Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Rain : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Team Agrowon

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात मागील तीन दिवसांपासून सुरू झालेला पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २२० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणांत वेगाने आवक सुरू असल्याने राज्यातील तब्बल ५३ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

कोकणात जोरदार पाऊस

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. रायगडमधील महाड, नाटे, तुडील येथे ८६ मिलिमीटर, पोलादपूर, वाकण ८२, कोंडवी, करंजवडी ७७ मिलिमीटर पाऊस झाला. रत्नागिरीत वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

पावसामुळे समुद्र खवळलेला असून मुंबईसह परजिल्ह्यातील चारशेहून अधिक नौका सुरक्षेसाठी जयगड, हर्णै बंदरात दाखल झाल्या आहेत. तसेच कोल्हापूर-राजापूर मार्गावरील अणुस्कूरा घाट सलग तिसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद आहे. जिल्ह्यातील खेर्डी, धामणंद ८४, कळकवणे, आंगवली ८९, शिर्शी ८५,दाभीळ ९२, आंगवली येथे ८९ मिलिमीटर पाऊस झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री दीडच्या सुमारास आखवणे येथील एका घरावर वीज कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. समुद्रातही वादळसदृश स्थिती कायम असून मासेमारीला ब्रेक लागला आहे.

जिल्ह्यात श्रावण येथे ८६ मिलिमीटर, तर पोइप ८३, सावंतवाडी, बांदा, आबोली ९२, फोंडा ९२, कडावल, कसाल ८०, तळवट ८४ मिलिमीटर, तर पालघरमध्ये कडूस येथे ९२ मिलिमीटर, तर डहाणू, मालयण, कसा ८९, बोयसर ९८, मोखडा ९९, तलसरी ८८, झरी येथे ९७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भातसा, धामणी, अप्पर वैतरणा अशा काही महत्त्वाच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार सरी :

खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. तर धुळे, जळगावमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे गिरणा, वाघूर, हतनूर अशा प्रमुख धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली असून हतनूर धरणांतून जवळपास ८९ हजार ९९८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदीत करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. यामध्ये मुल्हेर येथे ८७ मिलिमीटर, कनाशी ८२, जागमोडी ९७, त्र्यंबकेश्वर, वेळुंजे ९३, हरसूल, थानापाडा ८०, दहादेवाडी ९९ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यामुळे दारणा, गंगापूर, गिरणा या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पुण्यातील टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १३० मिलिमीटर पाऊस पडला. धरणांतील पाण्याच्या आवकेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण २६ धरणांमध्ये २१.६१ टीएमसी एवढ्या नव्याने पाण्याची आवक झाली असून २४ धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पाण्याचा मुठा, पवना, आरळा, भीमा, इंद्रायणी, भामा, कऱ्हा, नीरा, कुकडी, घोड या नद्यांना विसर्ग सोडण्यात आला आहे.

सांगलीत गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

वारणा धरणाच्या वक्रद्वारमधून १००० क्युसेक व विद्युत जनित्रामधून १४६५ क्युसेक असा एकूण २४६५ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडला असल्याने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात केळघर येथे ८६ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कोल्हापुरातील सरवडे येथे ९०, कसबा ८०, कोंडगाव ८३, आजरा, गवसे ९६ मिलिमीटर पाऊस झाला.

राधानगरी धरणाचे दरवाजे अद्याप उघडलेलेच असल्याने पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी, गगनबावडा, चंदगड, आजरा तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत.

राधानगरी धरणाचे तीन ते चार दरवाजे पावसाचा जोर कमी जास्त झाल्यानंतर सुरू-बंद होत आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी सोमवारी दोनपर्यंत २८.३ इंचांपर्यंत पोहोचली आहे. विविध नद्यांवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

या बंधाऱ्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. राधानगरीत सर्वाधिक ८० मिमी पाऊस नोंदवला गेला. काळम्मावाडी धरण ९० टक्के भरले आहे. नृसिंहवाडीत कृष्णेची पातळी सात फुटांनी वाढली आहे.

मराठवाडा, विदर्भात हलक्या सरी :

विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या आठवडाभर अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, भागडी येथे ४४ मिलिमीटर पाऊस झाला असून उर्वरित भागात तुरळक सरी कोसळत आहे. त्यामुळे शेतात अजूनही पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

बिरवडी ११६, खारवली १३१, कणकवली ११४, सांगवे ११४, वाडा, कोणे १३०, कांचगड १००, साइवन १२३, मनवर, जव्हार, साखर १०२, विक्रमगड १०९, तलवड १२३, खोडला ११७, बाऱ्हे, मनखेड, नाशिक १८३, बोरगाव, दळवट १२८, ननाशी १४४, कोशिंबे १८०, इगतपुरी १०६, धारगाव ११२, पेठ १०२, तळोदा १२७, बोरद, प्रतापपूर १०३, रोशनमाळ १३२, चुलवड १३३, खुंटामोडी, अक्कलकुवा १४०, खापर १४७, दाब १३३, मोलगी, वडफळी १६५, माले, मुठे ११०, भोलावडे १२९, आंबवडे, निगुडघर १६३, कार्ला १०८, वेल्हा २११, पानशेत १११, विंझर ११७, बामणोली ११०, महाबळेश्‍वर १३३, तापोळा १२८, लामज १४२, राधानगरी १००.

पाऊस दृष्टिक्षेपात

- नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसदृश पाऊस.

- मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस.

- नगर, सोलापूर तुरळक सरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT