Monsoon Season : देशात चालू खरीप हंगामात ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चार टक्क्यांनी पेरा वाढला आहे. यंदा कापूस, सोयाबीन, तूर यांचे लागवड क्षेत्र घटले. तर भात आणि मक्याला शेतकऱ्यांची जास्त पसंती मिळाली.
देशात खरीपाचे सरासरी १ हजार ९७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. केंद्र सरकारच्या आठ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार ९९५.६३ लाख हेक्टरवरील पेरा पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९५७.१५ लाख हेक्टरवर पेरा झाला होता.
यंदा मॉन्सूनच्या पावसाचे लवकर आगमन झाले. तसेच जून आणि जुलै महिन्यात पावसाने विविध राज्यांत हजेरी लावली. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामाला गती आली. परंतु महाराष्ट्रासह विविध राज्यांत पावसाचे वितरण असमान झाले. त्याचा पिकाला फटका बसत आहे. तसेच सप्टेंबरमध्ये काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली तर पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी चिंता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
कापूस, सोयाबीन पिछाडीवर
कापूस, सोयाबीनला गेल्या हंगामात चांगला दर मिळाला नसल्यामुळे यंदा त्यांचा पेरा घसरला आहे. यंदा कापूस लागवड क्षेत्र ३.२ टक्के घटले आहे. गेल्या वर्षी कापसाचे क्षेत्र ११०.४९ लाख हेक्टर होते. यंदा मात्र आतापर्यंत १०९.६९ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे.
सोयाबीनचे क्षेत्र ३.८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. सोयाबीनचा एकूण पेरा ११९.५१ लाख हेक्टर झाला आहे. तसेच तेलबियामध्ये , भूईमुग, सुर्यफुल, तीळ, कारळे पिछाडीवर आहे. त्यामुळे एकूण तेलबिया पिकांचा पेरा ३.७ टक्क्यांनी घटला आहे.
तुरीकडे पाठ?
गेल्या वर्षी तुरीला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीकडे पाठ फिरवली आहे. तुरीचे क्षेत्र ४.७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या वर्षी ४२.८७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता. यंदा तुरीचा पेरा ४०.८६ लाख हेक्टर आहे. तर उडीद आणि मुगाचे क्षेत्र अनुक्रमे १.२ व २.७ टक्के वाढले आहे.
मका आणि भाताला पसंती
यंदा मक्याचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.५ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा मक्याचे क्षेत्र ९१.८९ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ८३.१५ लाख हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती, भाताच्या क्षेत्रात १२.१ टक्के आघाडी दिसत आहे. भात लागवड क्षेत्र ३६४.८ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. ज्वारी, बाजरीचे क्षेत्र मात्र घटले आहे. उसाची लागवड जवळपास पूर्ण झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत २.९ टक्के जास्त लागवड आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.