Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

El Nino : एल निनो’ यंदा सामान्य; सरासरी इतकाच मॉन्सून

Weather Forecast : ‘एल निनो’ यंदा सामान्य स्थितीत (न्यूट्रल) असून, त्याचा नकारात्मक परिणाम राहणार नाही. परिणामी, या वर्षी मॉन्सून सरासरी गाठेल.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘एल निनो’ यंदा सामान्य स्थितीत (न्यूट्रल) असून, त्याचा नकारात्मक परिणाम राहणार नाही. परिणामी, या वर्षी मॉन्सून सरासरी गाठेल, असा विश्‍वास व्यक्‍त करताना हवामान बदलाशी संबंधित आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार क्‍लायमेट सेल स्थापन करण्याच्या विचारात असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी बुधवारी (ता. ६) ‘ॲग्रोवन’ सोबत संवाद साधताना दिली.

भारतीय हवामान खात्याला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यशाळेसाठी श्री. मोहपात्रा नागपुरात आले होते. डॉ. मोहपात्रा म्हणाले, की हवामान बदलामुळे शेतीसोबतच इतरही क्षेत्र प्रभावित होतात. त्यामध्ये व्यापार मुख्य असल्याने जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) यांच्याकडून विविध देशांकडून हवामान विषयक स्टेटमेंट (अहवाल) मागविण्यात येतात.

त्याआधारे ते व्यापार धोरण निश्‍चीत करतात. नैसर्गिक आपत्तीचा रेल्वे, महामार्ग विषयक यंत्रणांना देखील फटका वारंवार बसला आहे. त्यामुळे आता त्यांनी देखील सजग होत भारतीय हवामान खात्याशी करार करण्याची तयार चालविली आहे. यामुळे महामार्ग किंवा रेल्वे मार्गावर किती पाऊस पडेल, वादळ येईल किंवा गारपीट होईल हे आधीच कळणार आहे. पूर्वी हवामान खाते केवळ पाऊसमानाचा अंदाज वर्तवित होते.

आता संभावित नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्या भागात, किती आणि कशाचे नुकसान होईल याचेही पृथक्करण करण्यात यशस्वी झाले आहे. हवामानाचा अभ्यास करण्यासाठी पुणे, नागपूर येथे संशोधन केंद्र आहेत. हवामान अंदाजाची अचूकता वाढावी याकरिता सध्या देशभरात ३९ रडार बसविण्यात आले आहेत. येत्या काळात ही संख्या ६५ पर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर येथे रडार यंत्रणा आहे.

त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील म्हैसमाळ या परिसरात जागा निश्‍चित करण्यात आली असून, तेथे रडार लावण्यात येणार आहे. या माध्यमातून ४०० किलोमीटरचे क्षेत्र कव्हर होईल. मुंबई, पुणे येथे अतिरिक्‍त रडार बसविण्याचे प्रस्तावित असून, रत्नागिरीमध्ये देखील रडार बसविण्याचे नियोजन आहे. ‘हरहर मौसम, घरघर मौसम’ ही संकल्पना राबविली जाणार आहे.

त्यानुसार हवामान खात्याच्या (Weather) संकेतस्थळावर आपला पीन कोड टाकला तरी तुमच्या भागातील हवामानस्थिती कळणार आहे, इतकी अचूकता आज गाठता आली आहे. गावस्तरावर हवामान अंदाज पोहोचावा याकरिता प्रत्येकी पाच शेतकऱ्यांची निवड केली जाईल. त्यांच्या माध्यमातून इतरांपर्यंत हवामान अंदाज पोहोचेल, अशी व्यवस्था केली आहे.

कथित हवामान तज्ज्ञांवर विश्‍वास ठेवू नका

देशभरात सोशल मीडियावर हवामान तज्ज्ञांचे पीक (Crop) आले आहे. मनाचे आराखडे बांधत ते अंदाज वर्तवितात, काही तर व्यावसायिक झाले असून, पैसे कमविण्याकरिता त्यांनी हा पर्याय निवडला आहे. भारतीय हवामान खाते निःशुल्क आणि अचूक अंदाज वर्तविते. त्याकरिता हवामान खात्याचे संकेतस्थळ, मौसम ॲप यासारख्या पर्यायाचा विचार करावा, असे डॉ. मोहपात्रा म्हणाले.

एप्रिल महिन्यात पूर्वानुमान

जून ते सप्टेंबर असा मॉन्सूनचा (Monsoon) कालावधी आहे. या काळात पाऊस कसा राहील याचे पूर्वानुमान १५ एप्रिलपर्यंत आम्ही जाहीर करतो. एका महिन्यात किती पाऊस पडेल, याविषयी सांगता येत नाही. त्यामुळे पूर्ण मॉन्सून कालावधी गृहीत धरून आम्ही किती टक्‍के पाऊस (Rain) पडणार हे जाहीर करतो. नजीकच्या काळात पावसाचा खंड पडत असता तरी पाऊस सरासरी गाठतोच असे निरीक्षण असल्याचे डॉ. मोहपात्रा म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT