Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain 2024 : जूनमध्ये पाऊस कमीच

Team Agrowon

Pune News : मॉन्सूनची वाटचाल थांबल्याने पावसातही खंड पडला आहे. मॉन्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी काहीशी वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी (९२ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनच्या अखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे.

जूनमध्ये देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (९२-१०८ टक्के) अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला होता. जूनमध्ये देशात सरासरी १६६.७ मिलिमीटर पाऊस पडतो. सुधारित अंदाजानुसार देशात ९२ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात दक्षिण द्वीपकल्प तसेच महाराष्ट्रासह लगतच्या मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक, तर वायव्य आणि ईशान्य भारताच्या काही भागात सरासरी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जूनमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो. जून महिन्यात १८ जून पर्यंत देशात सरासरी ८०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ६४.५ टक्के म्हणजेच उणे २० टक्के पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यातही वायव्य भारतात (उणे ७० टक्के) मध्य भारतात (उणे ३१ टक्के) तर पूर्वोत्तर राज्यात (उणे १५ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे.

जून महिन्यातही उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात १०५.८ मिलिमीटर (अधिक ३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. यात मध्य महाराष्ट्र (अधिक ३१ टक्के) आणि मराठवाड्यात (अधिक ६३ टक्के) पावसाची तर कोकणात (उणे २५ टक्के) आणि विदर्भात (उणे ३० टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा १९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला. रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने सहा दिवस आधीच मोसमी वारे पूर्वोत्तर राज्यात दाखल झाले. केरळमध्ये देखील दोन दिवस आधीच (३० मे) दाखल झालेल्या मॉन्सूनने अरबी समुद्रातून वेगाने प्रवास करत १२ जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात मजल मारली. पूर्व भारतात ३१ मे नंतर आणि महाराष्ट्रात १२ जून नंतर मॉन्सूनची वाटचाल थांबलेली आहे. दोन दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन पुढील प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे.

जुलैमध्ये ‘ला-निना’ची शक्यता

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती निवळून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य (एन्सो न्यूट्रल) स्थितीत आले आहे. या भागात जुलै महिन्यात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात ‘ला-निना’ तयार होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. हिवाळ्यातही ही स्थिती कायम राहणार असून, नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात ‘ला-निना’ची शक्यता सर्वाधिक ८५ टक्के असल्याचे नोवा या अमेरिकन हवामान संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

पुणे : जूनमध्ये देशात पडणाऱ्या पावसाची शक्यता (सौजन्य : हवामान विभाग)

पिवळा रंग : सरासरीपेक्षा कमी

हिरवा रंग : सरासरी

निळा रंग : सरासरीपेक्षा अधिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT