Chh. Sambhajinagar News : तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला नाही. पण, ऊसतोड मात्र सुरू केली आहे. मागील आठवड्यापासून ऊसतोड टोळ्या वाळूज परिसरात दाखल झाल्या आहेत. मात्र, दर जाहीर न केल्याने समस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांत संतप्त भावना आहेत.
तालुक्यातील साखर कारखान्यांनी तातडीने उसाचा दर जाहीर करण्याची मागणी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. परिणामी, भूगर्भातील पाणीपातळी खाली गेल्याने बागायती क्षेत्रातील विहिरींनी तळ गाठला होता. त्याचा विपरित परिणाम उसाच्या लागवडीवर होऊन वाळूज भागात उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती.
बहुतेक शेतकरी कापूस, तूर, सोयबीनसारख्या नगदी पिकांकडे वळला होता. यंदा मात्र वरुणराजाने परिसरावर मोठी कृपादृष्टी केल्याचे जाणवते. अगदी जूनच्या सात तारखेपासूनच पावसाला सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर परिसरातील विहिरींना बऱ्यापैकी पाणी असणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांकडे उसाचे पीक राहिले.
पूर्वी तालुक्यात धामोरी शुगर मिल हा एकच साखर कारखाना होता. मात्र, गेल्या वर्षीपासून तालुक्यातील गंगापूर सहकारी साखर कारखानाही सुरू झाला आहे. यंदा परिसरात उसाचे क्षेत्र कमी आहे.
परिणामी, आपल्यालाच जास्त प्रमाणावर ऊस मिळावा, या आशेने दोन्ही साखर कारखान्यांनी बहुतेक ऊस पिकाच्या नोंदी केल्या आहेत. साधारण दसरा सणाला साखर कारखान्याचे बॉयलर पेटतात. यंदा, मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबरला गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.
शेतकऱ्यांना दिलासा द्या
साखर कारखान्यांनी यंदा ऊसतोडीला मोठ्या उत्साहात प्रारंभ केला. वाळूजच्या विविध भागांत ऊसतोड टोळ्यांनी आपले बस्तान बसविले. अनेक बागायतदारांच्या ऊसतोडी होऊन पूर्ण वाहतूकही झाली. मात्र, गंगापूर सहकारी साखर कारखाना किंवा धामोरी शुगर मिल साखर कारखान्यांनी अद्याप उसाचा दर काय देणार, याची घोषणा केलेली नाही.
त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत संतप्त भावना आहेत. आठवड्यापासून ऊसतोड टोळ्या फडात सर्रास ऊसतोड करीत आहेत. तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांनी ताबडतोब उसाचा दर जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.