Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Maharashtra Kharif Season: राज्याचा खरीप पेरा आता अंतिम टप्प्यात आहे. भाताची पुनर्लागण वगळता सर्व पिकांच्या पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. आतापर्यंत एकूण पेरा ९२ टक्के झाला आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्याचा खरीप पेरा आता अंतिम टप्प्यात आहे. भाताची पुनर्लागण वगळता सर्व पिकांच्या पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. आतापर्यंत एकूण पेरा ९२ टक्के झाला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यात खरिपाच्या सरासरी १४४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २८ जुलैअखेर १३२ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा १३५ लाख हेक्टरवर झाला होता.

राज्याचे मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा यंदाही दमदार झाला आहे. राज्यात सरासरी ४८ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरले जाते. मात्र यंदा आतापर्यंत हाच पेरा ४८.२३ लाख हेक्टरच्या (१०२ टक्के) पुढे गेला आहे. सोयाबीनच्या तुलनेत कपाशी लागवड मात्र पिछाडीवर आहे. ४२ लाख हेक्टरपैकी ३८ लाख हेक्टर (९० टक्के) क्षेत्रात कपाशी लागवड पूर्ण झाली आहे.

सांख्यिकी विभागाच्या म्हणण्यानुसार, १५ लाख हेक्टरवरील भात क्षेत्र राज्यात खरिपाचे तिसरे मुख्य पीक गणले जाते. परंतु आता हळूहळू तिसऱ्या पिकाचा मान मक्याकडे जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ९.३३ लाख हेक्टर इतकेच होते. परंतु यंदा मक्याचा पेरा १३.८४ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्यात धान्य आधारित आसवनींची संख्या आणखी वाढल्यास मका लागवड पुढील काही हंगामात वेगाने पुढे जाऊ शकते. सध्या मका लागवड सरासरी क्षेत्राच्या १४८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

ज्वारी, नाचणीचा पेरा कमी

भात रोपवाटिकांचे नुकसान झाल्यामुळे राज्याच्या काही भात उत्पादक पट्ट्यांत यंदा लागवड कमी झालेली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, आतापर्यंत १५ लाख हेक्टरपैकी ८.९३ लाख हेक्टरवर (५९ टक्के) भाताची पुनर्लागण झालेली आहे. राज्यात यंदा खरीप ज्वारी व नाचणीचे क्षेत्र कमालीचे घटल्याचे दिसून येते. ज्वारीच्या दोन लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या केवळ ४० टक्के, तर नाचणीच्या ७० हजार हेक्टर सरासरी क्षेत्राच्या केवळ ५१ टक्के पेरा झालेला आहे. बाजरीचा पेरादेखील केवळ ३.१३ लाख हेक्टरपर्यंत (६५ टक्के) झाला आहे.

पावसामुळे मशागतीला अडथळे

राज्याच्या काही भागांत अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे मशागतीच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. राज्यात जून ते ऑक्टोबर या खरीप कालावधीत सरासरी १२५६ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा जून व जुलैमध्ये एकूण ४९ दिवसांत ४८६ मिलिमीटर म्हणजे एकूण पावसाच्या ४५ टक्के पाऊस झालेला आहे. जून ते जुलै या कालावधीत १५८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त तर १३६ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.

मात्र, ५४ तालुक्यांमधील पाऊस ७५ टक्क्यांच्या आत असून सात तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. कमी पावसाच्या तालुक्यांमध्ये खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. परंतु नेमकी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

राज्याचा खरीप पेरा येत्या ८-१० दिवसांत संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. काही तालुक्यांत भाताच्या पुनर्लागवडी पिछाडीवर आहेत. मात्र दोन आठवड्यांत पुनर्लागवडदेखील पूर्ण होईल.
रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग
राज्यात १५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रात भात लागवड होत असते. यंदाची लागवड येत्या दोन आठवड्यांत पूर्ण होईल. तसेच भात उत्पादक पट्ट्यात लागवडीसाठी काही अडचण असल्याचे तूर्त तरी दिसून येत नाही.
डॉ. बी. डी. वाघमोडे, भात विषेशज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

September Rain: सप्टेंबरमध्ये विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात सरासरी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

Shet raste GR : शेतकऱ्यांच्या शेत, शिव व पाणंद रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक; वाद टळणार? 

Indian Politics: स्थैर्याची कसोटी पाहणारा ‘सप्टेंबर’

Maharashtra Crop Loss: महाराष्ट्रात पावसामुळे १० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; नांदेडला अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी

Climate Change Impact : उत्तरेकडील राज्यांत ढगफुटी, भूस्खलनात वाढ

SCROLL FOR NEXT