Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : बदलत्या हवामानातही ऊस उत्पादन मिळविण्यासाठी उपाययोजना

Sugarcane Cultivation : मागील भागामध्ये आपण बदलत्या हवामानाचे ऊस पिकावर होणाऱ्या परिणामांची माहिती घेतली. या लेखामध्ये त्याची तीव्रता व ऊस उत्पादनावर होणारे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजनांची माहिती घेऊ.

Team Agrowon

डॉ. संतोष तु. यादव, डॉ. श्रद्धा वि. बगाडे, श्रीमती सुवर्णा ग. नवसुपे

ऊस हे एक महत्त्वाचे नगदी पीक असून त्याच्या उत्पादनावर हवामान, मृदा आरोग्य, पाणी उपलब्धता आणि कीड-रोग यांसारख्या घटकांचा प्रभाव पडतो. बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी योग्य वाणांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

हवामान बदलामुळे वाढलेली तीव्रता सहन करू शकणाऱ्या सुधारित वाणांची निवड करणे. पाणी कमतरता आणि दुष्काळाच्या स्थितीतही तग धरून उत्पादकता टिकवून ठेवणाऱ्या वाणांची निवड करावी. कमी पाण्यातही जलद वाढणारे वाण निवडावेत. जलद वाढणारे वाण असल्यास ते कमी कालावधीत निघून जातात. (तक्ता क्र. १ व २ पाहा)

जल व्यवस्थापन

बदलत्या हवामानामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. ऊस शेतीसाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. अशा वेळी जलसंवर्धनासोबच आणि कार्यक्षम आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब उपयोगी ठरू शकेल.

ठिबक आणि तुषार सिंचनाचा अवलंब केल्यामुळे वितरणातील पाण्याचा अपव्यय वाचतो. या दोन्ही तंत्रांमुळे ३० ते ५० टक्के पाण्याची बचत होते पाणी पिकाच्या मुळांच्या कक्षेतच दिले जाते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. कमी पाण्यात अधिक क्षेत्रातून उत्पादन घेता येते.

कमी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलांचा सामना करण्यासाठी पाणी साठवण आणि पुनर्वापर तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.

पावसाचे पाणी साठवून भविष्यात सिंचनासाठी वापरण्यासाठी शेती तलाव आणि जलसंधारण प्रकल्प करणे गरजेचे आहे.

पाण्याचा पुनर्वापराचे विविध तंत्रज्ञान शिकून त्यांचा वापर वाढवला पाहिजे. उदा. सांडपाण्यातील हानिकारक प्रदूषके काढून टाकून त्यांचा सिंचनासाठी वापर करणे शक्य आहे. मात्र या प्रक्रिया स्वस्त आणि सामान्य शेतकऱ्यांना परवडण्याजोग्या करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

जमिनीवर आच्छादन तंत्राचा वापर करून ओलावा जास्त काळ टिकवणे शक्य आहे. यामुळे सिंचनाची गरज कमी होते.

माती आरोग्य आणि पोषण व्यवस्थापन

मातीच्या सुपीकतेवर आणि पोषणतत्त्वांवर पीक उत्पादन अवलंबून असते. परंतु, रासायनिक खतांचा अतिवापर, अनियमित हवामान, आणि जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी माती आरोग्य जपून पोषण व्यवस्थापन साधण्यासाठी पुढील उपाय उपयोगी ठरतात.

सेंद्रिय खते उदा. कंपोस्ट खत, गांडूळखत, शेणखत यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. मातीची जलधारणक्षमता सुधारते आणि पोषणतत्त्वांचा नैसर्गिकपणे पुरवठा होतो.

हिरवळीची खतपिके : जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या हिरवळीच्या खतपिकांची वाढ करून, ती फुलोऱ्यात येताच जमिनीत गाडून घ्यावीत. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीमध्ये जिवाणूंची सक्रियता वाढते. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढवता येते.

चुनखडीयुक्त (अल्कलाइन) जमिनीत मातीचा सामू जास्त असल्यामुळे काही पोषणतत्त्वे पिकांना उपलब्ध होत नाहीत. अशा जमिनीत योग्य खत व्यवस्थापन आवश्यक आहे. त्यात गंधकयुक्त खतांचा (उदा. जिप्सम, अमोनियम सल्फेट) वापर केल्यास जमिनीचा सामू नियंत्रित राहतो.

गरजेनुसार योग्य प्रमाणात जैविक खतांचा वापर केल्यास उपयुक्त जिवाणूंच्या (पीएसबी, ॲझेटोबॅक्टर) संख्येत वाढ होते. त्यामुळे पोषणतत्त्वांचे विघटन जलद होऊन पिकांना पुरवठा होतो. त्यामुळे जमिनीतील पोषणसंतुलन राखले जाते आणि उत्पादन टिकवून ठेवता येते.

जैविक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न

ऊस उत्पादनात विविध प्रकारच्या किडी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे जैविक ताण निर्माण होतो. तो करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतींचा वापर केला पाजिते. केवळ रासायनिक उपायांवर अवलंबून न राहता जैविक नियंत्रण, पीक फेरपालट आणि नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर वाढवल्यास आपली शेती पर्यावरणपूरक करता येईल.

अ) कीड नियंत्रणासाठी जैविक उपायांचा अवलंब :

प्राकृतिक शत्रूंचा वापर : ट्रायकोग्रामा परोपजीवी किडे तुडतुडे, बोअरर किडींवर नियंत्रण ठेवतात. लेडी बर्ड बीटा पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.

जैविक कीटकनाशकांचा वापर : बॅसिलस थुरिंजिएन्सिस (Bt) या जिवाणूचा उपयोग करून खोडकिडीवर नियंत्रण ठेवता येते. तर बिव्हेरिया बॅसियाना आणि मेटारायझिम अॅनिसोप्ली या बुरशीजन्य जैविक कीटकनाशकांचा कीड नियंत्रणासाठी वापर होतो.

वनस्पतिजन्य उपाय : निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक कीटकनाशकांचा प्रतिबंधात्मक वापर वाढवला पाहिजे. त्यामुळे कीड आटोक्यात राहून तीव्र कीडनाशकांचा वापर करण्याची गरज कमी होईल.

ब. गरजेनुसार एकात्मिक कीड व्यवस्थापन :

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक, यांत्रिक, शारीरिक आणि रासायनिक उपायांचा समतोल वापर करावा.

पीक फेरपालट : सतत एकाच पिकाची लागवड एका शेतात करत राहिल्यास त्यातून काही विशिष्ट किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे योग्य पीक फेरपालट केल्यास कीड नियंत्रण होऊ शकते.

आरोग्यदायी बियाणे व वाण : रोगमुक्त आणि कीड-प्रतिरोधक वाण निवडल्यास रोगांचे प्रमाण कमी होते.

यांत्रिक उपाय : प्रकाश सापळे आणि चिकट सापळ्यांचा वापर केल्यास सर्वेक्षणासोबतच कीड नियंत्रण करता येते.

रासायनिक उपाय ः केवळ गरज असेल तेव्हाच शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर केल्यास पर्यावरणीय हानी कमी करता येते.

हवामान आधारित शेती व्यवस्थापनाकडे वळावे लागेल...

आजवर शेती करताना हंगाम व ऋतुनिहाय व्यवस्थापनाची पद्धत पारंपरिकरीत्या वापरली जात होती. मात्र मॉन्सूनसह पावसांच्या अनियमित वेळा आणि वेळापत्रकामुळे व्यवस्थापनाचे गणित बिघडत चालले आहे. अनियमित पाऊस, तापमानवाढ, दुष्काळ आणि पूर यांसारख्या हवामान घटकांचा पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हवामानावर आधारित पीक नियोजन आणि योग्य पीक पद्धतींचा अवलंब करण्याची गरज आहे.

शेतीचे योग्य नियोजन करण्यासाठी हवामान अंदाज मिळवून, त्याचा व्यवस्थापनामध्ये वापर करावा लागेल.

अनियमित पावसाचा परिणाम टाळण्यासाठी पावसाच्या पूर्वानुमानावर आधारित पेरणीची वेळ ठरवता येते.

तापमान आणि आर्द्रता याच्या प्रमाणानुसार रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचे योग्य नियोजन करता आल्यास किडीरोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.

तापमान सहनशील वाणांचा वापर : उदा. को ८६०३२ – उष्णतेला सहनशील आणि उत्पादनक्षम वाण, को ९४०१२ – कमी तापमान सहनशील, उत्तम साखर उतारा, को ०२३८ – उच्च तापमान सहनशक्ती आणि अधिक उत्पादनक्षम.

आंतरपीक, मिश्र पीक पीक पद्धतीचा अवलंबातून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासोबतच उत्पादनातील जोखीम कमी करता येते.

आंतरपिकामध्ये उसासोबत डाळी किंवा तेलबिया पिके घेतल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि मातीतील नत्राचे प्रमाण टिकून राहते. (उदा. ऊस + सोयाबीन, ऊस + मूग, ऊस + हरभरा) किंवा मिश्र पीक पद्धतीमध्ये एकाच शेतात दोन किंवा अधिक प्रकारची पिके घेता येतात. (उदा. ऊस + भाजीपाला). त्यातही हंगामानुसार खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचा अंतर्भाव केल्यास जोखीम कमी होते.

तक्ता १ ः कमी पाणी लागणारे (दुष्काळ प्रतिरोधक) वाण

हे वाण मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू व हलक्या पर्जन्यमानाच्या भागांसाठी उपयुक्त आहेत.

को ७४० कमी पाण्यात चांगले उत्पादन, दुष्काळ सहनशील.

को ६२१७५ कोरडवाहू परिस्थितीत टिकून राहतो.

को एम २६५ (फुले २६५) कमी सिंचनात चांगले उत्पादन देतो. मराठवाडा आणि कोरड्या भागात यशस्वी

को ८५०१९ कमी पाण्यातही भरघोस उत्पादन देणारा.

तक्ता २ ः जलद वाढणारे (लवकर तयार होणारे) वाण

हे वाण १० ते १२ महिन्यांत कापणीसाठी तयार होतात.

को ८६०३२, को ९४०१२ आणि फुले २६५ १० ते ११ महिन्यांत तयार होतो. कमी कालावधीत जास्त उत्पादन.

को ०२३८ १० ते ११ महिन्यांत कापणीस योग्य, साखर उतारा चांगला.

को ११८ जलद वाढ, रोग प्रतिकारक्षम आणि चांगला साखर उतारा.

को ८०२१ जलद वाढणारा आणि उच्च उत्पादनक्षम वाण.

आपल्या भागात येणाऱ्या रोगास

सहनशील वाणाची निवड करावी

को ०११८ लाल सड (Red Rot) रोगास प्रतिकारक्षम

को ८६०३२ तांबेरा आणि पानांच्या करपा रोगाविरुद्ध चांगली सहनशीलता

को ०२३९ मॉझॅक आणि चूर्णी (Smut) रोगास सहनशील

डॉ. संतोष तु. यादव ९४०४७४३३२०

(डॉ. संतोष यादव व डॉ. श्रद्धा बगाडे हे कृषिहवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे, तर

श्रीमती सुवर्णा नवसुपे या कृषी तंत्र विद्यालय, मांजरी फार्म, पुणे येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT