Nashik News : सटाणा तालुक्यात वादळी पाऊस (Stormy Rain) व गारपिटीमुळे (Hailstorm) शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असून, त्यांना मदत मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे (Minister Dada bhuse) यांनी सांगितले.
शनिवार (ता. २२) सटाणा येथे उपविभागीय अधिकारी दालनात तालुक्यातील पाऊस व गारपीटग्रस्त भागातील पंचनामे व इतर बाबींबाबत आढावा बैठक पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार दिलीप बोरसे, उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ अहिरे, कृषी अधिकारी सुधाकर पवार, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे उपस्थित होते.
भुसे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी तालुक्यातील पाऊस व गारपीटग्रस्त भागातील पाहणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्या पिकांचे तत्काळ पंचनामे करुन त्याबाबतचा सविस्तर अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने सटाणा तालुक्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे साधारणपणे २२ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राचे बागायती व फळपिकांचे नुकसान झाले असून, त्याप्रमाणे शासनस्तरावर अहवाल पाठविण्यात आला आहे.
भुसे म्हणाले, की ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा ई-पीक पेऱ्यांची नोंद झाली नाही, अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गावपातळीवर तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांची समिती गठित करावी.
त्या समितीने शेतकऱ्याच्या कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून त्याबाबत शंका असल्यास लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून घेऊन त्यानुसार सातबारा उताऱ्यावरील नोंदीसमोर स्पष्टपणे नमूद करावे, असे प्रमाणित केलेले सातबारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. ती समिती आपला अहवाल ७ दिवसांत संबंधित बाजार समितीकडे पाठवेल, अशा सूचना ही शासनामार्फत देण्यात आल्या असल्याचे भुसे यांनी या वेळी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.