Akola News : पश्चिम विदर्भातील अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चांगल्या पावसामुळे अनेक जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः काटेपूर्णा, वाण, खडकपूर्णा व पेनटाकळी या प्रमुख धरणांत साठा झपाट्याने वाढला आहे.
त्यामुळे आगामी काळात या भागातील पाणीटंचाईचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. अजूनही पावसाचे दोन महिने बाकी असताना आधीच पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाल्याने संबंधित प्रशासन, शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही वाढ
बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, नळगंगा आणि पेनटाकळी या प्रमुख जलसाठ्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पात सध्या ४६.४८ दलघमी पाणीसाठा असून तो ४९.७६ टक्के भरला आहे. नळगंगा प्रकल्पात ३२.०६ दलघमी (४६.२५ टक्के), पेनटाकळी प्रकल्पात ४२.१७ दलघमी (७०.३१ टक्के) साठा झालेला आहे.
जुलै महिन्यामध्ये सकारात्मक परिणाम
धरण क्षेत्रात जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यांमध्ये ही वाढ झाली आहे. एकूणच या साठ्यामुळे कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होण्याची शक्यता असून, सिंचनासाठीही हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. यावर्षीचा जून महिना कोरडा गेला होता. मात्र,जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
नजर आगामी महिन्यांवर
सद्यःस्थितीत पश्चिम विदर्भातील बहुतांश प्रकल्प ४५ ते ७० टक्क्यांपर्यंत भरले आहेत. आणखी दोन महिने पावसाचा कालावधी उरलेला असल्याने यंदाही काही प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अकोला जिल्ह्यातील स्थिती समाधानकारक
अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा व वाण हे दोन प्रमुख प्रकल्प असून याशिवाय मोर्णा, निर्गुणा व उमा हे मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहेत. जिल्ह्यात एकूण २४ लघुपाटबंधारे प्रकल्पदेखील कार्यरत आहेत. पातूर तालुक्यातील निर्गुणा प्रकल्पाने पंधरा दिवसांपूर्वीच १०० टक्के साठा गाठला असून मोर्णा प्रकल्पातही ७१.१९ टक्के साठा झाला आहे.
काटेपूर्णा प्रकल्पामध्ये सध्या ४१.४९ दलघमी साठा झाला असून त्याचे प्रमाण ४८.१६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर वाण प्रकल्पात ४१.६४ दलघमी साठा असून ५०.८१ टक्के साठा झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत वाण प्रकल्पात २४ दलघमी साठा होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.