Bison Sugarcane Damage : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यात गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून काही गवे वास्तव्यास असल्याने काही गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
हातकणंगले तालुक्यातील गारदे रान, चांभारखडी, शिवराम दरा, रोंगे दरा या परिसरात गव्यांच्या कळपाचे वास्तव्य असून, त्यामध्ये १८ लहान मोठे गवे आहेत. त्यांनी या भागातील मका व ऊस फस्त केला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
गेल्या महिन्यात याच भागातील शाळू, ज्वारी पिकाची शेती या गव्यांनी फस्त केली होती. काही शेतकऱ्यांना तर केवळ वैरणीवरच समाधान मानावे लागले होते. हातातोंडाशी आलेले शाळू पीक गव्यांनी खाल्ल्याने या भागातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते.
गावातील शेतकरी निवृत्ती दत्तू पाटील यांनी मचाण बांधून त्यावर रात्र काढून शाळूची राखण केली होती. आता त्यांच्याच ऊस, मक्याच्या शेतीचे नुकसान होत आहे. दररोज रात्री नऊ ते दहा या वेळेत गव्यांचा कळप शेतात ऊस व मका खाण्यासाठी येतो. गव्यांच्या भीतीने काही शेतकरी रात्रीच्या वेळी रानात जात नाहीत.
परिसरात पाण्याचे तलाव तसेच पोहाळे भागात हिरवीगार ऊस व मका शेती आहे. त्यामुळे गव्यांनी हा परिसर सोडलेला नाही. गव्यांनी ऊस व मका शेती फस्त केली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गव्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत.
- निवृत्ती पाटील, शेतकरी, पोहाळे तर्फ आळते
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.