Maharashtra Assembly Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : महायुती, ‘महाविकास’मध्ये बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडी

Assembly Election Update : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा मंगळवारी (ता. २९) पार पडला. अखेरच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले.

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांसाठी अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरीच्या नाट्यमय घडामोडी घडल्या जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागांसाठी बहुरंगी लढती रंगणार असून, बागलाण,सिन्नर, निफाड व कळवण- सुरगाणा हे चार मतदार संघ सोडले, तर उर्वरित ११ ठिकाणी बंडखोरी झाली. त्यामुळे सात ठिकाणी चौरंगी, चार ठिकाणी तिरंगी, तर चार ठिकाणी दुरंगी लढत होईल. माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा मंगळवारी (ता. २९) पार पडला. अखेरच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. नाशिक पश्‍चिम मतदार संघात महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर यांनी, तर नाशिक पूर्वमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गिते यांनी अर्ज दाखल केला.

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकी जाधव यांनी अर्ज दाखल केला. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी ऐनवेळी मनसेची उमेदवारी मिळविली. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक राजकीय ‘ड्रामा’ रंगलेल्या नांदगाव मतदार संघात आमदार सुहास कांदे, माजी खासदार समीर भुजबळ, गणेश धात्रक व डॉ. रोहन बोरसे यांच्यात रस्सीखेच बघायला मिळेल. येवल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे मंत्री भुजबळांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे व अपक्ष दराडे यांचा सामना होईल.

पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बंडुकाका बच्छाव यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांनी वर्षभरापूर्वीच भुसेंची साथ सोडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीची त्यांना अपेक्षा असताना अत्तय हिरे उमेदवार झाले. सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघात बंडखोरांसह सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

यात भाजप विद्यमान आमदार सीमा हिरे, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, मनसेकडून दिनकर पाटील, स्वराज्य पक्षाकडून दशरथ पाटील, अपक्ष शशिकांत जाधव यांच्यासह इतरांमध्ये बहुरंगी लढत रंगणार आहे. नाशिक मध्य मतदारसंघातही महायुती व महाविकास आघाडीत प्रत्येकी एका उमेदवाराने बंडखोरी केली.

काँग्रेसच्या हेमलता पाटील व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढविली. नाशिक पूर्वमध्ये करण गायकर यांनी स्वराज्य पक्षाकडून अर्ज दाखल केला. या ठिकाणी चौरंगी लढत रंगणारी दिसत असली तरी महायुती व महाविकास आघाडीतच रंगणार आहे.

देवळालीतील यापूर्वी दुरंगी लढतीचे चित्र असताना अखेरच्या दिवशी शिवसेनेने डॉ. अहिरराव यांना उमेदवारी देत ‘द्विस्ट’ आणला आहे. दिंडोरीतही शिवसेनेने शेवटच्या क्षणी धनराज महालेंना एबी फॉर्म देऊन तिरंगी लढत केली. महायुतीत शिवसेनेने दोन ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार दिला, राष्ट्रवादीने नांदगावमध्ये समीर भुजबळांना अपक्ष रिंगणात उतरविले.

त्यामुळे केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचे दिसून आले. दिंडोरी मधून राष्ट्रवादीचे नरहरी शिरवळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य चंद्र पवार गटाच्या सुनीता चारोस्कर मैदानात आहेत. सिन्नरमध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचे विरोधात शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार गटात सहभागी झालेले उदय सांगळे हे उमेदवार आहेत.

दुरंगी व तिरंगी लढती

बागलाण, सिन्नर, निफाड, कळवण-सुरगाणा, दिंडोरी-पेठ, देवळाली, येवला व मालेगाव मध्य.

चौरंगी लढती

नांदगाव, मालेगाव बाह्य, चांदवड-देवळा, नाशिक पूर्व, पश्चिम,

मध्य, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Production : भात, भुईमुगाच्या उत्पादनात आजरा तालुक्यात घट

Sugarcane workers : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊसतोड कामगारांवर काळाची झडप; सीना नदीत ४ ऊसतोड कामगार बुडाले

Solapur Assembly Constituency : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघांसाठी ३८५ अर्ज दाखल

Sugar and Ethanol : साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलची खरेदी किंमत वाढवू; केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशीचे विस्माला आश्वासन

Crop Damage Compensation : सांगलीत अवकाळी, अतिवृष्टिबाधित पिकांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT