Sangli News : यंदा नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर मात करुन मिरज पूर्व व कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ झाला आहे. कोंगनोळीतील द्राक्षांची ३०० ते ४०१ प्रति चार किलोस रुपयांनी खरेदी केली जात आहे.
बदलत्या हवामानाचा सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्यामुळे वर्षानुवर्षे द्राक्षबागांचे क्षेत्र कमी होत असताना मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आगाप जुलै-ऑगस्ट महिन्यांत छाटण्या घेतलेल्या द्राक्ष बागांचेही मिलीबग्ज, कुजवा, नत्रगाठीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनावर परिणाम झाल्याचे बागायतदारांनी सांगितले.
कोंगनोळी-सलगरेतील येथील बागायतदारांनी आगाप फळ छाटणी घेऊन अवकाळी पावसापासून संरक्षण होण्यासाठी बागेवरती प्लॅस्टिक आच्छादन घालून द्राक्षाबागा पिकविण्याचा प्रयत्न असला, तरीपण हवेतील बदलांमुळे द्राक्षांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने महागड्या कीटनाशकांचा वापर करून चांगला दर मिळविण्यासाठी बागायतदार प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी कोंगनोळी येथील नंदकुमार ढवळे यांच्या द्राक्षास ५०० रुपयांचा उचांकी दर मिळाला होता.
मात्र या वर्षी महिनाभरापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे व थंडीमुळे परिपक्व झालेल्या द्राक्ष घडामध्ये मणी क्रॅकिंग होत असल्याने निर्यातक्षम द्राक्षास सध्या ४०० ऐवजी ३०० ते ३१५ रुपयांपर्यंत कमी दर मिळाल्याचे बागायतदार राहुल मलमे यांनी सांगितले. बदलते हवामान आणि परतीच्या पावसाने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे या वर्षीही चांगल्या प्रतीची द्राक्ष मिळणे कठीण झाले आहे.
द्राक्षांवरील रोगांसह परतीचा पाऊस, वातावरणातील बदलत्या संकटाचा सामना करीत मिरज पूर्वभागातील सलगरे, चाबुकस्वारवाडी, बेळंकी, विकासनगर, संतोषवाडी, कदमवाडी, खटाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी, कुटकोळी, करोली (टी.) परिसरातील शेतकऱ्यांनी जुलै-ऑगस्ट महिन्यात आगाप छाटण्या घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षांची बंगळूर, तमिळनाडू, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. सलगरे, कोंगनोळी परिसरात अद्याप काही बागांतील द्राक्षविक्री होत असून या परिसरात द्राक्ष हंगामास सुरुवात झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.