Marathi Language Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Language : लोकांमुखी मोठी व्हावी मराठी भाषा

Article by Dr. Keshav Deshmukh : महाराष्ट्र शासन १४ जानेवारीपासून ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करीत आहे, त्यानिमित्त हा विशेष लेख...

Team Agrowon

प्रा. डॉ. केशव देशमुख

Marathi Language Promotion Fortnight : प्रमाण मराठी भाषेचा स्वीकार आणि स्वाभिमान अनाठायी नाही. परंतु, खेड्यापाड्यांतील रोज बोलणारे लोक यांनीही मराठी भाषा ही सांभाळून ठेवण्याचे काम हजारो वर्षांपासून केले; हे विसरता येत नाही. लोकांच्या मुखांत असणारी, त्यांच्या जिभेवर रुळलेली भाषा ही पण महत्त्वाची मराठी आहे, याकडे दुर्लक्ष व्हायला नको. भाषा फरक ठीक पण भाषेचा दुस्वास व्हायला नको.

मुळात कोणताही समाज हा चालता ‘बोलता’ असतो. बोली-भाषा ही प्रवाही, गतिशील, जिवंत, प्रभावी, नावीन्यपूर्ण असते. पाणी, हवा, प्रदेश, लोक, परंपरा, समाज, संस्कृती, विधी, रितीभाती बदलल्या की, लोकभाषांमध्येही मोठा बदल जाणवतोच. ही भाषा मोठी व्हायला हवी. ज्यामुळे मराठी श्रीमंत आहेच ती अधिक श्रीमंत होईल.

गावभाषा किंवा बोलीभाषा हा आमच्या शब्दकोशांचा मोठा ऐवज आहे. येथील परंपरा, येथील कला, येथील लोककथा, येथील भजनांच्या परंपरा, येथील सण-उत्सव हे त्यांचे प्रारूप एखाद्या समुद्रासारखे विशाल आणि प्रचंड खोल आहे. हे धन कितीही उपसा कधी न आटणारे, सरणारे अशा स्वरूपाचे आहे.

कष्टकरी वर्गांची भाषा

विशेषतः शेतीच्या संस्कृतीमध्ये आपण इतरत्र गरीब, कष्टकरी माणसांचे एक मोठे जग आहे. त्यांची म्हणून श्रमपरंपरेची, त्यांच्या साधनसंपत्तीची, त्यांच्या अवजारांची आणि रोजच्या त्यांच्या श्रमपरिहाराची एक भाषा-बोली आहे. ही भाषा, बोली अर्थातच नवी आणि मराठीलाच समृद्ध करणारी आहे.

उदा. पूर्वी ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, व्यंकटेश माडगूळकर किंवा या आणि इतर अनेक लेखक-कवींनी कृषी परंपरेची, म्हणजे ज्या त्या प्रदेशांचे ठसे असणारी भाषा वापरून आपले हे मराठी साहित्य श्रीमंत केले.

पुढे, ग्रामीण, आदिवासी, जनवादी, दलित साहित्यात अशा जीवनाला, संघर्षाला धरून असलेल्या मराठी बोलीभाषांचा एक प्रचंड मोठा प्रवाहच आला. ज्यामुळे मराठी साहित्य आणि मराठी भाषा ही खरोखरच सर्वार्थाने श्रीमंत झाली.

नारायण सुर्वे यांच्या एकूणच कवितेतील श्रमीकवर्ग आणि त्यांची भाषा, आनंद यादव यांच्या कवितेतील शेतकरी कुटुंबाची भाषा किंवा विदर्भाचा खास ठसा घेऊन आलेली पुरुषोत्तम बोरकरांची कादंबरीतील भाषा ते अलीकडे कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या कादंबरीतील प्रदेशभाषा असे हे विपुल महत्त्वाचे भाषांचे प्रगल्भ दाखले सांगता येतील.

या सर्व प्रादेशिक-बोली-मराठी भाषेने त्या त्या भूगोलावरचा समाज साहित्यात आणला आणि मराठी श्रीमंत करावयास मोठा हातभार लावलेला आहे. ही बोलीक्रांती म्हटली पाहिजे.

बोली आणि लोकसमूह

भाषाविचार करताना या धागा समजून घ्यायला हवा, की भाषा एकटी, एकट्याची नसते. ती समूहात, समूहासाठी असते. येथे डोंगरी भूभागात राहणारे लोक, नदीजवळ राहणारे लोक, कुठे कुठे वाळवंटात राहणारे लोक, महानगराजवळ राहणारे लोक किंवा स्थलांतर करून नव्या वस्तीत राहणारे लोक, अशा सर्वांची भाषा मराठी बोली असली तरी सर्व पातळ्यांवर ती आपले भिन्नत्व, वेगळेपण, अस्सलपण दर्शविते.

मुळात समूह आले की संवाद वाढतो. विस्तारत जातो. एकटा एखादा माणूस बडबड करू लागला की, ती भाषाच असते. परंतु ती संवादी, किंवा सामाजिक होत नाही. बोली बोलणारे विपुल लोक गाव, वस्ती, नवी वसाहत करून असतात.

जुनी अवघी खेडी, नवी खेडी या बदलांची ठळक उदाहरणे होत. उदा. आठवडी बाजार, विवाह समारंभ, यात्रा, सभास्थान, सार्वजनिक ठिकाणं, वेगवेगळे महोत्सव, शेतीवरची हंगामी सामूहिक कार्ये ह्या लोकांच्या समूहाच्या जागा...

ही क्षेत्रे अजून रुंदावत जातात. येथील बोलीभाषा वापर अनन्यसाधारण असा असतो. येथे बोलणारे लोक विविधतापूर्ण आणि बहुबोलींचे असतात. शिवाय, बोलीभाषांचा येथे येणारा अनुभव हा ‘समूहनिष्ठ’ अशा प्रकारचा असतो.

ही या प्रकारची मराठीभाषा आपल्या एकूण अभ्यासाच्या, आपल्या संशोधनाच्या अग्रभागी यायलाच हवी. ज्यामुळे, लोकांमुखी रुजून असलेल्या मराठी-बोली भाषेची योग्य दखल घेतली जाईल. कारण ही काळाची गरज आहे.

बोलींचे माध्यमांतर

आज बोलींचा बोलबाला अचंबित करणारा आहे. लोकगीत, गाणी, कलाप्रकार, नाट्यप्रकार यांनी हल्ली बोलीभाषा चांगलीच उचलून धरली, ही बाब स्वागतार्ह म्हणावी लागेल. मनोरंजनांच्या जवळजवळ सर्व माध्यमांनी सुद्धा लोकांच्या तोंडात बसलेली ‘गोड बोली’ रसिकांच्या दारी आज फार चांगल्या पद्धतीने आणून सोडली.

मंगेश हाडवळे, नागराज मंजुळे, प्रवीण तरडे ह्या आणि इतर अनेक नव्या सिनेमांच्या क्षेत्रात खूप मेहनत घेऊन कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांनी बोली, प्रदेश, गावमाणसं, यांना घेऊन रंगभूमी, सिनेमा मोठा आणि श्रीमंत केला. बोलींना खरोखर नवे तेज मिळवून दिले.

माध्यमांतराच्या पातळीवर सुद्धा ही भाषाक्रांतीची किंवा बोली प्रतिष्ठेची महत्त्वाची काही ठळक उदाहरणं! बोलींचे आभाळ हे या पद्धतीने मोठमोठे होत जाणे, ही चांगलीच गोष्ट आहे. त्याचेही स्वागतच!

आईमाईंची भाषा

मायबोली ही संस्था म्हणा, भाषा म्हणा फारच महत्त्वाची! कालपर्यंत ज्या भाषेला लोक चेष्टेने हसायचे’ ती बोली-भाषा आज माणसांच्या जगाला हसवते. हा गुणवत्तेचा आणि बोलींच्या अस्सलतेचा गौरव आहे. बोली बोलणाऱ्या माणसांचाही हा गौरवच! श्रद्धांमधून, दैनंदिन कामांतून, रिवाजांमधून, विविध सण-उत्सवांमधून, श्रमपरंपरेतून या भूगोलावर महिलांनी, अर्थात आमच्या आईमाईंनी बोलींचे वैभव जास्त वाढवले आहे.

उदा. यासंबंधाने लोकसाहित्यात हजारो पानांचा मजकूर किंवा ऐवज आज पाहायला, वाचायला, ऐकायला उपलब्ध आहे. प्रत्यक्षात श्रम, गाणी, गोष्टी, कहाण्या, ओव्या, यांच्यातून आमच्या महिला वर्गांनी मूलतः खेडोपाडी श्रमिक संस्कृतीच्या जगातील आई-माय-मावशी-बहिण-काकी-मामी-वहिनी अशा सर्व सर्व नाते संबंधी स्त्री जगताने बोलींना मोठी जागा ही जगण्यात देऊन भाषेचे वैभवच वाढविलेले आहे.

सारांश इतकाच की साध्या माणसांचे भाषेतले हे योगदान कायम प्रचंडच राहत आले आहे. ही माणसं थेट बोलीभाषेशी आणि भाषा अर्थात बोली ही त्या माणसांशी थेट अशी जोडून आहे. माती-पाणी जसं अलग करता येतच नाही, तसा ‘भाषा ऋणानुबंध’ या माणसांचा बोलण्याशी आहे. असतो. जसा श्वास आणि मानव जोडून तशी भाषा आणि माणूस जुळूनच असते. त्यामुळे, लोक भाषेच्या बाहेर काढता येत नसतात.

शिक्षणभाषा, ग्रंथभाषा सार्वत्रिक समानतेच्या पातळीवर महत्त्वाची आहे, हे तर मान्य आहेच. परंतु आपल्या राज्याच्या ग्रामीण अशा महान पटावर सत्वरच ह्या बोलींबरोबर समाज आणि समाजांसोबत बोली अभेद्य अशा स्वरूपात ‘चालती-बोलती’ राहिली आहे. अशा बोलींचा सन्मान, तिची प्रतिष्ठा सांभाळणे ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.

(लेखक महाराष्ट्र शासनाच्या भाषा समितीचे तज्ज्ञ सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT