Paghar News : कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि पालघर कृषी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डहाणूतील नारळीपाडा, कैनाड, सरावलीसह इतर गावांमध्ये बोर्डो मिश्रण कसे तयार करावे आणि त्याचा वापर चिकू फळबागेत कशा पद्धतीने करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
चिकू फळे आणि कळ्या काळ्या होऊन गळून जातात. फळातील बी पोखरणाऱ्या अळीची समस्या तसेच कळ्या कुरतडणारी अळी यामुळे होणारे नुकसान कमी करावे, याविषयी माहिती देण्याच्या सूचना केल्या. प्रा. उत्तम सहाणे यांनी डहाणू, पालघर भागात भेटी दिलेल्या बागा आणि सद्य:स्थितीची माहिती शेतकऱ्यांना दिली. बी पोखरणारी अळी आणि कळी खाणारी अळी या किडींची ओळख, त्यांचे जीवनक्रम, कोणत्या महिन्यात कोणत्या किडी जास्त सक्रिय असतात, त्याची माहिती दिली.
फायटोप्थोरा रोगाची कारणे
चिकू फळे काळी पडून खाली पडणे अर्थात फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाची माहिती दिली. या रोगासाठी पोषक वातावरण जसे ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि २२ ते २५ डिग्री सेल्सिअस तापमान या अनुकूल गोष्टी जुलै ते ऑगस्टदरम्यान वातावरण तयार होते. बागेतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बागेत आर्द्रता वाढते. जुन्या भागांची छाटणी न झाल्याने सूर्यप्रकाश जमिनीवर येत नाही तसेच हवा खेळती राहत नाही, अशी अनेक वेगवेगळी कारणे आहेत.
किडीवर नियंत्रण
एकरी एक याप्रमाणे निळ्या रंगाचा प्रकाश सापळा लावावा. फळातील बी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ऑक्टोबर ते मार्चदरम्यान आणि कळी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी फेब्रुवारी ते जून महिन्यात कीटकनाशकाच्या दोन किंवा तीन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने घ्याव्यात. जुलै, ऑगस्टमध्ये मेटलॉक्झिल व मनकोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करण्याची शिफारस केली आहे.
असे तयार करा बोर्डो मिश्रण...
एक टक्के बोर्डो मिश्रण बनविण्यासाठी १०० लिटर पाणी, एक किलो कळीचा चुना आणि एक किलो मोरचूद घ्यावे. २० लिटर क्षमतेची दोन प्लास्टिक भांडी घेऊन त्यात एक एक किलो चुना आणि मोरचूद वेगवेगळे १२ ते १५ तास भिजत ठेवावे. दोन्ही द्रावण १०० लिटर क्षमतेच्या तिसऱ्या भांड्यात एकाच वेळी ओतावे. ओतत असताना काठीने ढवळत राहावे. या भांड्यात आणखी ६० लिटर पाणी ओतावे म्हणजे एकूण १०० लिटर द्रावण तयार होईल.
आता या द्रावणाचा सामू सामान्य पातळीत आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी सामू (पीएच) पेपरने तपासता येतो किंवा शेतामध्ये चाकू, विळा आदी लोखंडाचे पाते या द्रावणात बुडवावे. काही मिनिटांत या पात्यावर तांबूस रंग जमा झाला तर थोडा चुना टाकावा व मिश्रण ढवळावे. जोपर्यंत पाते तांबूस होण्याचे थांबत नाही तोपर्यंत थोडा थोडा चुना टाकत राहावा. बोर्डो मिश्रण चिकू झाडावर, खोडावर फवारावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.