Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये (वनामकृवि) गुरुवार ते शनिवार (ता.२९ ते ३१) या कालावधीत राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन विकास समिती बैठक-२०२५ चे (जॉइंट अॅग्रेस्को) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चार विद्यापीठांचे पिकांचे ३६ नवीन वाण, २१ अवजारे २४७ तंत्रज्ञान शिफारशींचे सादरीकरण करण्यात येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता ‘ॲग्रेस्को’चे उद्घाटन होणार आहे. तसेच, विकसित कृषी संकल्प अभियानचेही उद्घाटन होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सोमवारी (ता.२६) पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाच्या ‘जॉइंट अॅग्रेस्को’चे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद यांच्यातर्फे करण्यात आले आहे. उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.
अध्यक्षस्थानी कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती अॅड. माणिकराव कोकाटे राहणार आहेत. पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषी राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे,
अकोला आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे तसेच कार्यकारी परिषदेचे सदस्य उपस्थित राहतील. कृषी परिषदेचे सर्व संचालक, चारही कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक, ३०० ते ४०० शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.
या वेळी पत्रकार परिषदेस संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ. राजेश कदम आदी उपस्थित होते.
विकसित कृषी संकल्प अभियानाचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन....
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाचे उद्घाटन गुरुवारी (ता.२९) परभणी कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि ५० कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून ४ हजार ५०० गावांत राबविले जाणार आहे. मराठवाडा विभागातील विद्यापीठांतर्गत आठ जिल्ह्यांतील १२ कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून १ हजार ८० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे, असे डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले.
चार कृषी विद्यापीठांचे वाण, तंत्रज्ञान शिफारशी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी : एकूण ५८ शिफारशी, आंबा, राजमा, ज्वारी, तीळ ४ या पिकांचे प्रसारित वाण, १ कृषी अवजार, इतर ५३ तंत्रज्ञान शिफारशी.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला : एकूण १०३ शिफारशी, १० प्रसारित वाण, १२ कृषी अवजारे, इतर ८१ तंत्रज्ञान शिफारशी.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : एकूण ९४ शिफारशी, ९ प्रसारित वाण, ११ पूर्वप्रसारित वाण, ३ कृषी अवजारे, १ जैविक ताण सहन करणारे स्रोत, इतर ७० तंत्रज्ञान शिफारशी.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली : एकूण ५० शिफारशी, २ प्रसारित वाण, ५ कृषी अवजारे, ४३ सुधारित तंत्रज्ञान शिफारशी आहेत. या शिफारशींवर विचारमंथन होऊन शेतकऱ्यांसाठी प्रसारित करण्यासाठी अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. आयसीएआर अंतर्गत नऊ संशोधन संस्थांचे संचालक, शास्त्रज्ञ, विविध विभागाचे आयुक्त, अधिकारी, विभाग प्रमुख, कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक अहवाल, राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञांचे विशेष सादरीकरण होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.