Fishing Net Agrowon
ॲग्रो विशेष

Fishing Nets Rule: मासेमारी जाळ्यांबाबत महत्त्वाचे नियम

Fish Conservation: मासेमारी जाळ्यांच्या योग्य आकारामुळे केवळ परिपक्व माशांचीच पकड होते. लहान आणि अल्पवयीन माशांना वाढीसाठी संधी मिळते. या नियमनाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखणे, मत्स्यसाठ्यांची पुनर्निर्मिती सुनिश्‍चित करणे आणि स्थानिक लोकसमुदायांच्या दीर्घकालीन उपजीविकेला आधार देणे हे आहे.

Team Agrowon

महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते

Fishing Net Law: मासेमारी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या उपजीविकेचा आणि खाद्यसुरक्षेचा मुख्य आधार आहे. स्थानिक आणि व्यावसायिक स्तरावर विविध पद्धतींचा वापर करून मासेमारी केली जाते, ज्यामुळे मत्स्यसाठ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठ्या सागरी मत्स्योद्योग असणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतातील सागरी संसाधने अत्यंत वैविध्यपूर्ण आहेत. यांत्रिक मासेमारीच्या आगमनाने झपाट्याने विकसित झाले असले तरी,

या क्षेत्रात आता जास्त भांडवलीकरण, वाढलेली यांत्रिक बोटींची संख्या, मासेमारी जाळ्यांचे झालेले आधुनिकीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटांची चिन्हे दिसू लागली आहेत. कमी होत चाललेला मासेमारीचा दर आणि यामुळे मासेमारांच्या उत्पन्नात होणारी घसरण, जास्त मासेमारी आणि लहान किंवा अपरिपक्व माशांची मासेमारी यामुळे माशांचे साठे कमी होत आहेत. यावर शास्त्रीय पद्धतीने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

मासेमारी जाळ्यांच्या आकाराचे नियमन

मासेमारी जाळ्यांच्या योग्य आकारामुळे केवळ परिपक्व माशांचीच पकड होते, तर लहान आणि अल्पवयीन माशांना वाढीसाठी संधी मिळते. या नियमनाचे उद्दिष्ट पर्यावरणाचे संतुलन राखणे, मत्स्यसाठ्यांची पुनर्निर्मिती सुनिश्‍चित करणे आणि स्थानिक लोकसमुदायांच्या दीर्घकालीन उपजीविकेला आधार देणे आहे. त्यामुळे जाळ्याच्या आकाराचे योग्य नियमन हे शाश्‍वत मत्स्यपालनासाठी आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक ठरते.

जाळ्यांच्या आकाराचे नियमन हे फक्त शास्त्रीय संकल्पना किंवा धोरणात्मक उपाय नसून, ते पर्यावरण, अर्थव्यवस्था, आणि स्थानिक समुदाय यांच्या शाश्‍वततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. हे नियमन केल्याने आपण केवळ सध्याच्या पिढ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यातील पिढ्यांसाठीही मत्स्यसाठे, पर्यावरण, आणि उपजीविका टिकवू शकतो.

मासेमारी व्यवस्थापनासाठी जाळ्यांच्या जाळीच्या आकाराचे नियमन, एकूण माशांच्या आकारावर मर्यादा घालणे, मासेमारीच्या पद्धतींमध्ये निर्बंध, मासेमारीच्या वेळेवर निर्बंध, मासेमारी अधिकारांचे परवाने आणि भाडेपट्टा, सागरी अभयारण्यांची घोषणा हे काही सामान्य दृष्टिकोन आहेत. जबाबदार मत्स्य व्यवसायासाठी म्हणूनच योग्य त्या आचारसंहितेचे पालन मच्छीमार व मत्स्य व्यासायिकांनी करणे जरुरीचे आहे.

३१ ऑक्टोबर १९९५ रोजी अन्न आणि कृषी संघटनेने एकमताने स्वीकारलेला हा कायदा, पर्यावरणाशी सुसंगत राहून, जलचर सजीव संसाधनांचे शाश्‍वत मासेमारी सुनिश्‍चित करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांसाठी आवश्यक चौकट प्रदान करतो. मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनात, हा कायदा उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित संवर्धन आणि व्यवस्थापन उपायांचे समर्थन करतो. विशिष्ट उद्देश नजरेसमोर ठेवून शाश्‍वत मासेमारी करून, भविष्यासाठीही मत्स्यसाठे उपलब्ध व्हावेत, यासाठी हे निर्बंध पाळणे गरजेचे आहे.

मुख्य उद्दिष्टे

लहान माशांचे संरक्षण

जाळीच्या आकाराचे नियमन करण्याचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे परिपक्व आणि प्रजननक्षम माशांचे संरक्षण करणे. मोठ्या जाळ्यांचा वापर केल्यास फक्त मोठ्या आकाराचे मासे पकडले जातात, ज्यामुळे तरुण माशांना वाढण्याची आणि प्रजनन करण्याची संधी मिळते. हे साठ्यांची पुनर्निर्मिती सुनिश्‍चित करते. यामुळे लहान माशांना परिपक्व होण्यासाठी वेळ मिळतो, ज्यामुळे मत्स्यसाठा दीर्घकाळासाठी टिकून राहतो.

ट्रॉल जाळ्यांचा कॉड एण्ड जाळीचा आकार भारतातील सागरी राज्यांच्या सागरी मासेमारी नियमन कायद्यांद्वारे (MFRAs) नियंत्रित केला जातो. असे नियामक उपाय मासेमारी तसेच समुद्री अन्न निर्यात उद्योगाच्या दीर्घकालीन शाश्‍वततेसाठी आवश्यक आहेत. याद्वारे जाळ्याचा आस चौकोनी ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. सुटकेचा मार्ग किंवा मार्ग शोधण्यासाठी मोठी ऊर्जा खर्च न करता चौकोनी जाळीमुळे लहान मासे जाळ्यातून सहज सुटू शकतात. लहान माशांना वगळण्याचा प्रयत्न करताना हे महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्यात सामान्यतः पोहण्याचा वेग आणि तग धरण्याची क्षमता नसते.

