Mr. Rambhau Dhebe and Mrs. Sakhubai Rambhau Dhebe Agrowon
ॲग्रो विशेष

Inspiring Farmer Story: वाघदऱ्याच्या गुहेतील वाघ अन् वाघीण

Rural Success: गावाच्या जंगलातील सतीच्या माळावर शेतकरी रामभाऊ ढेबे आणि सौ. सखूबाई रामभाऊ ढेबे यांनी संसार थाटला आहे. गरिबीच्या अंधाऱ्या गुहेत राहून या दोघांनी फुलविला ३० वर्षांचा संसार आता प्रगतीच्या प्रकाशाने लखलखतो आहे.

मनोज कापडे

Village Life Story: इंग्रज लेखक जेम्स डगलस १८८० मध्ये सह्याद्रीत आला होता. तो मुठा, गुंजन, कानंद खोऱ्यात फिरला. शिवरायांच्या स्वराज्याचे तोरण असलेला बेलाग गिरिदुर्ग तोरणा बघता चकित झालेल्या डगलसने ‘तोरणा म्हणजे गरुडाचे घरटेच आहे,’ असे गौरवाने लिहून ठेवले आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील तोरणाच्या जंगलात एक वाघदरा गाव आहे.

गावाच्या जंगलातील सतीच्या माळावर शेतकरी रामभाऊ ढेबे आणि सौ. सखूबाई रामभाऊ ढेबे यांनी संसार थाटला आहे. तोरणा घेऱ्यातील जंगलात कोणी चुकला, भरकटला तर त्याला ढेबे परिवार दिसतो. गर्द झाडीत लपलेला सतीचा माळ अगदी हिरव्या गुहेसारख्या दिसतो. गरिबीच्या अंधाऱ्या गुहेत राहून या दोघांनी फुलविला ३० वर्षांचा संसार आता प्रगतीच्या प्रकाशाने लखलखतो आहे. सखुबाईच्या माहेरची कहाणी मनाला चटका लावणारी आहे.

पित्याने सखूला सांभाळले

घाटमाथा आणि कोकणला जोडणाऱ्या सह्याद्री रांगेतील डोपेखिंडीचे शेतकरी धोंडू कचरे यांची मुलगी म्हणजे सखू. आई रमाबाईला एकूण पाच मुली आणि एक मुलगा. त्यावेळी सह्याद्रीतील मूळ डोंगरवासियांना पुरेसे अन्नदेखील मिळत नव्हते. आई स्वतः शेती करून मुलांसाठी मजुरी करायची. शेतमालकाने दिलेली भाजीभाकरी उपाशी राहून घरी आणायची व सखू आणि तिच्या भावंडांना खाऊ घालायची. एकदा काम आटोपून संध्याकाळी भाकरी घेऊन जंगलवाटेने सखूची आई घराकडे निघाली. वाटेत तिला विचित्र आवाज येत असल्याचा भास झाला.

त्या आवाजाने आई तापाने फणफणली. तिने अंथरूण धरले ते कायमचे. आई वारली तेव्हा सखू अवघी एक वर्षाची होती. आई गेल्यावर वडील धोंडू कचरे यांनी १० जनावरे, शेती सांभाळून सखूला डोपेखिंडीत वाढवले. इकडे वाघदऱ्यात रामभाऊ ढेबे यांनाही वडील नव्हते. डोपेखिंडीतला कचरे परिवार आणि वाघदऱ्यातला ढेबे परिवार यांचे नातेगोते होते. एक दिवस रामभाऊ स्वतःच डोपेखिंडीत पोहोचला आणि त्याने सखूसाठी तिच्या वडिलांकडे मागणी घातली. सह्याद्रीतील तेव्हाची रीतीरिवाज वेगळा होता.

आतासारखा मुलीला हुंडा द्यावा लागत नव्हता; तर मुलाला सासरच्या मंडळींना रोख रक्कम द्यावी लागत असे. सखूच्या वडिलांनी जावई पसंत केला. मात्र सात हजार रुपये मागितले. रामभाऊंनी पैसे जमविले आणि वाघदऱ्यातील सतीच्या माळावर त्याचे सखूशी लग्न लागले. लग्नाला वरण-भात असा साधा बेत होता. तोरणाच्या जंगलातील सासरघरी सखू आली तेव्हा तिच्या नशिबी २४ तास कामाशिवाय काहीच नव्हते. घरकाम करून ५० गुरांसह पाच बकऱ्यांना चारण्यासाठी जंगलात न्यावे लागत होते. माळावर पाणी नसल्यामुळे डोंगराखाली भट्टी गावातील विहिरीवरून पाणी आणावे लागे. पण तिने आनंदाने संसार केला.

जिद्दी सखूचा एक निर्धार

दीर मालू, जाऊ बनाबाई आणि सासू भागाबाईने सखूला जीव लावला. मात्र सखूने एक निर्धार केला. माझ्यासारखं डोंगरातलं दारिद्र्याचं जिणं माझ्या मुलामुलींच्या वाट्याला मी कधीही येऊ देणार नाही. सखूने निर्धार केला खरा; पण त्यासाठी तिला सुखाचा त्याग आणि श्रमाची परिसीमा गाठावी लागणार होती. त्यातच पुणे शहरातल्या धनदांडग्यांनी सखू आणि रामभाऊची शेतजमीन हडप केली. परंतु सखू जिद्दी निघाली. डोंगरात खेळणाऱ्या स्वतःच्या तान्ह्या मुलांकडे पाहून सखू अस्वस्थ होत असे.

मुलांसाठी मी काय करू शकते, कुठे पैसा उभा राहील, मुले कशी शिकतील, याच विवंचनेत सखू राहत असे. मात्र तिला मार्ग मिळेना. तो मार्ग शोधला अखेर तिचा मुलगा दत्तू याने. तिसरीत शिकणारा दत्तू एकदा ताकाची किटली घेऊन तोरणा किल्ल्यावर ताक विकायला गेला. त्याला पाच रुपये मिळाले. घरात लक्ष्मी येण्याचा मार्ग सखूला सापडला. मग ती स्वतः मुलांना घेऊन डोक्यावर २०-२५ किलोचा बोजा घेत रोज किल्ला चढू लागली.

लोकांना ती ताक, दही, लिंबूपाणी विकू लागली. ताकाच्या पैशातून सखूने सर्व मुलांना शिक्षण दिले. रोहिणी व सुनीताला बारावीपर्यंत, सुरेशला आयटीआय फिटर; तर दत्ताला चक्क एमबीएपर्यंत शिकवले. सखूने शेतजमिनीसाठी कोर्टात लढा दिला. तिला आता सर्व नाही; पण साडेचार एकर जमिनीचा तुकडा परत मिळाला आहे.

सतीच्या माळावर सखूने आता छोटं घर बांधलं आहे. रामभाऊ अजूनही शेती करतात. गुरे सांभाळतात. एमबीए झालेला दत्ता आता वाघदऱ्यात ‘अॅग्रो टुरिझम’ सुरू करण्याची स्वप्नं बघतोय. शेतीकाम, गाईगुरांचे काम आटोपून सखू आजही रोज तोरणाच्या जांभुळमाचीकडे भलेमोठे ओझे घेऊन जाते. तेथे ती उन्हातान्हात, भरपावसात लिंबूपाणी विकते आणि मोबदल्यात घरात सुख घेऊन येते..!

सखूबाई रामभाऊ ढेबे, ९२२६४९८५०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme Reforms : जुन्या पीकविमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम

Agriculture Research : कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे देशातील १४२ कोटी लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य

Agriculture Scheme: शेततळ्यासाठी २ लाखांपर्यंत मिळणार अनुदान; शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना

Crop Insurance: कृषिमंत्री चौहानांनी केली ३ हजार ९०० कोटी रूपयांची विमा भरपाई वितरीत

Illegal Sand Mining : अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर ‘एमपीडीए’अंतर्गत गुन्हे नोंदवा

SCROLL FOR NEXT