Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Retreating Monsoon : मॉन्सूनोत्तर पावसाचा यवतमाळ, अमरावतीला फटका

Team Agrowon

Nagpur News : अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांना मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसत पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात वीज कोसळल्याने दोन ठार तर पाच महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. तीन म्हशी आणि सहा बकऱ्या देखील दगावल्या आहेत. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तिवसा तालुक्‍यात शनिवारी (ता. १९) सायंकाळी इसापूर शिवारात सोयाबीन मळणीचे काम सुरू होते. आकाशात ढग दाटून आल्याने मजुरांनी घरी परतण्यास सुरुवात केली. याच मजुरांवर वीज कोसळली. यामध्ये ओजाराम अमरलाल मसराम (वय ३५, रामनगर, मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला. नीलम लालसिंग धुर्वे (वय १८), सुनीता सुजाण धुर्वे (व ३८), संगिता संजय मसराम (वय १७), रमाबाई येनू सरपाम (व १८), पूनम सुजाण धुर्वे (वय १०) हे पाच मजूर गंभीर जखमी झाले. तिवसा पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर सोपस्कार केले.

फत्तेपूरचे माजी सरपंच संजय इंगळे, इसापूरचे पोलिस पाटील दिनेश ठाकरे यांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीता धुर्वे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वीज हानीची दुसरी घटना चिखलदरा शहरातील अप्पर प्लेटोस्थित प्रोस्पेक्‍ट पॉइंटनजीक वन खंड क्र.४० गाविलगड परिक्षेत्रात घडली. या ठिकाणी शनिवारी (ता. १९) सायंकाळी अचानक विजांसह पावसाला सुरुवात झाली.

यामध्ये तीन म्हशींसह पशुपालक गुलाब लक्ष्मण खडके (वय ६५, रा. पांढरी) हे ठार झाले. वनरक्षक मुकेश जावरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. नांदगाव खंडेश्‍वर परिसरातील उभ्या व काढणी करुन ठेवलेल्या पिकांना याचा सर्वाधीक फटका बसला. तालुक्‍यातील माहुली चोर परिसरात शेतात सोंगणी करुन ठेवलेले सोयाबीन भिजले. त्यासोबतच बोंडातील कापूसही ओला झाल्याने त्याचा प्रतवारीवर परिणाम होणार आहे.

चांदूर रेल्वे तालुक्‍यातील मांजरखेड, कसबा, बासलापूर, चिरोडी परिसरातही पावसाने शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले. तिवसा तालुक्‍यातील मोझरी येथे मधुकर उमप यांच्या घरावर वीज कोसळली. या घटनेत त्यांच्या घराचा काही भाग खसल्याची माहिती आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या मंडपाचेही पावसाने नुकसान झाले.

मोबाइलचे झाले तुकडे

चिखलदरा येथे वीज कोसळून ठार झालेल्या गुलाब खडके यांच्या हातातील मोबाइलचे तुकडे घटनास्थळी होते. कदाचित ते मोबाइलवर बोलत असताना अचानक त्यांच्याकडे वीज झेपावल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यालाही फटका

यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद करण्यात आली. यवतमाळ बाजार समितीमध्ये उघड्यावर असलेला शेतकऱ्यांचा माल भिजल्याने मोठे नुकसान झाले. व्यापाऱ्यांचा माल शेडमध्ये तर शेतकऱ्यांचा उघड्यावर ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येकवेळी नुकसान सोसावे लागते. बाजार समिती प्रशासनाच्या या धोरणाविषयी शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या

विदर्भातील सर्वच जिल्हे प्रभावित

अकोला ५१, अमरावती ५.२, बुलडाणा ३७.७, ब्रम्हपुरी ०.३, चंद्रपूर ४, गडचिरोली ८.४, नागपूर २.२, वर्धा १०.४ वाशीम ४.२, यवतमाळ ८ मिलिमीटर याप्रमाणे पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने केली दाणादाण

Kolhapur Vegetable : कोल्हापूर बाजारात पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली, दरात वाढ

Onion Seed Production : उत्तम बियाण्यांसाठी शास्त्रीय कांदा बीजोत्पादन

Soybean Market : सोयाबीनचे दर पाच हजारापर्यंत जातील का?

Indian Politics : रिश्ते नये, सोच वही !

SCROLL FOR NEXT