Nagpur News : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, विभागातील सहा जिल्ह्यात केवळ ४.५५ टक्केच क्षेत्रावरच पेरण्या झाल्या असून तब्बल ९६ टक्के क्षेत्रावरील पेरण्यांना पावसाअभावी ब्रेक लागला आहे.
देशासह महाराष्ट्रात यंदा सरासरी इतका पाऊस होईल आणि जून महिन्यातही दमदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र जून महिन्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांत १ ते २४ जून या कालावधीत सरासरी १४९.७ मिमि पाऊस पडतो. या वर्षी आतापर्यंत केवळ ८७ मिमि इतक्याच पावसची नोंद झाली आहे. जून महिन्याचे एकूण सरासरी पर्जन्यमान १८७.१ मिमि आहे. आजपर्यंत सरासरीच्या ५८.१ टक्केच पाऊस बरसला आहे.
पावसाबाबत अनिश्चितता असल्याने शेतकरी निविष्ठा दरात वाढीच्या परिणामी दुबार पेरणी करावी लागेल या भीतीने पेरण्यासाठी धजावत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच सहा जिल्ह्यांचे लागवड क्षेत्र ४.५५ टक्क्यांपेक्षा पुढे सरकले नाही. विभागाचे सरासरी लागवड क्षेत्र १९,१४,७६६.९१ हेक्टर इतके आहे. पावसाअभावी ८७,०५१ हेक्टरवरच पेरणी शक्य झाली आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी सुविधा आहेत. अशाच शेतकऱ्यांनी पेरणीवर भर दिला आहे.
...असे आहे सरासरी लागवड क्षेत्र
त्यापुढे प्रत्यक्ष लागवड व टक्केवारी
वर्धा ४,११,९३७.४३ २९,८३५ ७.२४
नागपूर ४,६५,३२७.४७ ५,८३४ १.२५
भंडारा १,८६,१५३.६६ २३८ ०.१३
गोंदिया १,८७,७१५.१२ ७२ ०.०४
चंद्रपूर ४,५८,६७०.८ ५०२४६ १०.९५
गडचिरोली २,०४,९६२.४३ ८२६ ०.४०
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याची स्थिती आहे. या महिन्यातील सरासरीच्या केवळ ५८ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे धोका न पत्करता शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे. त्यामुळेच सहा जिल्ह्यांमध्ये केवळ ४.५५ टक्केच पेरणी झाली आहे.शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.