लहान कोळंबी, लहान आकाराचे मासे आणि लहान खेकडे, समुद्री अर्चिन, इतर कवचधारी जलचर इत्यादींना चौकोनी जाळीच्या कॉड एण्डमधून बाहेर पडणे सोपे जाते. नको असलेले आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांना पकडू नये म्हणून चौकोनी जाळी वापरण्याचा म्हणूनच आग्रह आता धरला जातो.

जैवविविधतेचे संरक्षण

योग्य आकाराच्या जाळ्यांमुळे केवळ इच्छित प्रजातींचीच पकड होते, तर इतर प्रजाती किंवा समुद्री जीवांना (उदा. समुद्री कासव आणि सस्तन प्राणी) अडकण्याचा धोका कमी होतो. यामुळे पर्यावरणातील जैवविविधतेचे संरक्षण होते, समुद्री पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

मत्स्यसाठ्यांची शाश्‍वतता

जाळीच्या आकाराचे योग्य नियमन हे मच्छीमारांसाठी शाश्‍वत मासेमारी सुनिश्‍चित करते, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा आधार टिकून राहतो.

दीर्घकालीन आर्थिक लाभ साधण्यासाठी अल्पकालीन नफा टाळणे हे यामागील उद्दिष्ट आहे. मत्स्यपालन उद्योगाची सातत्यपूर्णता आणि उत्पादनक्षमता सुनिश्‍चित करते.

धोक्यातील प्रजातींचे संरक्षण

काही विशिष्ट प्रजाती जे संख्येने कमी आहेत किंवा धोक्यात आहेत (उदा पाकट, मुशी), त्यांचे संरक्षण करणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

लहान जाळ्यांच्या वापरामुळे या प्रजातींच्या पुनरुत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

मच्छीमारांच्या भविष्याचे संरक्षण

जाळीच्या आकाराचे नियमन मच्छीमारांच्या भविष्याची शाश्‍वती देते. शाश्‍वत मासेमारीच्या तत्त्वांचा अवलंब केल्याने त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी साठा टिकून राहतो, ज्यामुळे त्यांची दैनंदिन उपजीविका सुरक्षित होते.

समुद्रातील अन्नसाखळीचे संतुलन

समुद्रातील सर्वच जीव हे एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे, जाळीच्या आकाराचे नियमन केल्याने अन्नसाखळीचे संतुलन राखले जाते.

विशिष्ट प्रजातींच्या अत्याधिक शोषणामुळे अन्नसाखळीत बिघाड होऊ शकतो, जो समुद्री पर्यावरणावर आणि इतर प्रजातींवर प्रतिकूल परिणाम करू शकतो.

निर्बंध न पाळल्यास होणारे परिणाम

मासेमारी जाळ्यांवर ठरवलेले निर्बंध न पाळल्यास जल क्षेत्रातील, विशेषतः समुद्रातील मासळीचे साठे कमी होतील. परिणामी मच्छीमारांमध्ये गरिबी आणि बेरोजगारी वाढेल.

जाळ्यांच्या आसावरील निर्बंध न पाळल्याने माशांच्या साठ्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम गंभीर असू शकतात. योग्य जाळी आकाराच्या अभावामुळे लहान मासे आणि इतर अनावश्यक प्रजाती पकडल्या जातात.

जाळीचा आकार नियंत्रित न केल्यास गाभोळी म्हणजेच अंडी असणाऱ्या माशांची पकड होते. अनियंत्रित जाळ्यांमुळे पकडलेले मासे कमी दर्जाचे असतात, ज्यामुळे बाजारभाव कमी मिळतो आणि मासेमारी करणाऱ्यांना आर्थिक तोटा सोसावा लागतो.

अंदाधुंद मासेमारीमुळे केवळ मासेच नाही तर प्रवाळ, स्पॉन्जेस, येथील सागरी शैवालासारख्या वनस्पती आणि एकूणच समुद्रतळ अशा पर्यावरणीय घटकांचे नुकसान होते.

शाश्वत मासेमारी व्यवस्थापनासाठी मत्स्यजाळ्यांच्या आकाराचे नियमन आवश्यक आहे. पर्यावरणीय कायद्यांचे पालन आणि जबाबदार मासेमारी पद्धती अवलंबल्याने मासेमारी उद्योग टिकून राहील.

मोठ्या आसाच्या जाळ्यांचा वापर लहान माशांना पळून जाण्याची संधी देतो, ज्यामुळे ते पुढे वाढू शकतात आणि प्रजनन करू शकतात.

टर्टल एक्सट्रुडर डिव्हाइस (TED) जाळ्याला बसवल्याने त्यात अडकणाऱ्या कासवांना जाळ्यातून सुटून जात येते. यामुळे प्रजाती टिकून राहतात.

जाळीच्या आकाराचे नियमन निरोगी माशांची लोकसंख्या राखण्यात, जैवविविधता टिकवून ठेवण्यात आणि जलीय परिसंस्थेची दीर्घकालीन लवचीकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जबाबदार मासेमारी पद्धती अवलंबल्याने आणि चौरस जाळ्यांचा वापर करून, मासेमारी उद्योग शाश्‍वत आणि पर्यावरणपूरक बनविता येऊ शकतो.

- डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२ (विभाग प्रमुख, मत्स्य जीवशास्त्र, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT