Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : ‘जल जीवन मिशन’च्या कंत्राटदाराला चार लाखांचा दंड

 गोपाल हागे

Washim News : जलजीवन मिशनअंतर्गत मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली असता ते दर्जाहीन असल्याचे आढळल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी योजनेचे कंत्राटदार नितीन जाधव यांना नोटीस बजावत चार लाख ३४ हजार ४०७ रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशनच्या कामाचा पाणी प्रधान सचिवामार्फत राज्यभरातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला. या आढावा सभेत प्रधान सचिव यांनी वाशीममधील जलजीवन मिशनच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांची एक बैठक घेऊन पाच ते दहा दिवसांत सर्वकामे सुरू करण्याबाबत निर्देश दिले होते. जलजीवन मिशनच्या कामामध्ये बांधकाम साहित्याचा दर्जा व पाइपलाइनची खोली याबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी कंत्राटदारांना दिले होते.

जलजीवन मिशनच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्यामुळे वाघमारे यांनी शुक्रवारी (ता. १५) मालेगाव तालुक्यातील वरदरी खुर्द आणि नागरतास या दोन गावांना भेटी दिल्या. तेथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सविस्तर पाहणी केली.

वरदरी खुर्द या गावासाठी ८९ लाख रुपयांची योजना मंजूर असून, पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनियमितता झाली असल्याचे व दिलेल्या मानकानुसार काम केले नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे कंत्राटदाराला दंड ठोठावला.

कंत्राटदाराने पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनची खोली ९० ऐवजी ४५ सेंटिमीटर ठेवली. कार्यस्थळी ठेवण्यात आलेले साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. तसेच योजनेचा माहिती दर्शक फलक मानकानुसार चुकीचा लावला असून त्यावर कलर पेंटिंग ऐवजी रेडियमने अक्षरे लिहिलेली आढळली. या गंभीर बाबींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी कंत्राटदाराला नोटिशीद्वारे सक्त ताकीद देऊन चार लाख ३४ हजार ४०७ रुपये दंडही ठोठावला आहे.

नागरतास येथील कंत्राटदारालाही दंड

नागरतास (ता. मालेगाव) या गावातील पाणीपुरवठा योजनेची वाघमारे यांनी पाहणी केली असता पाण्याच्या टाकीच्या बॉटम स्लॅबचे बार उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर टाकीच्या आवारातील पाइपलाइनचे काम अंदाज पत्रकानुसार केले नसल्याचे आढळून आले. योजनेची माहिती दर्शक फलकसुद्धा व्यवस्थित लावला नव्हता. यामुळे पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार रवींद्र खडसे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT