Taloda News : शहरासह तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, मोड, बोरदसह परिसरात मोठ्या प्रमाणावर दरवर्षी खरबूज, टरबूज, काकडी यासारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड करण्यात येत असते. परंतु यंदा अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांकडून या पिकांच्या लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
या वेलवर्गीय पिकांची लागवड करणे म्हणजे एकप्रकारे धोका पत्करणे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान वेलवर्गीय पिकांची लागवड या हंगामात अत्यंत कमी होणार असल्याने उन्हाळ्यात ही पिके भाव खाणार असे चित्र आहे.
तळोदा शहरासह तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबत फळ बागांना, वेलवर्गीय पिकांना एकंदरीत कमी कालावधीत चांगले व हमखास उत्पन्न देणारे पिकांची लागवड करताना दिसून येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तळोदा तालुक्यातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर या पिकांची लागवड करतात.
तळोदा परिसरात डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर टरबूज, खरबूज, काकडी या पिकांची लागवड करण्यात येत असते. जवळपास तीन महिने कालावधीत हे पीके निघत असून बरोबर उन्हाळ्यात या पिकांना मागणी राहत असल्याने भावही शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळत असतो.
यंदा दर महिन्याला बदलणारे हवामान, पाऊस यामुळे जवळपास तीन महिन्यात हे पीक कसे निघणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून मल्चिंग पेपर, ठिबक, महागडे बियाणे, लागवड मजुरी, फवारणी हा खर्चही मोठा होत असल्याने तसेच खराब हवामानामुळे वाढ न होणे,
रोगांचा प्रादुर्भाव, फळधारणा चांगली न होणे, फळांचा आकार वेडावाकडा होणे या अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी वेलवर्गीय पीक घेणे टाळत असल्याचे चित्र काही वर्षापासून तयार झाले आहे.
गेल्यावर्षी चार एकरात टरबूज लागवड केली होती. चांगल्या हवामानामुळे फळधारणा चांगली होऊन भावही चांगला मिळाला होता. परंतु यावर्षी अनियमित हवामानामुळे अद्याप टरबूज लागवड केली नसून पुढच्या महिन्यात हवामानाचा अंदाज घेऊन लागवड करण्याचा विचार आहे.महेंद्र भारती, टरबूज उत्पादक शेतकरी.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात टरबूज लागवड करण्यासाठी दीड ते दोन लाख रोपांची बुकिंग होती. पण यावर्षी अद्यापही टरबूज, खरबूजची रोपे बुकिंग झालेले नाहीत. शेतकऱ्यांकडून नियोजन अल्पप्रमाणात असून त्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतल्यास बाहेरून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.दीपक मराठे, नर्मदा रोपवाटिका, रांझणी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.