Pune News : अपेक्षित पाऊस नसल्यामुळे राज्याच्या ऊस लागवडीत सलग दोन वर्षांपासून घसरण होते आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस उपलब्धता लक्षणीय प्रमाणात घटू शकते. परिणामी पुढील गाळप हंगाम केवळ ७०-८० दिवसांचा राहू शकतो, अशी भीती ‘डीएसटीए’च्या राज्यस्तरीय चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली.
‘दुष्काळामुळे घटलेल्या ऊस लागवडीमुळे खोडवा, निडव्याचे नियोजन’ या विषयावर शनिवारी (ता.१६) ‘डीएसटीए’च्या मुख्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. डीएसटीए, साखर संघ व ‘विस्मा’ने आयोजिलेल्या या चर्चासत्राला खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार, कृषिरत्न शेतकरी शास्त्रज्ञ संजीव माने, ‘डीएसटीए’चे मानद सचिव एम. आर. कुलकर्णी व कार्यकारी सचिव गौरी पवार उपस्थित होते.
खताळ म्हणाले, ‘‘चालू हंगामापेक्षाही पुढील हंगामातील ऊस उपलब्धता घटू शकते. दुष्काळी स्थिती बघता ऊस पिकाचे उत्पादन व उत्पादकतेवर यंदा प्रश्नचिन्ह आहे. पुढील वर्षी राज्याचे ऊस उत्पादन ६००-६५० लाख टनापर्यंत घसरल्यास गाळप हंगाम ७० दिवसांपेक्षा जास्त चालू शकणार नाही.
त्यामुळे पीक वाचविण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न करावे लागतील. शेततळ्यांचा वापर करण्याविषयी टीका होत असली तरी आता ऊस शेतीसाठी तळ्यांचा वापर करायला हवा. ठिबक, तुषार व इतर तंत्र वापरून उत्पादकता टिकवावी लागेल. अडचणीच्या या काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे लागेल. खोडवे, निडवे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे.’’
डॉ. पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या ऊस शेतीने यापूर्वी सामना केलेल्या पाच दुष्काळी हंगामाचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक दुष्काळात खोडव्यानेच साखर उद्योगाला तारले आहे. यंदा ऊस उत्पादकता हेक्टरी ९० टनांपेक्षाही खाली जाईल व साखर कारखाने १०० दिवसांच्या आसपास चालतील. मात्र अवर्षण स्थितीमुळे पुढील हंगामात उसाची अतिटंचाई तयार होईल. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या सर्वच उसाचा खोडवा ठेवायला हवा. बाष्परोधकाचा वापर करावा लागेल.’’
‘पुढील हंगामात बेण्याची कमतरता भासेल’
दरम्यान, पुढील हंगामात ऊस बेण्याची कमतरता भासू शकते, असा इशारा डॉ. नेरकर यांनी दिला. ‘‘उसामुळे साखर उद्योग उभा राहिला. त्यामुळेच ग्रामीण भागात सामाजिक, सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक क्रांती घडून आलेली आहे. मात्र, पुढील हंगामात ऊस उपलब्धता घटून ही क्रांती शांत होण्याची भीती आहे. त्यासाठी सर्व साखर कारखान्यांना दक्ष राहून यापुढे खोडवा, निडव्याच्या व्यवस्थापनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागेल.’’
खोडवा, निडव्यासाठी सल्ला...
- खोडवा, निडवा ठेवा
- पाचट न जाळता आच्छादन करा
- वेळेवर बुडखे छाटणे व नांग्या भरणे अत्यावश्यक
- पाणी, खत, अन्न द्रव्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे
- जैविक खतांचा वापर, खोडकीड नियंत्रण आवश्यक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.