Jayen Mehta, Managing Director of Amul Agrowon
ॲग्रो विशेष

Interview with Jayen Mehta: गुजरातबाहेरील शेतकरीही ‘अमूल’सोबत जोडणार

Amul Milk Cooperative: गुजरातमधील खेडा जिल्ह्यात अवघ्या अडीचशे लिटर दूध संकलनापासून गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाची (अमूल) सुरुवात झाली. याच रोपाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. निरंतर संशोधन व विकास प्रक्रियेतून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, पारदर्शक सहकार, विस्तारशिक्षण, उत्तम व्यवस्थापन व कालानुरूप तंत्रज्ञानाचा अवलंब अशा पंचसूत्रीवर ‘अमूल’ची ख्याती जगभरात पोहोचली आहे. या वाटचालीबाबत ‘अमूल’चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांच्यासोबत केलेली खास बातचीत.

मुकूंद पिंगळे

Interaction With Jayen Mehta, Managing Director of Amul:

जगात चर्चिली जाणारी ही दूधक्रांती नेमकी कशी घडली?

गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने १९४६ मध्ये सहकार चळवळ रुजली. त्या वेळी खेडा जिल्ह्यात मोरारजी देसाई आणि त्रिभुवनदास पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दूधक्रांतीची बीजे रोवली गेली. सुरुवातीला दोन गावांत सहकारी दूध संस्था स्थापन झाल्यानंतर सुरुवातीचे संकलन अवघे २५० लिटर होते. आज ३६ लाख दूध उत्पादक शेतकरी ‘अमूल’शी जोडले गेले आहेत. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दूरदृष्टीमुळे आज हा विस्तार पाहायला मिळतो. दूध उत्पादक, ग्रामस्तरीय सहकारी दूध संघ, जिल्हास्तरीय सहकारी दूध संघ व राज्यस्तरीय सहकारी विपणन महासंघ आणि शेवटी ग्राहक अशी यात रचना आहे. यातील तिन्ही संघटित साखळ्यांमध्ये दूध उत्पादक शेतकरी हेच मालक आहेत. दूध व उत्पादनांची गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास ही ताकद असून त्यातूनच ‘अमूल दूध पिता है इंडिया’ ग्राहकांच्या मनात रुजले आहे.

‘अमूल पॅटर्न’चे स्वरूप कसे आहे ?

भगवान कृष्णांच्या काळात दूध-दह्याच्या नद्या वाहत होत्या, असे बोलले जाते. मात्र स्वातंत्र्यपूर्व व इंग्रजांच्या शासन काळात भारतीयांनी स्थानिक जातीच्या गोवंशावर लक्ष न दिल्याने पशुपालन ते दुग्धप्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी दुधाची गुणवत्ता नसल्याने चांगली उत्पादने मिळत नव्हती. त्यामुळे ग्राहकही नाखूश होते. मात्र सहकार चळवळीचा उदय झाल्यानंतर ‘अमूल’ची वाटचाल भारताला दुग्धक्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवणारी ठरली. आज १०० रुपयांपैकी ८२ रुपये हे थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात जातात. युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया किंवा संयुक्त राष्ट्रांमध्ये शेतकऱ्यांना एक तृतीयांश परतावा मिळतो.

मात्र भारतात तो निम्म्यापेक्षा जास्त असतो. यातून आर्थिक शाश्वती मिळाल्याने पुरुषांसोबत महिला या व्यवसायात जोडल्या गेल्या आहेत. एकट्या गुजरातमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची २४ लाख बँक खाती काढण्यात आले आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक महिलांची खाती आहेत. या व्यवसायाने रोजगार निर्मिती, आर्थिक स्वावलंबन व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. याच धर्तीवर आज बिहारमध्ये ‘सुधा’, पंजाबमध्ये ‘वेरका’ आणि कर्नाटकमध्ये ‘नंदिनी’ असे ब्रॅण्ड विकसित झाले आहेत. जगातील २५ टक्के दूध उत्पादन भारतात होते,

त्यामुळे आगामी काळात लवकरच ‘दूधक्रांती २.०’च्या माध्यमातून भारताला ‘डेअरी इन द वर्ल्ड’ होण्याची संधी आहे. श्रीलंका, आफ्रिका अशा देशांमध्ये हे मॉडेल गेले आहे. अमेरिकेतील ‘ब्रॅण्ड फायनान्स’ या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार खाद्यान्न व दूध ब्रॅण्डमध्ये अमूल अव्वल ठरला आहे. याशिवाय देशातील सर्वात मोठा खाद्यान्न व एफएमसीजी ब्रँड म्हणूनही आमची ओळख आहे. यामागे ५० वर्षांची मेहनत आहे. आता एक वर्षात दुधाचे २४ अब्ज पॅक विकले जातात. तर दररोज ३५० लाख लिटर दूध ७ कोटी पॅकच्या स्वरूपात विकले जाते.

‘अमूल’ ब्रॅण्डच्या यशाचे गमक नेमके काय आहे?

कुठलाही ब्रॅण्ड फक्त जाहिरातीच्या माध्यमातून बनत नाही, तर तो ग्राहकांच्या विश्वासातून बनतो. मौखिक प्रसिद्धी तर अग्रक्रमावर आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ३६ लाख शेतकरी कुटुंबाशी जोडलेला व शेतकऱ्यांची मालकी असलेला जगातील हा सर्वांत मोठा ब्रॅण्ड आहे ‘ऑपरेशन फ्लड’च्या माध्यमातून दूध क्रांती देशात घडली. इथपर्यंत येण्यासाठी ८० वर्षं लागली तर विपणन महासंघाला ५० वर्षे झाली आहेत. ३६ लाख दूध उत्पादकांकडून १२ अब्ज लिटर दुधाची वार्षिक खरेदी होते. जगातील आठव्या क्रमांकाचा हा दूध प्रक्रिया उद्योग आहे. येथे दररोज ५० दशलक्ष लिटर दुधावर प्रक्रिया होते. भारतातील ३० लाख दुकानात अमूलच्या उत्पादनांची विक्री केली जाते. सर्व कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. बदल, तंत्रज्ञान व मार्केट रेट समजून घेत उत्पादनांची वाढ करून ती

ग्राहकापर्यंत नेण्याचे काम सातत्याने होत आहे. यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. ग्राहक, दूध उत्पादक शेतकरी अशा सर्व घटकांसाठी मोबाइल ॲप विकसित केले आहे. भारताची बाजारपेठ विकसित होत आहे. ग्राहकांचा खुल्याऐवजी पॅक पद्धतीने दुधावर विश्वास वाढत आहे. यातून आर्थिक सक्षमीकरण साधत आहे.

‘अमूल’ची गेल्या सात दशकांपासून उच्चतम गुणवत्ता कायम आहे. आज ८७ शाखा कार्यालयांच्या माध्यमातून २८ लाख विक्री केंद्रांवर २०,००० वितरकांच्या माध्यमातून उत्पादन विक्री होते. ग्राहकांचा कल ओळखून मूल्यवर्धनातून नव्या उत्पादनांचा विकास व विक्री हे धोरण आहे.

संशोधन व विकास, तंत्रज्ञानाचा अवलंब याकडे कसे पाहता?

अलीकडेच इंधनाला पर्याय म्हणून दुधाच्या निवळीपासून ‘बायोइथेनॉल’ निर्मिती यशस्वी झाली आहे. याशिवाय सुगंधी द्रव्ये, फूडस्प्रे आदी नवी उत्पादने आहेत. याशिवाय ‘सर्क्युलर इकॉनॉमी’साठी गाईच्या शेणापासून हरित ऊर्जा निर्मितीच्या अंगाने ‘बायो सीएनजी प्रकल्प’ कार्यान्वित होत आहेत.

डिजिटल तंत्रज्ञानामध्ये अमूल डेअरी ट्रेडिंग, अमूल कार्ट, शॉप अमूल, लोकेट अमूल, पशुधन खरेदी विक्रीसाठी अमूल पशुधन ॲपद्वारे कामकाज होते. उपग्रह तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ‘अमूल फेडरेशन’ व ‘इस्रोचे उपग्रह अनुप्रयोग केंद्र’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यातून चारा उत्पादन क्षेत्रफळ, संभाव्य चारा उत्पादन यांची माहिती संकलित होत आहे. वस्तुनिष्ठ क्षेत्रीय माहितीमुळे चारा उत्पादनाचा अंदाज घेतला जातो.

मागील रब्बी हंगामात दहा हजारहून अधिक नोंदी घेतल्या आहेत. सहकार व सहकारी दूध संघांच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन, भूक मिटवणे, उत्तम आरोग्य व कल्याण, दर्जेदार शिक्षण, लिंग समानता, स्वच्छ पाणी व स्वच्छता, शांतता, समान न्याय व संस्थात्मक बांधणी, हवामान बदल अशी जवळपास १३ उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य केली जात आहेत.

‘मूल्यवर्धना’च्या क्षेत्रात अमूलची वाटचाल कशी आहे?

जागतिक बाजारपेठ आपल्याला खुणावत आहे. येत्या पाच ते दहा वर्षात दोन लाख गावांमध्ये आणखी दूध संस्थांची उभारणी झाल्यास वाढ शक्य आहे. मागील ५० वर्षांत दोन लाख गावांमध्ये सहकारी संस्था उदयास आल्या. देशात ६० लाख गावे असून जर पाच लाख गावांमध्ये सहकारी दूध संस्था स्थापन झाल्यास मोठी क्रांती शक्य आहे. अमूल गुजरातच्या बाहेर इतर राज्यात २०,००० गावांमध्ये काम करते.

या माध्यमातून ८० लाख लिटर दूध संकलन केले जाते. देशभरात आणि ६० देशांत ही उत्पादने जातात. आगामी काळात मल्टिस्टेट सोसायटीच्या माध्यमातून गुजरातबाहेरील दूध उत्पादक अमूलशी जोडले जातील. दूधक्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यातील हे स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुग्धजन्य उत्पादने जगभरात नेऊन ग्राहकांच्या टेबलवर असावीत, असे धोरण हाती घेतले आहे. त्यास गती देण्यासाठी सातत्याने सामूहिक पातळीवर आखणी सुरू असते.

बाजारपेठ व ग्राहकांची मागणी यांचा अभ्यास करून अमूलची उत्पादने जगभरात ६० देशात पोहोचवण्यात यश मिळाले. अमेरिकेसारख्या प्रगत देशात अमूल हा राष्ट्रीय ब्रॅण्ड झाला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनांचे वैविध्य, भेसळमुक्त उत्पादने, जागतिक स्तरावर पारंपरिक चवीसह टिकवणक्षमता व पॅकेजिंग या गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामुळे संधी वाढत गेल्या.

गुजरातबाहेर विस्ताराचा ‘अमूल’ चा विचार आहे का?

यापूर्वी गुजरात राज्याच्या बाहेर जे संकलन दूध उत्पादक असोसिएशन या पद्धतीने होत होते. कारण अधिकृत कार्यालय नोंदणी होत नव्हती. आता सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे, की गुजरातच्या बाहेर ज्या गावांमध्ये काम केले जात आहे, तिथे त्या गावातील शेतकरी सहकारी संस्था नोंदणी करतील. त्यासाठी अमूल एक नवीन मल्टिस्टेट कॉपरेटिव्ह संस्था बनवणार आहे.

त्या माध्यमातून गुजरातच्या बाहेरील शेतकऱ्यांना जोडता येईल. अशा पद्धतीने गुजरात बाहेरील शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून त्याचे मार्केटिंग करता येणार आहे. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे, तसा इतर राज्यातील शेतकऱ्यांचा होणार आहे. पुढील महिन्यात नवी मल्टिस्टेट रचना होणार आहे. यासंदर्भातील उपविधीचे काम झाले आहे. नोंदणीकृत सहकारी संस्था अमूलसोबत काम करू शकतील.

गुजरातमध्ये सहकार विकास कार्यक्रम राबविला जातो. त्यातून प्रत्येक जिल्हा दूध संघात काम सुरू आहे. पशुसंवर्धन, दूधसंकलन, प्रक्रिया व इतर संधी या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. याच पद्धतीने आगामी काळातही कामकाज होईल. फक्त दूध संकलनच नव्हे तर पशुवैद्यकीय सेवा, पशुखाद्य याच सेवा मल्टिस्टेट कामकाजात असतील. दुधातून ग्रामीण विकास, संधी निर्मिती यातून जीडीपी वाढ हे ध्येय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT