय बचत गट मेळाव्यामध्ये आपल्या गटाची यशकथा सांगताना सुमित्राताईंने केलेले भाषण सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते.

‘‘मी सुमित्रा चौगुले. गाव लोकरवाडी. मी पहिल्यांदाच भाषणाला उभारले आहे. माझे शिक्षण (Education) बारावीपर्यंत झाले आहे. आमच्या गावामध्ये तीन वर्षांपूर्वी मी पुढाकार घेऊन शेतमजूर महिलांचा गट सुरू केला. दर महिन्याला मिळालेल्या मजुरीच्या रकमेतून आम्ही प्रत्येकी १०० रुपये बचत करतो. महिना शंभर म्हणजे तुम्हाला कमी वाटेल, पण आमच्यात काही जणी अशा आहेत की त्यांना ही रक्कम भरण्यातही अडचणी येतात. पण एकमेकींच्या मदतीने नियमित बचत होईल, याकडे आमचे लक्ष असते. म्हणूनच असेल पण या मेळाव्यात मला बोलायला सांगितले. तुम्हाला सांगायला आज अभिमान वाटतो, की तीन वर्षांत आमच्या गटाचे भांडवल तीन लाखांवर पोहोचले आहे. आमचा उत्साह, प्रामाणिकपणा आणि कदाचित तळमळ पाहून बँकेने (Bank Loan) वेळोवेळी कर्ज दिले. त्यातून सभासदांना कर्जाचे वाटप गरजेनुसार करण्यात आले. एक रुपयाची तूट नाही, की बूड नाही. परतफेड १०० टक्के होते.

मीटिंगसाठी दर महिन्याचा पहिला बुधवार ठेवला आहे. पाळीपाळीने प्रत्येकीच्या घरी सायंकाळी सहाला होणाऱ्या मीटिंगला १०० टक्के हजेरी असते. महिलांना आठवड्याची मजुरी मिळालेली असते. त्यामुळे बचत ही नियमित शक्य होते. कोणी उगाच कर्ज घेत नाही. कर्ज घेतले तर त्यातील उत्पन्नाला हातभार लागेल अशा गोष्टींसाठी घ्यायचे असे आम्ही आधीच ठरवले आहे. तिघींनी शेळ्या घेतल्या. दोघींनी एक एक म्हैस(Buffalo) घेतली. एकजणीने शिलाई मशिन घेतले. एकीने आपल्या नवऱ्याला भाजीपाला (Vegetable) विक्रीचा स्टॉल टाकायला भांडवल दिले. या व्यवसायातून प्रत्येकीला थोडेबहुत उत्पन्न सुरू झाले. गेल्याच वर्षी गटाने एकत्रित असा पीठ गिरणीचा व्यवसाय करावयाचा ठरविले. कारण आमच्या वाडीत गिरणी नव्हती. पिठासाठी साऱ्यांचे हाल होत होते. पिठाच्या गिरणीसाठी बँकेने आम्हाला मुदत कर्ज दिले. ग्रामपंचायतीनेही गटाला गिरणीसाठी जागा भाडेतत्वावर जागा दिली आहे. सर्व सभासद आळीपाळीने गिरणीत काम करतात. बँकेचे (Bank Loan) कर्ज परतफेड नियमित सुरू आहे. यातून होणारा फायदा गटाच्या रकमेमध्ये जमा केला जातो. तो कर्ज स्वरूपात सगळ्यांना मिळू शकतो. अशा प्रकारे गटाचे भांडवल वाढत चालले आहे.
गटात माझ्याशिवाय कोणाला लिहायला, वाचायला येत नव्हते. सगळ्यांना सह्या करायला शिकवले आहे. महिनाभरात महत्त्वाचे असे काही लेख काढून ठेवते. ते मीटिंगमध्ये वाचून दाखवते. सर्व जण एकीने काम करतात. गटाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या गावच्या सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, बॅंकेचे अधिकारी (Bank Officer) यांचे गटातर्फे आभार. त्यांच्यामुळेच माझ्यासाठी अर्धवट शिकलेली बाई एवढ्या गर्दीसमोर बोलू शकते. हा आत्मविश्‍वास मला गटातील सर्व महिलांच्या पाठिंब्यामुळे मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: धोरणफजिती आणि संकेताचा खेळ

Jansuraksha Bill: ‘जनसुरक्षा’, की असहमतीचे वावडे?

Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त

Nagpur Agri College: शासकीय कृषी महाविद्यालयाची इमारत अडकली लालफितीत

PESA Recruitment: पेसा क्षेत्रातील भरतीबाबत मागण्यांचे जिल्हा परिषदेस निवेदन

SCROLL FOR NEXT