सौ. सुरेखा बोऱ्हाडे
माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वांत मोठे उदाहरण जिजाबाई आहे. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.
तीनशे वर्षे गुलामगिरी, अन्याय अत्याचाराच्या अंधकारात पिचलेल्या गांजलेल्या स्वकियांना राजमाता जिजाबाईंनी पुत्र शिवरायांच्या रूपाने स्वराज्याचे स्वप्न देत एक नव्या युगाचा, स्वराज्याचा प्रारंभ केला. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात. त्या स्वतंत्र बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्ववान महिला होत्या. आया बहिणींवर होणारे अत्याचार, स्वकियांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी स्वराज्यनिर्मितीचे भव्य दिव्य स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला त्या प्रेरक ठरल्या.
त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. चैतन्यदायी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. माणूस जोडण्याची कला त्यांच्यात होती. शिवरायांबरोबर सर्वांच्या आऊसाहेब होत्या. राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. जिजाबाईंचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी झाला. वडील पती आणि शूर स्वकियांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही मध्ये पराक्रम गाजवूनही सत्ता असली, तरी ‘तेथे’ मानसन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही, याचे विचार जिजाऊंना सतत अस्वस्थ करीत होते. म्हणून स्वतःचा पुत्र शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.
पुत्र शिवरायांच्या समयी गरोदर असताना शिवनेरीच्या दिशेने घोडदौड करणाऱ्या माता जिजाऊने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली. अस्मानी-सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली. फेब्रुवारी १६३० फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाईंनी सद्गुणी पुत्राला जन्म दिला. ‘शिवाई’ देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिवरायांना बालपणापासून ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या जिजाऊ होत्या. स्वराज्यासाठी प्रसंगी शत्रूच्या म्हणजे अगदी मृत्यूच्या तोंडात काळजाच्या तुकड्याला, मुलाला देणाऱ्या वाघाच्या काळजाच्या जिजाऊ म्हणजे धैर्यशील, शूर आई होत्या.
सुलतानशाहीचे लोकांमध्ये असलेले भय, अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी जिजाऊंनी शिवाजीराजांना घेऊन, सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. जिजाबाईंनी शिवरायांना रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. सईबाईंच्या पश्चात नातू संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. शिवाजी राजे आग्ऱ्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी उतारवयातही कौशल्याने पूर्णतः जबाबदारी निभावून नेली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. स्वकियांचे, बहुजन समाजाचे आत्मसन्मानाचे, स्वतंत्रतेचे हे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न जिजाऊंनी प्रत्यक्षात आणले. राजमाता जिजाबाई भोसले यांचे चैतन्यदायी, प्रेरक व्यक्तिमत्त्व आजही संपूर्ण समाजासमोर आदर्श दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. अशा या थोर मातेस विनम्र अभिवादन!
९१५८७७४२४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.