Akola News : यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्हयात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे. जिल्हयात ज्वारीची सुमारे १३१ टक्के म्हणजेच साडेचारशे हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे.
जिल्हयात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३४२ हेक्टर आहे. दुसरीकडे अद्याप भुईमूग पिकाची लागवड जेमतेम १२ टक्के म्हणजे सहाशे हेक्टरपर्यंत झालेली आहे. यंदा या पिकाची लागवड घटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
अकोला जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी सुमारे ६५९३ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १७३६ हेक्टरवर आतापर्यंत लागवड पोहोचली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मका, ज्वारी, मूग, भुईमूग, तीळ, कांदा, भाजीपाल्याची लागवड होत असते. त्यात भुईमुगाचे सरासरी पाच हजार हेक्टर क्षेत्र आहे.
मागील काही वर्षांत भुईमूग पिकावर अनेक संकटे आलेली आहेत. प्रामुख्याने पिकात शेंगांची धारणा कमी होत असल्याने उत्पादन घटीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. तसेच या पिकाला लागणारा खर्चही निघत नसल्याने लागवडीकडील कल कमी होत चालला आहे.
या वर्षी तेल्हारा २००, पातूर, बार्शीटाकळी प्रत्येकी १०० हेक्टरवर लागवड झाली. याशिवाय अकोट ५०, बाळापूर ३, अकोला ७५, मूर्तिजापूर २० अशी ५९५ हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली. सरासरीच्या अवघी १२ टक्केच पेरणी झाली.
उन्हाळी ज्वारीकडे कल
उन्हाळ्यात जिल्ह्यात ज्वारीची साडेचारशे हेक्टरपर्यंत पेरणी पोहोचली आहे. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ३४२ हेक्टर आहे. ज्वारी लागवडीने १०० टक्के सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर मक्याची लागवड मात्र यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
मक्याचे क्षेत्र ५३१ हेक्टर असून, आजवर १२० हेक्टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी ज्वारीची पेरणी योग्य वेळी केल्यास उत्पादनात वाढ होते हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पेरणी सुरू झाली होती. काही ठिकाणी ज्वारीचे पीक कणसाच्या अवस्थेत आलेले आहे.
उन्हाळी मूग लागवड
यंदा जिल्ह्यात उन्हाळी मूग पिकाची लागवड झाली आहे. पातूर तालुक्यात ८० हेक्टर तर बार्शीटाकळीमध्ये १० हेक्टरवर लागवड झाली. पावसाळ्यात मुगाच्या पिकाचे दरवर्षी नुकसान होत असल्याने काही शेतकरी उन्हाळी पेरणी करू लागले आहेत.
पीक सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
मका ५३१ १२० हेक्टर
ज्वारी ३४२ ४४८
मूग ३९२ ९०
भुईमूग ४९४४ ५९५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.