Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना वादग्रस्त वक्तव्ये आणि रमी खेळाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेत त्यांच्याकडे क्रीडामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बाळासाहेब पाटील

Rummy Viral Video Impact: कृषिमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यात अधोरेखित करावा असा निर्णय म्हणजे बदल्यांचे अधिकार आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांना दिले. एरवी बदल्यांचा बाजार मांडलेल्या मंत्रालयातून या फायली खाली गेल्या. असे बोलले जाते की अनेक अधिकारी या निर्णयावर खूश आहेत. कारण वशिल्याने वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडलेल्यांची उचलबांगडी आणि योग्यता आणि हक्क असूनही डावलले गेलेल्यांना संधी मिळाल्याने विभागात समाधान व्यक्त केले जात होते.

ही झाली एक बाजू, पण मंत्री म्हणून कोकाटे यांनी विभागावरची पकड सैल केली. माणिकराव कोकाटे हे चार टर्मचे आमदार आहेत. पोटात एक आणि ओठात एक, असा प्रकार नाही. त्यामुळे काहीसे फटकळ असलेल्या कोकाटे यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाल्याने काय होणार, असा प्रश्‍न विचारला जात होता. मंत्री झाल्यावर या स्वभावाला मुरड घालावी लागते हे त्यांच्या अजून ध्यानी आलेले नाही. त्याचाच फटका त्यांना बसला. मात्र कोकाटे म्हणतात तसेच त्यांनी केले तरी काय?

कोकाटे सभागृहात रमी खेळतात याचा इतका बोभाटा झाला, की ते नेमके काय खेळत होते याची तसदी घेण्याचा कुणी प्रयत्न केला नाही. अर्थात, त्याचे समर्थन कुठल्याही पातळीवर करता येत नाही. मोबाइलमध्ये मुळातच असलेला रमी गेम ते खेळत होते आणि त्यात ते फसले. त्यांना स्वतःचा बचाव करता आला नाही, उलट वाचाळपणा जागोजागी दाखवत ते सरकारलाच दोष देत गेले. मंत्री म्हणून त्यांनी विभागात केलेले बदल वाखाणण्यासारखे होते. मात्र त्यावर त्यांच्या वाचाळपणाने पाणी फिरविले. वाचाळ मंत्री आणि आमदार बेछूट बोलतात त्यांना कुणीच पायबंद घालत नाही, असे वातावरणही तयार झाले.

काटेरी मुकुट

आपल्याकडील राजकारण भावनेवर चालते. अतिवृष्टीने नुकसान झाले आणि कृषिमंत्री बांधावर गेले नाही तर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठते. मुळात कृषिमंत्र्यांनी बांधावर जायचे कारण नाही. कारण मंत्री धोरण ठरविण्यासाठी असतात आणि त्यांनी मंत्रालयात बसून ते काम करावे असे अपेक्षित असते. याचा अर्थ कोकाटे यांच्यासारखी बडबड करावी असेही नाही. मात्र आपण उपायांपेक्षा भावनेला जास्त महत्त्व देतो. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले की नेता श्रेष्ठ ही भावना जोपर्यंत शेतकरी फेकून देणार नाहीत तोवर कुणीही भले करणार नाही.

संघटनात्मक ताकदीच्या जोरावर सरकारशी वाद घातला पाहिजे आणि न्याय मार्गाने जोवर लढा दिला जात नाही तोवर सरकार बांधावर येऊन हातावर तुरी देत राहील. कृषिमंत्रिपद हा काटेरी मुकुट आहे. अवर्षण, अतिवृष्टी, कर्जमाफी, मदत, दुधाचे दर आणि शेती आणि सहकाराशी संबंधित विषयांच्या प्रश्‍नांचा भडिमार कृषिमंत्र्यांवर होत असतो. मात्र, सध्या आपल्याकडे सहकार, मदत व पुनर्वसन, फलोत्पादन, पणन, पशुसंवर्धन, मृदा व जलसंधारण अशी खाती वेगवेगळी केली आहेत. ही सरकारने पुनर्वसनासाठी आणि आपल्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यासाठी सोय केली आहे. मात्र ही सर्व खाती शेतीशी संबंधित आहेत. त्याचे देणेघेणे शेतकऱ्यांना असण्याचे कारण नाही. त्यामुळेच कृषिमंत्री

