Nandurbar News : या वर्षी हवामानतज्ज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी वेळीच शेताची खरीपपूर्व मशागत करून शेती मशागतीसाठी सज्ज केली आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानात गर्दी दिसून येत असून, पाऊस झाल्यावरच पेरणी होणार आहे.
जून महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. मॉन्सूनचे राज्यात आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच मशागतीची कामे वेळेवर आटोपली. वेळेवर पाऊस झाला तर पेरण्या वेळेवर होऊन उत्पादनवाढीची अपेक्षा असते. त्यामुळे यंदा अतिशय कडक उन्हाळा असतानाही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण केली.
नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणे, शेणखत टाकणे आदी कामे पूर्णत्वास नेली आहेत. कमी वेळात मशागतीची कामे व्हावीत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने शेतीकामे करण्यास प्राधान्य दिले आहे.
अजूनही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या सहाय्याने मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देतात. त्यानंतर कर्ज घेऊन लागणारे बियाणे, खतखरेदी सुरू आहे. मात्र तज्ज्ञांचा अंदाज चुकल्याने अर्धा जून आला, कडक ऊन व वातावरणात उकाडा कायम असल्याने पावसाची चिन्हे दिसत नसल्याने वेळेवर पेरणी होईल का, या विचाराने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आकाशात तुरळक ढग भरून येतात. दिवसभर प्रचंड उकाडा होऊन सायंकाळी पुन्हा वातावरणात गारठा निर्माण होत आहे. तालुक्यात काही बागायत क्षेत्र वगळता बहुतांश भाग पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
कपाशी लागवडीवर परिणाम
परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली; परंतु मागील महिन्यापासून सतत वीज खंडित होऊन, विजेचा लपंडाव सुरू आहे. पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पूर्वहंगामी कपाशीचे क्षेत्र घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे, अशा शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.