Ratnagiri News : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका पाऊस झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण पुढे पावसाने पाठ फिरवली, दिवसभर रखरखीत ऊन असते. जमिनीत भात लागवडीला आवश्यक ओलावा नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी द्विधा मनःस्थितीत सापडला असून, वरुणराजाला साद घालत आहे. येथील कृषी विभागाने पेरणीची घाई करू नये, अशा सूचना केल्या आहेत.
बिपरजॉय वादळामुळे मॉन्सून सक्रिय होण्याचे वेळापत्रक बदलले आहे. वादळी वारे शमल्याशिवाय मोसमी पाऊस सक्रिय होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. २३ जूननंतर पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जमिनीत ओलावा नसल्याने कोकण किनारपट्टीवरील शेतकरी पेरण्या करण्यास तयार नाही. काही ठिकाणी काहीसा हलका पाऊस पडत असल्याने सध्या शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. दरवर्षी रोहिणी नक्षत्रावर धूळवाफेच्या पेरण्या केल्या जातात.
मृग नक्षत्रावर उर्वरित पेरण्या पूर्ण केल्यात जातात. त्यानंतर भाताची रोपे २० ते २१ दिवसांची झाल्यानंतर लागवड प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. काही शेतकऱ्यांनी हलक्या पाऊस पडल्याने भातपेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतातील रोपे उन्हाच्या रखरखीतपणामुळे उगवून येतील का, अशी शंका निर्माण झाली आहे.
सध्या पावसाअभावी जिल्ह्यात ३० टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरण्या करताना शेतकऱ्यांची लगबग करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
२२ जुलैपासून आद्रा नक्षत्र सुरू होत आहे. आद्रातही मॉन्सूनचा कल असाच राहिला तर खरीप क्षेत्रातील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले आहे. शेतकऱ्यांनी या सगळ्याचा अंदाज घेऊनच पेरणी करावी.
यावर्षी जुलैमध्ये पेरणी कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत; मात्र पावसाची आस लागून राहिलेल्या शेतकऱ्यांचा नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत.
जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत आहेत, त्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही; मात्र पावसावर अवलंबून ज्यांची शेती आहे, त्यांनी थांबायला पाहिजे. तसेच मध्यम कालावधीत बियाण्यांचा वापर करावा.डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.