Dr. Vilas Kharche Agrowon
ॲग्रो विशेष

Variety Development : हवामान अनुकूल वाण - तंत्रज्ञानावर भर

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

PDKV, Akola : सिंचन सुविधांचा अभाव, वातावरणातील बदल अशा अनेक कारणांमुळे विदर्भातील पारंपरिक पिकांची उत्पादकता कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हवामान अनुकूल वाण, तंत्रज्ञान यावर संशोधन करण्यावर भर दिला आहे. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे नागपूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्याशी विद्यापीठाच्या संशोधनाची दिशा, नवीन वाण यासंदर्भात साधलेला संवाद.


वातावरणातील बदलाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संशोधनाची दिशा काय आहे?

वातावरणातील बदल हे नवे आव्हान शेती क्षेत्रासमोर आहे. विद्यापीठ या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे. या विषयावर संशोधन करण्यासाठी १२ कोटी रुपयांचा प्रकल्प विद्यापीठाला मंजूर करण्यात आला आहे. डॉ. आर. बी. घोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जात आहे. विदर्भात मूग, उडदाची जून महिन्यात लागवड होत असे. पण आता जूनमध्ये पाऊसच होत नही. परिणामी, मूग, उडदाखालील क्षेत्रात घट झाली. पाऊस आता जुलैमध्ये बरसतो. त्यामुळे मूग, उडदाचे उशिरा येणारे वाण विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यापीठाकडे मोठ्या प्रमाणावर जर्मप्लाझम आहेत. त्याचे स्क्रीनिंग करून जुलैमध्ये लागवडीसाठी येणाऱ्या वाणाचा पर्याय दिला जाईल. कापूस, सोयाबीन तसेच या भागातील इतर पिकांसाठी हवामान अनुकूल वाण दिले जाणार आहेत.


एआय तसेच ड्रोन संदर्भात भूमिका काय आहे?

पॉवर स्प्रेमध्ये किती पाणी आणि कीटकनाशकाचे मिश्रण असावे याविषयी स्पष्टता आहे. तशी स्पष्टता ड्रोन फवारणीसाठी नाही. पॉवर स्प्रे प्रमाणे परिणाम मिळावा याकरिता ड्रोनद्वारे किती अंतरावरून फवारणी केली पाहिजे याचाही अभ्यास अद्याप झालेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या कपाशी आणि सोयाबीनमध्ये चाचण्या घेतल्या जात आहेत. त्याआधारे ड्रोनद्वारे फवारणीसाठी शिफारस केली जाईल. तीन वर्षांचा हा प्रकल्प आहे. त्याआधारे एसओपी निश्‍चित होईल व निष्कर्ष मांडले जातील. एआय क्षेत्रातही आमचे काम सुरू आहे.

संत्रा सुधारणा प्रकल्पाविषयी काय सांगाल?

तत्कालीन कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या पुढाकारातून संत्रा सुधार प्रकल्पासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हा प्रकल्प प्रभावीपणे राबविला जात आहे. रसाचे प्रमाण जास्त असणारे संत्र्याचे दर्जेदार वाण विकसित करण्याचा उद्देश यातून साधला जाईल. प्रक्रियेसाठी सुलभ असे हे वाण राहणार आहे. अभियांत्रिकी, तेलबिया, फळ आणि भाजीपाला प्रक्रिया या तीन ठिकाणी स्टार्टअपच्या माध्यमातून नव-उद्यमींना तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक साह्य केले जाते आहे. या ठिकाणी फळांवर प्रक्रिया करून त्याद्वारे मूल्यवर्धनावर भर देण्यात आला आहे.

तणनाशकाबद्दल बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. तणनाशकांमुळे जमीन प्रभावित होते का?

शिफारशीत मात्रांमध्ये तणनाशकांचा वापर केल्यास जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होत नाही, असे निरीक्षण आहे. शिफारशीत प्रमाणापेक्षा अधिक तणनाशकाचा वापर केल्यास त्याचाही सूक्ष्म जिवाणूंवर परिणाम होत नाही असा अभ्यास आहे. तणनाशकाचा जमीन आणि पिकांवर दीर्घ काळ वापर केल्यास याचे काय परिणाम होतात हे आता पुढच्या टप्प्यात अभ्यासण्यात येणार आहे. त्याकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

खारपाण पट्ट्यातील संशोधनाबाबत काय सांगाल?

खारपाण पट्ट्यात जमिनी उत्पादनक्षम आहेत, परंतु पाणी जास्त असल्यास निचरा होत नसल्याची मोठी अडचण आहे. पाणी साचून राहिल्यास मुळांना ऑक्‍सिजन मिळत नाही. परिणामी, पिकाला अन्नद्रव्य घेण्यात अडचणी निर्माण होतात. बीबीएफ पद्धतीमध्ये केवळ सरफेस (जमीनीवरील) पाणी वाहून जाते. मात्र या भागातील जमीन भौगोलिकदृष्ट्या वेगळेपण जपणारी आहे. परिणामी, पाणी जमिनीत झिरपत नाही. त्यामुळे या भागासाठी वेगळा पर्याय देण्याचा विचार होता. राज्यात काही ठिकाणी पाणी निचऱ्यासाठी सब सरफेस पद्धत वापरण्यात आली आहे. यामध्ये जमिनीच्या आत माती किती थरापर्यंत आहे हे कळालेले असते. माती जोवर आहे तेथपर्यंत सच्छिद्र पाइप टाकून पाणी शेताबाहेर काढले जाते. खारपाणपट्ट्यात या प्रकल्पाची पथदर्शी अंमलबजावणी केली जाणार आहे. कृषी मंत्रालयाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.

सोयाबीनमध्ये नवे वाण कोणते आहेत?

सोयाबीनचा जेएस ३३५ हा एकमेव पॉप्युलर वाण होता. हा एकच वाण सर्वदूर दिसत होता. परंतु जुना वाण असल्याने उत्पादकता घटली होती. याला पर्याय म्हणून विदर्भातील कृषी हवामानाला पोषक असे वाण विकसित केले. सुवर्ण सोया, पीडीकेव्ही अंबा या वाणांचा त्यामध्ये समावेश आहे. सुवर्ण सोया हा राष्ट्रीय स्तरावर मध्य भारतातील पाच राज्यांमध्ये प्रसारित झाला आहे. मूळकुज आणि खोडकुज या रोगांना तो प्रतिकारक आहे. पीडीकेव्ही अंबा वाण ९६ दिवसांत येणारा आहे.

कपाशी वाणांबद्दल काय सांगाल?

कपाशी वाणात पीकेव्ही-हायब्रीड-२ हा वाण लोकप्रिय होता. त्यानुसार महाबीजसोबत सामंजस्य करार करीत यामध्ये बीजी-२ जीनचा अंतर्भाव केला. जास्त वजन असणाऱ्या बोंडाचा कापूस वाण विकसित केला आहे. येत्या दोन वर्षांत तो प्रसारित होईल. हा वाण देखील बीजी-२ जीन राहणार आहे. अतिसघन लागवडीला प्रोत्साहन देण्यावर भर आहे. कपाशी हे जास्त कालावधीचे पीक असल्याने उथळ जमिनीवर त्याची लागवड करू नये.

विदर्भासाठी इतर पीक-वाणांचे पर्याय काय आहेत?

हरभऱ्यासाठी पीडीकेव्ही-कार्तिक, करडईसाठी पीडीकेव्ही-व्हाइट, राळासाठी पीडीकेव्ही-यशश्री, कुटकीचा पीडीकेव्ही तेजश्री हे वाण विकसित केले आहेत. हरभऱ्यामध्ये जॅकी ९२१८ हा एकमेव वाण होता. या दहा वर्षे जुन्या वाणाला पर्याय म्हणून पीडीकेव्ही सुपर जॅकी हे वाण विकसित केले. मररोगाला प्रतिकारक्षम असा हा वाण आहे. पीडीकेव्ही कणक हा राष्ट्रीय स्तरावर प्रसारित झालेला वाण आहे. जमिनीपासून ३० सेमी वर याला घाटे लागतात. परिणामी, यांत्रिकीकरणासाठी हा सुलभ वाण आहे. धान क्षेत्रासाठी पीडीकेव्ही साधना तसेच पीडीकेव्ही साक्षी हे दोन लवकर येणारे वाण (फक्‍त १२० दिवसांत) विकसित केले आहेत. लाल भाताचा वाण जैव पोषणयुक्‍त असून, त्यात जस्त आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. बीएआरसी मुंबई यांच्यासोबत समन्वयातून भुईमुगाचा टीएजी-७३, मोहरीचा टीएएम-१०८ वाण विकसित करण्यात आले आहे. विद्यापीठाने अलीकडच्या काळात पैदासकार बियाण्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले असून २०२३-२४ या वर्षात १८,३७७ क्‍विंटल बीजोत्पादन केले आहे.

धान पिकातील संशोधनाविषयी भूमिका काय?

पूर्व विदर्भात सुमारे साडेआठ लाख हेक्‍टरवर धान लागवड होते. धान क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मजुरांकडून रोवणी होते. परंतु कृषी विद्यापीठाच्या सिंदेवाही केंद्रावर धान शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर केला आहे. तिथे रोवणी यंत्राद्वारे धानाची लागवड होते. त्यामुळे वेळ आणि कष्टाची बचत होते, धान काढणीला लवकर येतो. म्हणून तिथे दुबार पीक पद्धती घेता येईल. त्यामुळेच धानपट्ट्यात यंत्राद्वारे धान रोवणी सोबतच तेलबिया लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. याकामी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे. जवस, मोहरी, करडई, रब्बी ज्वारी आदी पिके रब्बी हंगामात घेता येतात. उन्हाळी धानाच्या लागवडीमुळे पाण्याचा वापर जास्त होतो. रोग-किडीची समस्या खरिपात उद्‍भविण्याचा धोका राहतो. पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास उसासारखे पीक घेता येणे शक्‍य आहे. पेरीव भात (डीएसआर) पद्धतीची शिफारसदेखील करण्यात आली आहे. यामध्ये पेरणी यंत्राने धानाची पेरणी करून रोपवाटिकेमधील कालावधी कमी करता येतो. यामुळे धान काढणीला लवकर येतो व दुबार पीक घेणे शक्‍य होते. जागतिक बॅंकेच्या पथकाने नुकतीच सिंदेवाही प्रादेशिक संशोधन केंद्राला भेट दिली होती. या वेळी पोकरा- २ प्रकल्पात मिथेन वायूचे उर्त्सजन यावर आधारित संशोधन प्रकल्प तयार केला जात आहे.

जमिनीतील कर्बाविषयी संशोधन सुरू आहे का?

स्वित्झर्लंड येथील फिबल आणि अमेरिकेतील ईडीएफ या दोन संस्थांशी जमिनीतील कर्बाची स्थित्यंतरता याचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले आहेत.


अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाविषयी काय सांगाल?

विद्यापीठात विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर संशोधनासाठी २४ अखिल भारतीय समन्वित प्रकल्प आहेत. या प्रकल्पांपैकी भुईमुगासाठी डॉ. संतोष गहूकर, बियाणे तंत्रज्ञानासाठी आम्रपाली आखरे, ज्वारी संशोधनासाठी डॉ. आर. बी. घोराडे यांना राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. एकंदरीत तंत्रज्ञान उपलब्धता केल्यानंतर कृषी विभागाच्या समन्वयातून त्याचा प्रसार करण्यावर भर दिला गेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT