Buldana News : जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांमध्ये शेत, शिवार आणि पाणंद रस्ते कालबद्धरितीने खुले करण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाने सोमवारपासून (ता.२०) ३१ मार्च २०२५ पर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुषंगाने कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी काढलेले आहेत. या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात सोमवारपासून शुक्रवारपर्यंत (ता.२४) संबंधित गावांच्या तलाठ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग नमूद असलेले गाव नकाशे प्राप्त करून घेणे हे पहिल्या टप्प्यात केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारी पर्यंत या नकाशातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब), पायमार्ग हे प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्याची यादी तयार करणे. तिसऱ्या टप्प्यात १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत बंद असलेले रस्ते ज्या भुमापन क्रमांकातून जातात त्यांचे भोगवटाधारकांची यादी तयार करणे.
चौथ्या टप्प्यात ८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत भोगवटाधारक व गावातील सरपंच व इतर सहधारक यांची सदर रस्ता खुला करण्याबाबत बैठक आयोजित करून समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार तहसिलदार यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात सर्व पक्षकार गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक यांच्या समवेत त्या वादग्रस्त ठिकाणी स्थळ निरीक्षण करुन बैठक घेऊन घेत सर्व सहमतीने रस्ता खुला करण्यासाठी व दावा निकाली काढण्यासाठी लोकअदालतीच्या निकषानुसार प्रकरणात निर्णय घेणे.
पाचव्या टप्प्यात १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्या टप्प्यातील प्रयत्नातून रस्ता खुला होत नसल्यास उपअधिक्षक भूमी अभिलेख यांच्या सहाय्याने रस्ता निश्चित करुन पोलिसांचे सहाय्याने तो खुला करणे, असे नियोजन आहे.
तर कालबद्ध कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात १ ते ३१ मार्चपर्यंत पाचव्या टप्प्यानुसार रस्ता खुला न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ नुसार अर्ज प्राप्त करुन घेऊन उचित नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
या कालबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरीक्षक यांनी समन्वयाने कामकाज करून ग्रामीण भागातील ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब) पायमार्ग कालबद्धरितीने खुले करावेत, असे सूचवण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.