1. बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन १२.९४ डाॅलरवर आहे. तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये सुधारणा होऊन ४३४ डाॅलरवर पोचले. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनला आजही सरासरी ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनची भावपातळी आणखी काही दिवस दरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे.
2. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक काहिशी वाढली आहे. तसेच कापसातील ओलावाही कमी येत आहे. मात्र कापसाची भावपातळी स्थिर होती. कापसाला आजही प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ३०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. वायद्यांचा विचार करता देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज काहीसे वाढले होते. कापूसही पुढील काही दिवस याच पातळीदरम्यान राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
3. देशातील बाजारात मक्याची आवक मर्यादीत होत आहे. चालू खरिप हंगामात मक्याची लागवड तीन टक्क्याने अधिक झाली. पण दुष्काळी स्थितीचा फटका मका पिकालाही बसत आहे. बाजारात मक्याची आवक काहिशी वाढली. त्यामुळे मक्याचे भाव १ हजार ८०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. पशुखाद्यासाठी मक्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मक्याचे भाव टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. बाजारात सध्या भेंडीला चांगला भाव मिळत आहे. भंडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या दुष्काळी स्थिती आहे. याचा भेंडी पिकाला फटका बसत आहे. तर भेंडीला मागणी टिकून आहे. त्यामुळे सध्या भेंडीला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळातही भेंडीचे भाव टिकून राहून शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
5. मागील दोन महिन्यांपासून टोमॅटोचा बाजार उत्पादन खर्चापेक्षा निम्म्यावर आहे. शेतकऱ्यांचा टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला आला आहे. शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र अपेक्षित भाववाढ झाली नाही. मागील महिनाभर टोमॅटोचा दर अगदी १०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होता. तो आता काहीसा वाढला. पण शेतकऱ्यांना अपेक्षित म्हणण्यापेक्षा किमान उत्पादन खर्चाच्या पातळीवर भाव पोचला नाही. टोमॅटोला किमान १२ ते १५ रुपये भाव मिळाल्याशिवाय पीक परवडत नाही, असे शेतकरी सांगतात. टोमॅटोचा सरासरी भाव आता ८०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान पोचला. मागील अनेक दिवस हा भाव ६०० रुपये होता.
दुसरीकडे बाजारातील टोमॅटोची आवक दिवसेंदिवस काहिशी कमी होत आहे. तर पिकाला आता बदलत्या वातावरणाचा अनेक भागात फटका बसत आहे. टोमॅटोचे पीक आतबट्ट्याचे ठरत असल्याने काही शेतकरी प्लाॅट सोडून देत आहेत. तर काही शेतकऱ्यांवर तोडा करून फेकण्याची वेळ आली. मागील काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या किमान भावपातळीत काहिशी वाढ झाली. कमाल भावपातळीही काहिशी वाढली. यापुढील काळात बाजारातील आवक हळूहळू कमी होत जाईल, असा अंदाज आहे. परिणामी टोमॅटोची भावपातळी काहिशी वाढलेली दिसू शकते, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.