नेहमी तोफेच्या तोंडी असतात आणि अन्य विभागही सोंग घेऊन या सगळ्या माऱ्याकडे पाहत असतात. परिणामी कृषिमंत्र्याला बदनाम होण्यासाठी फारशी वाट पाहावी लागत नाही. आता प्रश्‍न उरतो कोकाटे यांच्यावर नेमकी कारवाई का झाली? विभागाची तक्रार नाही मग कोकाटे यांच्यावर वर्तनासाठी कारवाई करायची असेल, तर त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवायला हवे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यांचा विभाग बदलून नेमके काय साध्य केले, हा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. सध्या मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरू आहे. संजय शिरसाठ, संजय राठोड, दादा भुसे, राज्यमंत्री योगेश कदम आदी मंत्र्यांवर आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी शिंदे यांनी पाठराखण केली आहे.

शिंदेंवर दबाव

मुद्दा उरतो तो कोकाटे यांचे खाते का बदलले याचा! तर सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संपर्क दिल्लीशी असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना मर्यादा येतात. त्यामुळे शिंदे यांच्या पक्षातील बेलगाम नेते आणि मंत्र्यांना आवर कसा घालणार? एका बाजूला कोकाटे यांच्यावरील कारवाईसाठी महाराष्ट्रभर आंदोलने सुरू होती. त्याचवेळी खेड येथे जाऊन शिंदे यांनी भरसभेत अडचणीत आलेल्या राज्यमंत्री योगेश कदम यांची पाठराखण केली. अर्थसंकल्पीय तरतूद नसताना भरमसाट मान्यता दिलेले मृदा जलसंधारण विभागाचे अनेक प्रकल्प रद्द करण्यात आले,

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचा पैशांनी भरलेल्या बॅगेसह व्हिडिओ बाहेर आला. वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक अनिलकुमार पवार यांच्यावर ईडी धाड पडली. या सर्व घटना पाहता फडणवीस आणि शिंदे यांचे कोल्ड वॉर सुरू आहे. त्यामुळे कोकाटे यांचे वर्तन चुकले, पण खात्यात त्यांनी चांगले काम केले तरी त्यांना आम्ही शिक्षा दिली. तुमच्या मंत्र्यांवर काय कारवाई करणार सांगा, असा रोकडा सवाल या निमित्ताने शिंदे यांचा विचारला आहे.

राज्यमंत्र्यांचे उपद्‍व्याप

राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत म्हणून नाराजी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांच्याकडील खात्यांच्या राज्यमंत्र्यांना पूर्ण मुभा दिली आहे. गृह, ऊर्जा, सामान्य प्रशासन आणि अन्य खात्यांचे राज्यमंत्र्यांना पूर्ण संधी दिली असली तरी त्याचे उलटे परिणाम आता येऊ लागले आहेत. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले गृहराज्यमंत्री योगेश कदम डान्स बार प्रकरणात अडचणीत आले. मात्र त्यासोबत त्यांचे वडील म्हणजे रामदास कदम यांचा वाढलेला हस्तक्षेप ही बाब आता खुद्द मुख्यमंत्र्यांना खटकू लागली आहे.

मंत्रिमंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी प्रशासनाने करायची असते. मात्र, मंत्रिमंडळातील काही मंत्री तमीळ सिनेमे जास्त पाहत असावेत की काय असे वाटायला लागले आहे. याचे कारण म्हणजे दुधातील भेसळ शोधण्यासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री वाशीच्या पुलावर उभे राहून टँकर अडवतात, गृहराज्यमंत्री योगेश कदम नवी मुंबईतील डान्स बारवर छापे टाकतात, त्यांच्याकडे राज्यमंत्रिपद असलेल्या अन्न नागरी पुरवठा विभागाचा अधिकार म्हणून त्यांची खासगी माणसे भिवंडी परिसरातील गोडाऊन वर छापा टाकतात असे एकेक कारनामे आता बाहेर येऊ लागले आहेत.

: ९२८४१६९६३४

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT