Water Fodder Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष

Fodder Shortage : मागील वर्षाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने यंदा बहुतांश गावांत चारा, पाणीटंचाई आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : मागील वर्षाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने यंदा बहुतांश गावांत चारा, पाणीटंचाई आहे. अनेक भागांत जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र प्रशासनासह लोकप्रतिनिधी, नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने चारा टंचाई, पाणीटंचाईसारख्या प्रमुख मुद्दे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अपवाद वगळता धरणे भरली नाहीत. शिवाय अधिक काळ नद्या, नाले, झरे वाहिले नसल्याने पारंपरिक विहिरी, हातपंप, विंधन विहिरींच्या पाणी पातळीतही फारसी वाढ झाली नाही. त्याचे परिणाम आता दिसून लागले आहेत. यंदा जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर शासनाने चारा उपलब्ध व्हावा यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र उपलब्ध चाऱ्याचा विचार केला तर शेवटच्या मे, जून महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गावतलाव, पाझर तलाव कोरडे पडले असून विहीरी, हातपंप, विंधन विहिरी तळ गाठत आहेत.

मोठ्या तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी याचे प्रधान्याने नियोजन करण्याची गरज असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनावरे जगवण्यासह पाणीटंचाईवर मात करत फळबागा जगवण्याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यात मतदानाला अजून उशीर असला तरी सत्तेसाठी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप-प्रत्यारोप, उमेदवारीवरून नाराजी, अर्ज भरण्यापासून लोकांना खोटी आश्‍वासने देत मते मिळण्यासाठी आणि पुन्हा कशी सत्ता मिळेल यासाठी होणारी आखणी यात लोकप्रतिनिधी मग्न आहेत.

प्रशासनही मतदान प्रक्रियेची तयारीत गुंतलेले असल्याने चाराटंचाई, पाणीटंचाई याकडे सपशेल दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र लोक त्रस्त आहेत. आमदार, खासदारांसह आता होणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवारी मिळालेले, संभाव्य उमेदवार यावर सध्या एकही शब्द बोलत नाही.

फळबागा कशा जगवाव्यात?

नगरसह नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, सातारा, सांगलीसह मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत फळबागांची संख्या वाढत आहे. मात्र दुष्काळी स्थितीचा फळबागांना फटका बसत आहे. यंदा बहुतांश भागात पाणीटंचाई अभावी फळबागांना सर्वाधिक फटका बसत आहे.

पाण्याची गंभीर समस्या असलेल्या भागात शेततलाव, काही वेळा टॅंकरने फळबागा जगवण्याची धडपड सुरू असते. यंदा तशीच वेळ आली आहे. फळबाग लागवडीसाठी सरकार प्रोत्साहन देत असून, लागवडीला अनुदान देतेय, मात्र लागवड केलेल्या बागा जगवण्यासाठी उपाययोजना करत नाही. पाणीटंचाईमुळे फळबागा जगवाव्यात कशा, असा प्रश्‍न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.

पुरेसा पाऊस झाला नाही की टंचाईला सामोरे जावे लागते. सातत्याने या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्षांनी आता पाणी आणि चारा नियोजन हा प्रमुख अजेंडा झाला पाहिजे. या बाबत लोकांनीही सजग होऊन प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. कारण टंचाईसारख्या समस्येवर लोक बोलत नाहीत. राजकीय पक्षाने चारा आणि पाणी प्राधान्य दिले पाहिजे. बाजारात शेतीमालाला दर नाही. दुधाचे दर पुरेसे मिळत नाहीत. त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पाणी, चाराटंचाईसारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव योजना प्रकल्प व संकल्प समिती, महाराष्ट्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT